
दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात विशेष कार्यक्रम संपन्न
नवी मुंबई प्रतिनिधी- ‘समृध्दीसाठी सत्यनिष्ठा’ या ब्रीदवाक्यानुसार यावर्षी 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत असून त्या अनुषंगाने आज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात विशेष जागरूकता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक श्री.शिवराज पाटील, नमुंमपा अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधिक्षक श्री.भागवत सोनावणे व नवी मुंबईचे पोलीस उपअधिक्षक श्री.धर्मराज सोनके, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.भागवत डोईफोडे, शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड तसेच इतर विभागप्रमुख, अधिकारी – कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी शासकीय सेवेत येण्यापूर्वी या सेवेचे खूप अप्रूप वाटते, मात्र सेवेत आल्यानंतर कर्तव्यपरायणता व सचोटी ही तत्वे पाळली जातील याचे प्रत्येकाने कायम भान राखण्याची गरज असल्याचे सांगितले. हा सप्ताह हे औचित्य असले तरी या माध्यमातून 365 दिवस दक्षतेने लोकहिताय काम करण्याची सवय लावावी असे मत त्यांनी व्यक्त केले. नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्याने करवसूलीत लक्षणीय वाढ झाली व पारदर्शकता वाढली हे सांगतानाच आयुक्तांनी नागरिकांसाठी अत्यंत लहान लहान गोष्टी महत्वाच्या असतात. आपल्यासाठी ते नियमित काम असले तरी त्यासाठी त्यांनी वेळ, श्रम खर्ची घातलेले असतात. त्यामुळे लोकाभिमुख सेवा हे ध्येय ठेवून स्वत:ची प्रतिष्ठा जपत काम केले पाहीजे हे त्यांनी आवर्जून सांगितले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक श्री.शिवराज पाटील यांनी भारत अखंड ठेवण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करीत त्यांचा आदर्श ठेवून सशक्त भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने आपल्या परीने योगदान द्यावे असे सांगितले. या सप्ताहात आपण आपल्या पदाला न्याय देतो का? लोकांना अपेक्षित सेवा पुरवितो का? याचे आत्मपरीक्षण करून मी लोकांना अधिक गुणवत्तापूर्ण सेवा कशा पध्दतीने उपलब्ध करून देईन याचा विचार प्रत्येकाने करावा असे ते म्हणाले. अमर्याद अपेक्षा ठेवल्यामुळे चूक घडते आणि सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळते तसेच कुटुंबाचीही मानहानी होते त्यामुळे आपल्या मर्यादा लक्षात ठेवून वर्तणूक असली पाहिजे हे त्यांनी स्पष्ट केले.
अपर पोलीस अधिक्षक श्री.भागवत सोनावणे यांनी भ्रष्टाचाराचा कॅन्सर दूर करण्यासाठी प्रत्येक घटकाचा सहभाग महत्वाचा असल्याचे सांगितले. नोकरीत येतो तेव्हा आपला सन्मान होतो, मात्र पुढे अपेक्षा वाढत जातात आणि अवाजवी अपेक्षांमध्ये अडकलो की एखाद्या दिवशी मिळविलेले नाव धुळीला मिळते, मग आपल्यासह कुटुंबही आरोपीच्या पिंज-यात अडकते, त्यामुळे कुठे थांबायचे हे समजले पाहीजे असे त्यांनी प्रकर्षाने सांगितले. हा दक्षता सप्ताह त्यादृष्टीने सजग होण्याचा असल्याचे ते म्हणाले.
यावेळी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचेसमवेत उपस्थितांनी भ्रष्टाचार निर्मुलनाची प्रतिज्ञा सामुहिक रितीने ग्रहण केली.



