
|| #श्री_शिवलीलामृत || मराठी अर्थ || अध्याय दहावा || शारदा-आख्यान
अध्यात्मिक वार्ता
श्रीगणेशाय नमः । हे शंभू महादेवा! तुझा जयजयकार असो! तू मदनरूप हत्तीला विदीर्ण करणारा सिंह आहेस. तू क्रोधरूपी अभ्र नष्ट करणारा प्रभंजन आहेस. तू मदरूपी अंधार दूर करणारा सूर्य आहेस. हे चंद्रशेखरा ! हे वृषभवाहना! तू दंभरूपी पर्वताचे चूर्ण करणारा इंद्र आहेस. तू अहंकाररूपी अंधकासुराचे दमन करतोस. हे भालनेत्रा ! तू धर्माचे वर्धन करणारा आहेस. तू आनंदरूपी कैलासपर्वतावर विहार करतोस. तू मत्सररूपी दुर्धर अरण्य लीलया जाळून टाकतोस. तू वेदशास्त्रांना वंदनीय आहेस. हे सुहास्यवदना ! तू दक्षाचा यज्ञ उद्ध्वस्त केलास. तू आनंदाचा सागर आहेस, तू दयानिधी आहेस, तू ब्रह्मानंद आहेस !
शारदेची कथा, नैध्रुव ऋषींचा उपदेश
नैमिषारण्यात महामुनी सूर शौनकादिक श्रोत्यांना अद्भुतरम्य शिवलीला कथन करीत होता. शबर दांपत्य आणि सिंहकेतू राजा यांचा शिवभक्तीने कसा उद्धार झाला, ते सांगून तो दुसरी कथा सांगू लागला.
सूत म्हणाला, “आनर्त देशात देवरथ नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत असे. तो वेदशास्त्रांमध्ये पारंगत होता. शारदा ही त्याची मुलगी. ती अत्यंत सुंदर, सुशील व चतुर होती. देवस्थाने पद्मनाभ नावाच्या एका सुशिक्षित ब्राह्मणाशी तिचा विवाह ती बारा वर्षांची असताना लावून दिला. वेदसंपन्न पद्मनाभाला राजेही मान देत असत. लग्नसमारंभ व्यवस्थित पार पडला. देवरथाने मुलीला व जावयाला ऑग्रह करून काही दिवस आपल्याकडेच ठेवून घेतले. एके दिवशी सायंकाळी पद्मनाभ स्नानसंध्येसाठी नदीवर गेला होता. अंधारातून परत येत असताना त्याला विषारी सर्प चावला आणि तो जागीच गतप्राण झाला. ही वार्ता कळताच लोक धावले. मातापित्यासह शारदाही तेथे धावत आली. आपल्या पतीचे निश्चेष्ट कलेवर पाहून तिला भोवळच आली. तिचे मातापिता शोक करू लागले. आज त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता! नियतीने शारदेच्या सौभाग्यावर क्रूर घाला घातला होता! लोक हळहळत होते. बायाबापड्या रडत होत्या !
शारदा भानावर आली. जमिनीवर गडबडा लोळत आक्रोश करू लागली- “हाय हाय रे दुर्दैवा ! तू कोणत्या जन्मीचा दावा साधलास? माझी हळदही उतरली नाही तोच पतीला नेलेस? माझे विद्याधनाचे जहाज बुडाले ! माझी शैय्या ओस पडली! माझा प्राणविसावा गेला! आता मी कोणाशी गुजगोष्टी करू ? माझे सौख्यभांडार, माझा सौभाग्यनिधी त्या सर्परूपी तस्कराने पार लुटून नेला. आता जगण्याची इच्छाच उरली नाही! मी काय करू ? माझ्या जिवलगाला कोठे शोधू ?”
तिचा विलाप पाहून लोकांनाही रडू येत होते. त्यांनी शारदेचे सांत्वन केले. तिला धैर्य द्यावे म्हणून शंकराची प्रार्थना केली. देवरथ आणि त्याच्या पत्नीची समजूत काढली. पद्मनाभाच्या प्रेतावर अग्निसंस्कार करून मंडळी नगरात परतली. शारदा माहेरीच राहत होती. पतीच्या आठवणी काढून आला दिवस मोठ्या कष्टाने घालवीत होती. असे बरेच दिवस लोटले. शारदेचे मातापिता काही कामानिमित्त बाहेर गेले होते. घरामध्ये ती एकटीच होती. त्या दिवशी एक अपूर्व घटना घडली. नैध्रुव नावाचे एक वृद्ध तपस्वी ऋषी अकस्मात देवरथाच्या घरी आले. के अंध होते. त्यांच्या शिष्याने त्यांना हात धरून आणले. शारदेने त्यांना बसण्यासाठी आसन दिले. त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. पूजन केल्यावर आदराने नमस्कार केला. तेव्हा नैघृवांनी आशीर्वाद दिला- “बाळ, तुझे सौभाग्य वाढो । तुला वेदवेत्ता पुत्र होवो !”
