
हायकोर्टाचा निर्णय अन् ईदगाह मैदानावर झाली गणेशाची प्रतिष्ठापना…
कर्नाटक प्रतिनिधी : कर्नाटकातील हुबळी येथील ईदगाह मैदानावर गणेशोत्सव करण्यावर कर्नाटक हायकोर्टाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता ईदगाह मैदानावर गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. हुबळीतील ईदगाह जागेचा वाद कोर्टात चालू असताना हा निकाल देण्यात आला आहे.
हुबळी येथे असलेल्या ईदगाह जागेशी संबंधित याचिकेवर सुप्रीम कोर्टाने यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या याचिकेला कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर “ही जमीन सरकारच्या मालकीची आहे हे आधीच्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे आणि याचिकाकर्त्याने ही मालमत्ता फक्त दोन वेळा वापरण्यासाठी भाडेतत्त्वावर घेतली आहे. या मालमत्तेवर सरकारचा अधिकार आहे.” असं कोर्टाने आपल्या निकालात म्हटलं आहे.
दरम्यान, या जागेवरील गणेश उत्सव थांबवण्याची याचिका काही जणांकडून दाखल करण्यात आली होती. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कोर्टाने काल रात्री उशीरा या वादावर निर्णय देत ही याचिका फेटाळून लावली असून गणेशोत्सवासाठी परवानगी देण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.वाद सुरू असलेल्या ईदगाह मैदानावर हिंदू संघटनांकडून गणपती उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. त्याबरोबर यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने दाखल केलेल्या पुराव्यानंतर गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी कर्नाटक उच्च न्यायलयाने देण्यात आली आहे.



