
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे चर्चेत आलेलं ‘टेलिप्रॉम्पटर’ म्हणजे नेमकं असतं तरी काय?
नवी दिल्ली प्रतिनिधी: देशात होणाऱ्या लोकसभा निवडणूका असो किंवा गोव्या सारख्या लहान राज्याच्या विधानसभा निवडणूका असो, अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यानेच भाजपकडून निवडणूक लढवली जाते. यामध्ये मोदींच्या वकृत्वशैलिचा मोठा वाटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणं नेहमी चर्चेचा विषय असतात. मात्र एवढी मोठ-मोठी भाषणं ते नेमकी देतात तरी कशी? तर ते टेलिप्रॉम्पटर (Teleprompter) वापरत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. तसं काही भाषणांमधून दिसूनंही आलं आहे. हे टेलिप्रॉम्पटर म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊ. गुगलवर टेलिप्रॉम्टर असा शब्द जर शोधला तर तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच फोटो आणि व्हिडीओ येत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये जोरदार भाषण केलं होतं. वाराणसीमधून भाषण करताना त्यांनी महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते उत्तर भारताच्या इतिहासाचा काशीशी असलेला संबंध सांगत अनेक ऐतिहासिक गोष्टी सांगितल्या होत्या. यावेळी त्यांच्या भाषणानंतर काही फोटो व्हायरल झाले होते. त्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्यासमोर टेलिप्रॉम्पटर असल्याचं दिसतंय. विरोधकांनी त्यांच्या या टेलिप्रॉम्टरवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा काल नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. आंतरराष्ट्रीय दावोस समिटला संबोधित करताना बोलताना अडखळल्याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. विरोधकांनी हा व्हिडीओ ट्विट करत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. टेलिप्रॉम्पटरने साथ न दिल्याने ही वेळ आल्याचा अनेकांच्या टीकेचा रोख होता.



