vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील उर्वरित पात्र लाभार्थ्यांसाठी विशेष अभियान राबवावे – मंत्री आदिती तटकरे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा आढावा

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील उर्वरित पात्र लाभार्थ्यांसाठी विशेष अभियान राबवावे – मंत्री आदिती तटकरे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा आढावा..

मुंबई, प्रतिनिधी : शेतकरी आत्महत्याग्रस्त १९ जिल्ह्यांतील पात्र एक हजार ५९३ लाभार्थ्यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा, तर १३३ बालकांना केंद्र शासनाच्या स्पॉन्सरशिप योजनेचा लाभ देण्यात येत आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी संबंधित जिल्ह्यांमध्ये विशेष अभियान राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिल्या.

विदर्भ आणि मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांना सक्षम करण्यासाठी तसेच त्यांच्या लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, उपसचिव आनंद बोंडवे, उपायुक्त जे. बी. गिरासे, अवर सचिव प्रसाद कुलकर्णी, निलेश पाटील, संजय दळवी, मदत व पुनर्वसन विभागाचे संजय इंगळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, आर्थिक, सामाजिक अथवा अन्य प्रतिकूल परिस्थितीमुळे कोणत्याही बालकाला कुटुंबापासून वेगळे होऊन बालगृहात जावे लागू नये आणि त्याचे संगोपन कुटुंबातच व्हावे, हा बालसंगोपन योजनेचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत बालकाला प्रत्यक्ष परिपोषण अनुदान म्हणून दरमहा दोन हजार ५५० रुपये देण्यात येतात. राज्यभरातील सुमारे एक लाख ६० हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे.जास्तीत जास्त पात्र बालकांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी संबंधित जिल्ह्यांनी विशेष अभियान राबवून प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांचा एकल महिला धोरणात समावेश करण्यात येणार असून त्यांना एकाच छताखाली शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे , असेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००

संबंधित पोस्ट

अग्रीस्टॅक नोंदणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्याला जागतिक पर्यटन हब बनविण्यासाठी कोयना- दौलत डोंगरी महोत्सवासारखे महोत्सव ही काळाची गरज- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन करण्यास गती —मंत्री बाबासाहेब पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन “देशाच्या पुनर्बांधणीच्या दृष्टीने एक व्यापक राष्ट्रीय मिशन” असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे प्रतिपादन

दानवे परिवाराच्या वतीने दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न जालना जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व राजकीय पक्षाने एकत्रित यावे  – माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे जालना जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला – मा.आ.कैलासजी गोरंटयाल जिल्ह्यातील जनतेने दानवे परिवाराला भरघोस प्रेम दिले – भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

vishwatmaklokswamivarta