
मुंबईत १ ते ५ नोव्हेंबरदरम्यान १४ वर्षांखालील मुलींच्या राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन· राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड होणार
मुंबई, प्रतिनिधी: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने १४ वर्षांखालील मुलींच्या राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा २०२६-२७ चे आयोजन १ ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी दिली
ही स्पर्धा भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, धारावी, सायन पश्चिम, मुंबई येथे होणार असून, सर्व सामने मॅटवर खेळविण्यात येणार आहेत.या स्पर्धेत महाराष्ट्रातील आठ विभागांतील अंदाजे १५० खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या अनुषंगाने ३ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता निवड चाचणी घेण्यात येणार आहे. या निवड चाचणीतून हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात येणार आहे.
मुंबई शहरात राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन होत असल्याने कबड्डीप्रेमी आणि क्रीडाक्षेत्रातील मान्यवरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक नियोजन करण्यात येत आहे.
0000



