
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि.१७ रोजी ध्वजारोहण; तयारीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात गुरुवार दि. १७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा आज सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सिरसाट यांनी घेतला.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजीत या बैठकीस विभागीय आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, विभागीय क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, उपसंचालक(माहिती) प्रवीण टाके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस.एस. भगत ,सहायुक्त मंजुषा मिसकर आदी उपस्थित होते
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर शहरात विविध ठिकाणी विकासकामांचे भूमिपूजन, शुभारंभ आणि लोकार्पण कार्यक्रमांचे नियोजन विविध विभाग करीत आहेत. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, महानगरपालिका, विभागीय क्रीडा संकुलातील विविध विकासकामांचा समावेश आहे. याशिवाय शहराच्या अन्य भागांतही कार्यक्रमाचे नियोजन आहे, याबाबत माहिती देण्यात आली
मुख्य सोहळ्याच्या अनुषंगाने आवश्यक तयारी, नियोजन, वाहतूक, सुरक्षा व्यवस्था याबाबत पालकमंत्री शिरसाट यांनी सुचना दिल्या. नियोजन सुकर करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय ठेवावा. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपापली जबाबदारी समन्वयाने पार पाडावी, असे निर्देश श्री. शिरसाट यांनी दिले.
०००००



