
नागालॅंड: दहशतवादी समजून नागरिकांवर गोळीबार; 13 जण ठार….
विशेष प्रतिनिधी
नागालँडमध्ये एक मोठी हिंसाचाराची घटना घडली असून, या घटनेत सुरुवातील 6 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी सुरक्षा दलाच्या गाड्या पेटवून दिल्याचंही समोर आलंय. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना मोन जिल्ह्यातील ओटिंग गावात घडली. स्थानिक ग्रामस्थ पिक-अपमधून घरी परतत असताना ओळख पटवता न आल्याने सुरक्षा यंत्रणांनी संशयित म्हणून त्यांच्यावर गोळीबार केल्याचे समजते आहे.
सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेतील आकडा वाढून तो आता 13 वर पोहोचला, तर काहीजण जखमी आहेत. या प्रकरणात स्थानिकांनी मृतदेह पाहिल्यानंतर संतत्प होत सुरक्षा दलाच्या गाड्या पेटवून दिल्या. या घटनेनंतर मुख्यमंत्री नेफियु रिओ यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले आणि या घटनेची विशेष तपास पथकाकडून चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले. नागालँडच्या ओटिंगमध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेत ज्यांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. शोकग्रस्त कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेली उच्चस्तरीय एसआयटी या घटनेची कसून चौकशी करेल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.
नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी ओटिंगमध्ये नागरिकांची हत्या करण्याची दुर्दैवी घटना अत्यंत निषेधार्ह असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, हा गोळीबार कसा, कधी आणि कोणत्या परिस्थितीत झाला याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य माहिती समोर आलेली नाही. नागालँडच्या स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दल दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत होते. यादरम्यान ही घटना घडली.



