
तेलाची बेकायदा विक्री करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA)कारवाई सुरू केली असून ‘तेलाचा वारंवार वापर टाळा, आपले आरोग्य सांभाळा’, असे आवाहनही केले आहे.
मुंबई : प्रतिनिधी; तळलेल्या तेलाचा वारंवार वापर केल्यास ते आरोग्यास अपायकारक ठरू शकते. अशा खाद्यतेलाचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब, अल्झायमर, यकृतरोग होण्याचा संभव असतो. अशा तेलाची बेकायदा विक्री करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA)कारवाई सुरू केली असून ‘तेलाचा वारंवार वापर टाळा, आपले आरोग्य सांभाळा’, असे आवाहनही केले आहे.
स्वयंपाकाचे तेल पुन्हा गरम करण्याची किंवा तळण्यासाठी तेच तेल वापरण्याची प्रथा सामान्य आहे. मोठे खाद्य व्यावसायिक आपल्याकडे वापरलेल्या तेलाची विल्हेवाट लावतात; परंतु काही वेळा ते तेल स्वस्तात लहान खाद्यविक्रेत्यांना विकतात. तसेच रस्त्यावरही अनेक खाद्यपदार्थाचे ठेले लागतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तेलाचा वापर होतो. परंतु, अशा ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या तेलाचा दर्जा बहुतांश वेळा तपासला जात नाही.
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने एकूण तेल शुद्धीकरणासाठी असणारी टीपीसी मर्यादा २५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावी असे सांगितले आहे; मात्र वारंवार तेल तळल्यामुळे त्याचे गुणधर्म बदलतात ते टीसीपी मर्यादा ओलांडते. त्यामुळे असे तेल मानवी सेवनासाठी असुरक्षित असते, असे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी सांगितले. त्यामुळे तेलाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी व दूषित तेलाच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.



