vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रीय स्तरावरील ई-गव्हर्नन्स पुरस्कार कडेपूर ग्रामपंचायतीला प्रदान- जयपूर येथे भव्य कार्यक्रमात पुरस्कार वितरण 

राष्ट्रीय स्तरावरील ई-गव्हर्नन्स पुरस्कार कडेपूर ग्रामपंचायतीला प्रदान- जयपूर येथे भव्य कार्यक्रमात पुरस्कार वितरण

 सांगली, प्रतिनिधी केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा विभागाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायतीस आज केंद्रीय प्रशासन सुधारणा विभागाचे मंत्री जितेंद्र सिंह व राज्यस्थानचे मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जयपूर येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सरपंच सतीश देशमुख, उपसरपंच हनुमंत गरुड व ग्रामपंचायत अधिकारी एस. डी. मुलाणी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

 

 केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा विभाग व पंचायती राज मंत्रालय यांच्याद्वारे आयोजित यावर्षीची दोन दिवसीय 29 वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स कॉन्फरन्स राजस्थान येथील जयपूर येथे पार पडली. यामध्ये केंद्र, राज्य शासन, जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायत स्तरापर्यंतच्या विविध विभागांत काम केलेल्या उत्कृष्ट अधिकारी तथा विभाग व संस्था यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार श्रेणीमध्ये गेल्या वर्षी ग्रामपंचायत ही श्रेणी समाविष्ट करण्यात आली. यंदाच्या दुसऱ्या वर्षी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील कडेपूर ग्रामपंचायत ही देशातून प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पुरस्कारासाठी पात्र ठरली.

 

 ग्रामपंचायत श्रेणी अंतर्गत “सेवा वितरणाचे सक्षमीकरण करण्यासाठी तळागाळातील उपक्रम ” या शीर्षका अंतर्गत सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना दरवर्षी पुरस्कृत केले जाते. या स्पर्धेत देशभरातील 6 लाख 40 हजार गावांसाठी उपलब्ध असलेल्या 2 लाख 68 हजार ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील 40 हजारांपेक्षा जास्त गावांसाठी असलेल्या, 28 हजार ग्रामपंचायतींचा सहभाग होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेने व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांचे मार्गदर्शन व संकल्पनेतून कडेपूर ग्रामपंचायतीत विविध प्रशासकीय सुधारणा करण्यात आल्या.  कडेपूर ग्रामपंचायतीचे सक्रिय सरपंच सतीश देशमुख, उपसरपंच हनुमंत गरुड व ग्रामपंचायत अधिकारी एस. डी. मुलाणी व समस्त ग्रामस्थ यांच्या सक्रिय सहभागाने व कडेगाव गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, विस्तार अधिकारी श्रीधर कुलकर्णी, यांच्या समन्वयाने राष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार प्राप्त करण्यास सहकार्य लाभले.

कडेपूरची सुवर्ण कामगिरी,कडेपूर ग्रामपंचायतमध्ये नागरिकांना दिल्या जाणाऱ्या 1000 पेक्षा जास्त सेवा, संपूर्णपणे शंभर टक्के डिजिटल करण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतीने स्वतःचे संकेतस्थळ व मोबाईल ॲपच्या माध्यमातून अद्ययावत डिजीटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व सुलभ रीतीने सेवा उपलब्ध करून दिल्या. तसेच, ग्रामपंचायत स्तरावर ए. आय., ब्लॉकचैन, जीआयएस मॅपिंग, रोबोटिक्स, यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामपंचायतचे सक्षमीकरण करण्यात आले आहे. तसेच लोकांच्या सूचना व तक्रारी प्राप्त करण्यासाठी भारत सरकारचे मेरी पंचायत ॲप सर्वात जास्त वापर करणारी देशातली सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत ठरली आहे. त्याचप्रमाणे गावात पार पडलेल्या ग्रामसभा, त्याचे निर्णय, फोटो व व्हिडिओ निर्णय ॲपवर अपलोड करून राष्ट्रीय ॲपचा वापर करणारी सुद्धा देशातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत ठरली आहे. यामुळे ग्रामस्थांना प्रत्यक्ष ग्रामपंचायत इमारतीला प्रत्यक्ष भेट न देता, देशात कुठेही असताना, आपल्या मोबाईलवर घरबसल्या अर्ज करून विविध सेवा प्राप्त करणे सुलभ झाले आहे. जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह दाखला यासारख्या एक हजाराहून जास्त सेवा घरबसल्या ऑनलाईन प्राप्त झाल्याने लोकांचे जीवन सुकरमान होण्यास मदत झाली आहे व ग्राम सुशासनात अमुलाग्र सुधारणा झाली आहे

राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याचा प्रवास, सर्वप्रथम कडेपुर ग्रामपंचायतीने महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर दिल्लीवरून केंद्र सरकारच्या दोन सदस्यीय टीमने कडेपूर ग्रामपंचायतीला भेट देऊन तीन दिवस कडेपूर ग्रामपंचायतीने राबवलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. त्यानंतर मे 2026 या महिन्यात दिल्ली येथे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली यांनी भारत सरकार सचिव यांच्या टीमच्या समोर प्रत्यक्ष सादरीकरण केले व प्रश्न उत्तर नुसार गुणांकन करण्यात आले. या प्रकारे प्रदीर्घकाळ चालणाऱ्या कठीण प्रक्रियेतून कडेपूर ग्रामपंचायतीची राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पुरस्कारासाठी निवड झाली.

 दोन दिवसीय ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय परिषदेच्या पहिल्या दिवशी, दि. 1 जुलै 2026 रोजी, जयपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी येथे विविध राज्यातून आलेल्या अधिकाऱ्यांसमोर कडेपूर ग्रामपंचायतीची यशोगाथा व अनुभव यांचे सविस्तर सादरीकरण केले.

 

00000

संबंधित पोस्ट

राज्यात ‘अपना भांडार’च्या माध्यमातूनखरेदी विक्रीची साखळी उभारणार- पणन मंत्री जयकुमार रावल

2 व 4 जून रोजी यलो अलर्ट जारी हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना 

जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-2025 चे आयोजन उद्योजक,नवउद्योजक, गुंतवणूकदारांनी उपस्थित राहावे

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ‘केवायसी’ प्रक्रिया बंधनकारक

वंदे भारत एक्सप्रेसचे उत्साहात स्वागत…

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे…