*रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अलिबाग**पूर ओसरल्यानंतरही सावध राहा!*नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये?
राज्य प्रतिनिधी
पूर ओसरल्यानंतरही अनेक प्रकारचे धोके कायम राहू शकतात. जलजन्य आजार, विद्युत अपघात, सापांचा वावर, भूस्खलन, रस्ते खचणे तसेच पुन्हा पूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी.
काय करावे
• जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या पूरविषयक सूचना व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करा.
• पाणी साचलेली ठिकाणे, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, ओढे व नाले तसेच खराब झालेले पूल आणि रस्ते यापासून सुरक्षित अंतर ठेवा.
• पुरानंतर उद्भवणाऱ्या जलजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी केवळ उकळलेले किंवा शुद्ध केलेले पिण्याचे पाणी वापरा.
• पडलेल्या किंवा तुटलेल्या वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर ठेवा. अशी धोकादायक परिस्थिती निदर्शनास आल्यास त्वरित वीज वितरण विभाग किंवा स्थानिक प्रशासनाला माहिती द्या.
• पुरामुळे साचलेला कचरा व गाळ हटविण्यासाठी गावस्तरावर राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी व्हा. परिसर स्वच्छ ठेवून सार्वजनिक आरोग्याला निर्माण होणारा धोका कमी करण्यासाठी सहकार्य करा.
• पिके, पशुधन, घरे आणि मालमत्तेचे नुकसान झाले असल्यास त्याची नोंद तातडीने संबंधित महसूल विभागाकडे करा. पंचनामा व शासकीय मदतीसाठी प्रशासनाला आवश्यक माहिती द्या.
• भूस्खलन, नदीकाठचे तट फुटणे, रस्ते खचणे तसेच पुन्हा पूर येण्याचा धोका यांसारख्या दुय्यम संकटांबाबत सतर्क राहा.
• पुराच्या काळात सापांचा वावर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे घर, अंगण, गोठा तसेच अंधाऱ्या ठिकाणी वावरताना विशेष खबरदारी घ्या.
• डासांपासून होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी मच्छरदाणीचा वापर करा. घर व परिसरात पाणी साचू देऊ नका.
काय करू नये
• वीजेच्या तारांना स्पर्श करू नका : तुटलेल्या वीजतारा, वीजखांब किंवा विद्युत उपकरणांपासून सुरक्षित अंतर ठेवा.
• तळघरातील पाणी घाईघाईने बाहेर काढू नका : तळघरात साचलेले पाणी एकदम उपसण्याची घाई करू नका. पाण्याचा दाब अचानक कमी झाल्यास भिंतींवर ताण येऊन इमारतीचे नुकसान होऊ शकते.
• मुलांना साचलेल्या पाण्यात खेळू देऊ नका : पूर ओसरलेल्या भागात, चिखलात किंवा साचलेल्या पाण्यात मुलांना जाण्यास किंवा खेळण्यास मज्जाव करा.
• अतिधाडस करू नका : पडझड झालेल्या किंवा संरचनात्मकदृष्ट्या कमकुवत झालेल्या घरात तज्ज्ञ किंवा प्रशासनाच्या परवानगीशिवाय प्रवेश करू नका. तुटलेल्या काचा, धारदार वस्तू आणि इतर धोकादायक सामग्रीपासून सावध राहा.
• अफवांवर विश्वास ठेवू नका : हवामान विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवा. परिस्थिती सामान्य झाल्याचे अधिकृतपणे जाहीर होईपर्यंत सुरक्षित ठिकाणी राहा.
सतर्क राहा • सुरक्षित राहा • प्रशासनाला सहकार्य करा*रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अलिबाग*