vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गणेशोत्सव काळात अन्न व औषध प्रशासनाची विशेष जनजागृती व अंमलबजावणी मोहीम

गणेशोत्सव काळात अन्न व औषध प्रशासनाची विशेष जनजागृती व अंमलबजावणी मोहीम

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी गणेशोत्सव तसेच आगामी विविध सण, उत्सव, यात्रा व धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत विशेष अन्न सुरक्षा जनजागृती व अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत आहे

सण-उत्सवांच्या कालावधीत प्रसाद, मिठाई, फराळ, मोदक, पेढे, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, शीतपेय तसेच विविध खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री व वितरण केले जाते. या पार्श्वभूमीवर अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 तसेच त्याअंतर्गत नियम व विनियम आणि लागू असलेल्या परवाना व स्वच्छता अटींचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे

अन्न व्यवसायासाठी आवश्यक असलेला FSSAI परवाना किंवा नोंदणी वैध असणे आवश्यक असून, अन्न तयार करणे, साठवणे, वाहतूक करणे व विक्री करण्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक आहे. अन्नपदार्थ तयार करण्यासाठी स्वच्छ व सुरक्षित पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा. मिठाई, मोदक, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर नाशवंत अन्नपदार्थ योग्य तापमानावर साठवावेत. कालबाह्य किंवा खराब झालेल्या अन्नपदार्थांची विक्री करू नये.

खाद्यपदार्थांमध्ये भेसळयुक्त, निकृष्ट किंवा अनधिकृत रंग, कृत्रिम पदार्थ अथवा प्रतिबंधित घटकांचा वापर करू नये. खाद्यतेल योग्य दर्जाचे असावे तसेच वापरलेल्या तेलाचा अयोग्य पद्धतीने वारंवार वापर टाळावा. खाद्यपदार्थ झाकून ठेवून धूळ, घाण, कीटक, माशा व उंदीर यांपासून त्यांचे संरक्षण करावे. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छ कपडे, हेडकॅप किंवा हेअरनेट यांसारख्या योग्य संरक्षणात्मक साधनांचा वापर करावा

खाद्यपदार्थांसाठी वापरण्यात येणारे पॅकेजिंग साहित्य अन्नपदार्थांसाठी सुरक्षित आणि निर्धारित मानकांनुसार असावे. विक्रीच्या ठिकाणी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, कीटक नियंत्रण आणि योग्य साठवणुकीची व्यवस्था ठेवावी, अशा सूचनाही अन्न व्यवसायिकांना देण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सव, धार्मिक उत्सव, यात्रा, जत्रा तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये प्रसाद, महाप्रसाद, अन्नदान, भोजन व्यवस्था किंवा खाद्यपदार्थांचे वितरण अथवा विक्री आयोजित करणाऱ्या मंडळे, संस्था व आयोजकांनीही अन्न सुरक्षा नियमांचे पालन करावे. अन्नपदार्थ तयार करणारे, वितरण करणारे किंवा विक्री करणाऱ्या संबंधित अन्न व्यवसायिकांनी आवश्यक परवाना किंवा नोंदणी तसेच उत्सवासाठी आवश्यक परवानगीची प्रक्रिया पूर्ण करावी.

गणेशोत्सव व इतर सण-उत्सवांच्या कालावधीत अन्नपदार्थ तयार करणे, विक्री करणे किंवा वितरण करणे यासाठी आवश्यक असलेली ऑनलाइन अर्ज व परवानगी प्रक्रिया महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिक आणि अन्न व्यवसायिकांनी अधिकृत पोर्टलवरच अर्ज करून आवश्यक परवानगी घ्यावी. अनधिकृत व्यक्ती किंवा मध्यस्थांमार्फत अर्ज करू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.नागरिकांनी सण-उत्सवाच्या काळात खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यांचा दर्जा, स्वच्छता, पॅकिंग, लेबलवरील माहिती तसेच उत्पादन व कालबाह्यता दिनांक तपासावा. संशयास्पद, भेसळयुक्त किंवा अस्वच्छ परिस्थितीत विक्री होणारे खाद्यपदार्थ खरेदी करू नयेत.अन्नपदार्थांमध्ये भेसळ, अस्वच्छता, कालबाह्य अन्नपदार्थांची विक्री किंवा अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी.“सुरक्षित अन्न – निरोगी नागरिक, सुरक्षित सण” हा उद्देश साध्य करण्यासाठी अन्न व्यवसायिक, उत्सव आयोजक आणि नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

00००

संबंधित पोस्ट

रानभाज्यांना राजश्रय देऊन गडचिरोली ब्रँड निर्माण करण्याची गरज – कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात रानभाज्यांचे संवर्धन व विपणनावर भर

गडचिरोली पोलिसांचा “एक गाव, एक वाचनालय” उपक्रम — मौजा वांगेतुरी येथे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते

vishwatmaklokswamivarta

राज्यातील 4 लाख 92 हजार 532 असाक्षरांनी दिली**पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीची परीक्षा*

vishwatmaklokswamivarta

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करु नये – जिल्हाधिकारी अशोक काकडे

महाराष्ट्रात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम; ९.८६ कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा