
नागरी सुविधापूर्तीप्रमाणेच नागरिक सुरक्षेलाही महत्व देण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश
नवी मुंबई प्रतिनिधी- अतिधोकादायक सी 1 कॅटेगरीतील इमारतींच्या सद्यस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून त्याठिकाणी कोणतीही दुर्घटना घडू नये याची खबरदारी घेत तेथील वीज, पाणीपुरवठा, मलनि:स्सारण वाहिन्या तातडीने खंडीत कराव्यात व त्या इमारती रिकाम्या करण्याची कार्यवाही तत्परतेने करावी असे निर्देश देत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी महापालिका क्षेत्रातील विनावापरातील पडीक बांधकामांचेही विभागवार तातडीने सर्वेक्षण करून अशी बांधकामेही कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यादृष्टीने निष्कासनाची कार्यवाही तातडीने प्रस्तावित करावी व त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश दिले.
महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या आढावा बैठकीप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.दिग्विजय चव्हाण आणि इतर विभागप्रमुख उपस्थित होते.
इतर शहरांत घडणा-या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर आपण सतर्क होण्याची गरज असून नवी मुंबई शहरात ठिकठिकाणी भरणारे कोचींग क्लासेस, शिकवणी वर्ग यांचे तातडीने अग्निशमन ऑडिट करून घ्यावे असे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कोचींग क्लासेस, शिकवणी वर्ग भरविणा-या व्यक्ती / संस्था यांनी नवी मुंबई महानगरपालिका परवाना विभागामध्ये आपले स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट तसेच अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि पूरक कागदपत्रे जमा करणेबाबत सूचना जाहीर करावी असेही निर्देश यावेळी आयुक्त महोदयांनी दिले.
शहरात ठिकठिकाणी लागणा-या बॅनर्स आणि होर्डींगमुळे शहर विद्रुपीकरण होते शिवाय ते विनापरवानगी लावले जात असल्याने महानगरपालिकेच्या महसूलावरही परिणाम होतो. यादृष्टीने तातडीने लोकप्रतिनिधींच्या सूचनांसह होर्डींगबाबतचे धोरण तयार करावे आणि त्यास महापालिकेची मान्यता घेऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची कार्यप्रणाली अंमलात आणावी असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
शहरातील वाढत्या फेरीवाल्यांमुळे रहदारीवर तसेच स्वच्छतेवरही परिणाम होत असून याकडे गांभिर्याने लक्ष देण्याचे निर्देश देत मा.न्यायालयाच्या आदेशानुसार त्याविरोधातील मोहीमांची तीव्रता वाढवावी, दंडात्मक तरतूदींमध्ये वाढ करावी तसेच निश्चित केलेल्या हॉकर्स झोनमध्ये अधिकृत फेरीवाल्यांना बसवून रस्ते, पदपथ मोकळे राहतील यासाठी धोरण तयार करण्याचेही निर्देशित करण्यात आले. त्याचप्रमाणे परवाना देण्याच्या कार्यप्रणालीकरिता अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले.
खड्डेमुक्त रस्त्यांसाठी दक्ष ॲपचा प्रभावी वापर करावा तसेच कचरागाड्यांवरही कॅमेरे लावून रस्त्यांच्या स्थितीवर लक्ष ठेवण्याची व आवश्यक तेथे सुधारणा करण्याची नियमित प्रणाली राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
घनकचरा व्यवस्थापन नियमाच्या अनुषंगाने दररोज 100 किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणा-या सोसायट्यांपर्यंत पोहचून त्यांना शासकीय पोर्टलवर नोंदणी करण्याच्या सूचना द्याव्यात व त्यांच्या कच-याची त्यांच्या आवारातच विल्हेवाट लावणारे प्रकल्प राबविण्यासाठी प्रोत्साहित करावे असेही सूचित करण्यात आले.
सार्वजनिक व सामुदायिक शौचालय व्यवस्थापन सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या समन्वयाने करावे व तेथील व्यवस्था नागरिकांना समाधानकारक राहील याकडे विशेष लक्ष देण्याचेही सूचित करण्यात आले.
नमुंमपा शालेय विद्यार्थ्यांना 15 ऑगस्टपर्यंत शालेय गणेवश वाटप होतील यादृष्टीने नियोजन करावे असे निर्देश शिक्षण विभागास देण्यात आले तसेच आरोग्य विभागाने पावसाळी आजारांच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना नियमित सुरू ठेवाव्यात व आवश्यक औषधसाठी उपलब्ध करून ठेवावा असेही निर्देशित करण्यात आले.
महानगरपालिकेकडे विविध करांच्या रूपाने जमा होणा-या निधीतूनच विकासकामे करण्यात येत असल्याने महसूलवाढीकडे सर्व विभागांनी लक्ष द्यावे आणि आपले उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजनबध्द पावले उचलावीत असेही संबंधित विभागांना आयुक्तांनी निर्देशित केले. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या विविध ठरावांच्या अनुषंगाने विनाविलंब उचित कार्यवाही करण्याचेही निर्देश आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी या आढावा बैठकीत दिले.