शारदा विधवा आहे, हे त्या ऋषींना कसे ठाऊक असणार ? त्यांनी आशीर्वाद तर दिला पण ते अमोघ वचन खरे कसे होणार? शारदा खेदाने हसली, असह्य शोकाने तिच्या डोळ्यांत पाणी आले. मुखातून हुंदका बाहेर पडला. नैधृवांनी विचारले, “बाळ, रडतेस कशाला ?” शारदा म्हणाली, “ऋषिवर्य! काही दिवसांपूर्वीच माझे पती सर्पदंशाने मृत्युमुखी पडले आहेत. मग आपला आशीर्वाद खरा कसा होणार?”. तेव्हा नैधृव म्हणाले, “मुली, मी बोललो ते बोललो माझ्या वचनांना कधीही कमीपणा येणार नाही. तपश्चर्येचे सामर्थ्य फार मोठे असते. त्यायोगे सर्व गोष्टी साध्य होतात. ”
तेवढ्यात शारदेचे मातापिता व बंधू घरी परतले. नैध्रुव ऋषींच्या दर्शनाने त्यांनाही आनंद झाला. जे घडले ते शारदेने त्यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, “वरकरणी ही गोष्ट अशक्यप्राय वाटत असली तरी तपस्वी ऋषींचा प्रभावच इतका विलक्षण असतो की त्यांनी दिलेला आशीर्वाद फलद्रूपच होतो. त्यांच्या वरप्रसादाने रंकाचा राव होतो. आणि त्यांनी संतापाने शाप दिला तर त्या पाप्याचा कुळासहित नाश होतो. पुराणात याचे कितीतरी दाखले आहेत. ब्रह्मशापाने नहुष राजा सर्पयोनीत जन्मला, यादवांचे कुळ नष्ट झाले. ब्राह्मणांना क्षोभ आल्यामुळे इंद्राची सर्व संपत्ती सागरात बुडाली. ब्राह्मणाच्या शापामुळेच श्रीहरीला अवतार घ्यावे लागले, परीक्षित राजाला तक्षकाच्या दंशाने मृत्यू आला आणि स्त्रिया असूनही पंडूराजाला ब्रह्मचर्य पाळावे लागले. म्हणून ब्रह्मा, विष्णू व महेश यांनाही ब्रह्मशापाचे भय वाटते. जमदग्नीला राग आला आणि त्याने स्वतःच्याच चार पुत्रांना दग्ध केले. कपिलाच्या शापाने साठा हजार सगरपुत्र जळून गेले. नारदाच्या शापाने उन्मत कुबेरपुत्र वृक्षरूप झाले. विप्रशापाने दंडक राजा भस्मिभूत झाला, नृगराजाचे सरड्यात रूपांतर झाले. अधिक काय सांगावे ? गौतमांच्या शापाने इंद्राच्या अंगाला सहस्र भगे पडली. गुरुशापाने चंद्राला क्षय लागला. अगस्त्याने तर क्रोधित होऊन समुद्राच पिऊन टाकला. मांडव्य ऋषींच्या शापाने सूर्यपुत्र यमाला दासीपुत्र विदुर म्हणून जन्म घ्यावा लागला. तपस्वी ऋषींचा प्रभावच अचिंत्य ! मनात आणले तर ते पाषाणाला देव करतील, गरिबाला चक्रवर्ती सम्राट करतील. त्यांनी अभिमंत्रीत अक्षता टाकल्या तर वठलेल्या वृक्षालाही पालवी फुटेल. हे ब्रह्मांडे मोडतील आणि पुन्हा निर्माण करून दाखवतील. म्हणूनच त्यांना तिन्ही जगात श्रेष्ठ मानले जाते.”
नैधृव ऋषींनी शारदाला धीर दिला व म्हणाले, “मुली, तू उमा- महेश व्रत कर. ‘ॐ नमः शिवाय ।’ या षडक्षर मंत्राचा नित्य विधियुक्त जप कर. तुला दिलेले हे व्रत सफल होईपर्यंत मी येथेच राहणार आहे.” मग ते ऋषिवर्य देवरथाच्या घराच्या अंगणातच मठ बांधून राहू लागले.
