
पाणी अडवा, पाणी जिरवा, सुरक्षित भविष्य घडवा; जलसंवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक – आमदार संजय गायकवाड· ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटरला’उत्स्फूर्त प्रतिसाद· मान्यवरांनी दाखवली हिरवी झेंडी
बुलढाणा, प्रतिनिधी पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविणे, पाणी वाहून जाऊ न देता त्याचे योग्य नियोजन करणे आणि जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड देणे आवश्यक आहे. पाणी, निसर्ग आणि पर्यावरणाचे संवर्धन झाले तरच मानवी जीवन सुरक्षित राहील, असे प्रतिपादन आमदार संजय गायकवाड यांनी केले.
जिजामाता प्रेक्षागार क्रीडा संकूल येथे जलसंधारण दिनानिमित्त आयोजित ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ रॅलीला हिरवी झेंडी दाखविल्यानंतर ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी अजिंक्य घोडके, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, मृद व जलसंधारणचे कार्यकारी अभियंता अमोल मुंडे, उपअभियंता अमोल जाधव, मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या विविध उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे सांगून आमदार गायकवाड म्हणाले की, पाण्याशिवाय निसर्ग आणि निसर्गाशिवाय मानवी जीवन शक्य नाही. त्यामुळे जलसंवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. शासनाच्या जलसंधारणाच्या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य करून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच प्रत्येकाने पिंपळ, वड, पिंपरी यांसारखी निसर्गपूरक किमान पाच झाडे लावून त्यांचे संगोपन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार श्री. गायकवाड पुढे म्हणाले की, बुलढाणा व मोताळा क्षेत्रात नदी-नाल्यांचे खोलीकरण, जलसाठ्यांची निर्मिती, रिचार्ज स्ट्रक्चर आणि पाणी अडविण्याच्या विविध उपाययोजनांमुळे भूजल पातळी सुधारण्यास मदत झाली आहे. पाणी अडविल्यानंतर त्याच्या परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीतही वाढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
महावॉकथॉनच्या माध्यमातून पाणी वाचवा, पाणी अडवा आणि पाणी जमिनीत जिरवा, हा संदेश जनमानसात पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकसहभाग वाढल्यास आगामी काळात जिल्ह्याला दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास आमदार गायकवाड यांनी व्यक्त केला.
जलसंवर्धनाची शपथ,महावॉकेथॉनच्या माध्यमातून ‘पाणी वाचवा, पाणी अडवा आणि पाणी जमिनीत जिरवा’ हा संदेश जनमानसात पोहोचविण्यात आला. कार्यक्रमात सहभागी मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांनी जलसंवर्धनाची शपथ घेतली. जलसंधारणाच्या कामात लोकसहभाग वाढविण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
जिजामाता प्रेक्षागार क्रीडा संकुलातून वॉकेथॉनला सुरुवात,माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून आयोजित महा वॉकेथॉनला बुलढाणाकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिजामाता क्रीडा संकुल येथून रॅलीला सुरुवात झाली. तहसील चौक, चिंचोले चौक मार्गे पुन्हा जिजामाता क्रीडा संकुल येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
या पदयात्रेत शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक-विद्यार्थी, क्रीडाप्रेमी, प्रतिष्ठित नागरिक तसेच अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांना त्यांनी शुभेच्छा देत विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच जलसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात कृतीत उतरवावा, असे आवाहन केले.



