
महाराष्ट्र राज्यातील वर्षभरापासून चर्चेत असलेल्या बैलगाडा शर्यतीवर बंदी वर आज निर्णय
महाराष्ट्र प्रतिनिधी :गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रभर चर्चेत असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील बंदीविषयी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.
यापूर्वी मुंबई हायकोर्टाने बैलगाडा शर्यतीवर बंदी कायम ठेवली होती.पेटा आणि इतर प्राणी मित्र संघटनांनी बैलगाडा शर्यतीदरम्यान बैलांना होणारी अमानुष मारहाण, बैलाना शॉक देण्यासारखे प्रकार, त्यांच्या शेपट्या चावल्या जाणं इ. कारणे देत बैलगाडा शर्यती विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानुसार महाराष्ट्रात बैलगाडा आणि बैलांच्या शर्यतीवर न्यायालयाने बंदी घातली होती.: बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू कराव्यात, बैलगाडा मालकांची मागणी
महाराष्ट्रात बंदी असताना तमिळनाडूतील ‘जल्लिकट्टू’ तसेच दक्षिण भारतातील इतर राज्यांतील बैल तसेच इतर प्राण्यांशी संबंधित खेळ सुरु आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदीही उठवावी, अशी मागणी बैलगाडा शर्यत प्रेमींकडून वारंवार होत आहे. शिवाय हा मुद्दा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी निगडीत असल्यामुळे अनेक राजकीय नेतेही याबाबत आग्रही आहेत. राज्य सरकारने कायद्यात सुधारणा करून त्याविषयीच्या नियमांचा मसूदा तयार केला आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने शर्यतींवरील बंदी कायम ठेवली. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government) या याचिकेवर सुनावणी करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मान्य केली आहे. त्यानुसार आज (सोमवार, ता. १५ डिसेंबर) या संदर्भात सुनावणी होणार आहे.



