सांगली जिल्ह्यात 12 सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालत प्रलंबित व दावा पूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याचे आवाहन
सांगली, प्रतिनिधी: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार शनिवार, दि. 12 सप्टेंबर 2026 रोजी सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय सांगलीसह सर्व तालुका न्यायालयाच्या ठिकाणी ही लोकअदालत होणार आहे
जिल्हा न्यायालय सांगली, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, सहकार न्यायालय क्रमांक 1 व 2 तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या विविध प्रकरणांचा लोकअदालतीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, बँकेचे दिवाणी दावे, नियमित दिवाणी दावे, भूसंपादन प्रकरणे, कौटुंबिक वादातील प्रकरणे, चलनक्षम दस्तऐवज (N.I. Act 138) प्रकरणे तसेच कामगार न्यायालयातील प्रकरणांचा समावेश आहे. याशिवाय दावा पूर्व प्रकरणांमध्ये वीज बिल, टेलिफोन बिल व बँकेतील वसुली प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी लोकअदालतीत ठेवण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पक्षकारांनी जास्तीत जास्त प्रकरणे ठेऊन तडजोडीने मिटविण्याबाबत लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी केले आहे.