पुढे एका शुभदिनी नैधृवांनी शारदेला षडक्षर मंत्रदीक्षा दिली व म्हणाले, “चैत्र किंवा मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध पक्षात उमा-महेश्वर व्रताचरणास प्रारंभ करावा. सुमुहूर्त पाहून सोमवार, अष्टमी व चतुर्दशीस उमामहेश्वराची पूजा करून सुरुवात करावी. हे शिवपूजन वर्षभर करावे. शिवकृपेने आपले कल्याणच होणार अशी दृढश्रद्धा ठेवावी.’
नैधृवांच्या सांगण्यावरून शारदेने विधिपूर्वक व्रतारंभ केला. त्यासाठी दिव्य असे शिवमंदिर रचले. त्याचे चारी खांब सुशोभित केले. त्यावर शुभ्र छत घातले भूमिशुद्धी केली. सुंदर रांगोळ्या काढल्या. सोळा वर्णांची यंत्ररचना केली. त्यांत अष्टदले, चतुर्दले काढली. त्या यंत्रावर तांदूळ पसरून त्यावर घटाची स्थापना केली. उमा-महेश्वराच्या स्वर्णमूर्ती स्थापन करून त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली. ब्राह्मण व सुवसिनी ह्यांचे पूजन करून त्यांना उत्तम पक्वान्नांचे भोजन दिले. त्यांचा यथायोग्य सन्मान केला. पुराण श्रवण केले. कीर्तन ऐकले. जागरण केले. अशा प्रकारे गुरुवचनांवर पूर्ण निष्ठा ठेवून ती यथाविधि व्रताचरण करू लागली. ”
शंकराचे ध्यान
सूत पुढे म्हणाले, “श्रोते हो ! शंकराची देहकांती कुंदपुष्प, चंद्र, कापूर किंवा दुधाचा फेस ह्यांसारखी धवल आहे. त्याचे शरीर रजतासारखे शुभ्र आहे. ते ज्योतीसारखे तेजस्वी दिसते. तो कोटी सूर्यांच्या एकत्रित प्रभेसमान देदीप्यमान आहे. तो जागाच्या आनंदाचा गाभाच आहे जणू! तो गुणातीत आहे, शुभ्र आभरणांनी भूषित आहे. त्याच्या मस्तकावर स्वर्गंगा विराजत आहे. त्यावरील शुभ्र जटांचा मुकुट खूपच शोभून दिसतो. त्या जटामुकुटातील मणियुक्त सर्पभूषणे खूपच खुलून दिसतात. त्याच्या भाळी चंद्राची कोर आहे. त्याच्या सर्वांगी शुभ्र भस्माचे विलेपन किती सुंदर दिसते! त्याच्या कपाळावरील किंचित उन्मीलित तृतीय नेत्र त्याच्या देखणेपणात अधिकच भर घालतो. त्याचे डोळे चंद्रसूर्यासारखे तेजस्वी दिसतात. त्याच्या कानांत शेष व तक्षक ह्यांची कुंडले झळकत आहेत. त्याचा नीलवर्ण कंठ श्रेष्ठ पाचूंहूनही शोभून दिसतो. त्याच्या गळ्यात नरमुंडांची माला आहे. त्याच्या अंगावर केयूर, अंगद, वीरकंकण ही भूषणे आहेत. त्याच्या दहा हातांत अनुक्रमे खट्टांग, त्रिशूल, कपाल, डमरू, अंकुश, पाश, घंटा, पिनाक, पाशुपत व कमल अशी शस्त्रास्त्रे व वस्तू आहेत. ती शस्त्रे प्रलयकाळच्या विजेसारखी झळकतात. त्याच्या अंगावर सिंहाच्या कातड्याचे वस्त्र आहे. शुभ्र अशा कैलास पर्वतावर सहस्र योजने विस्तीर्ण असा स्तंभविरहित अतिभव्य मंडप आहे. त्याच्या प्रकाशाने दशदिशा उजळल्या आहेत. त्यात विविध रत्नांनी सुशोभित असे दिव्य सिंहासन आहे. त्यावर आसन म्हणून गजचर्म ठेवले आहे. तेथे ब्रह्मानंदाचे सगुण साकार स्वरूप असा शिवशंकर नित्य विराजमान आहे. त्याच्यासमोर ऐरावतापेक्षाही विशाल आणि शुभ्र वर्णाचा नंदी बसलेला आहे.” भवानीचे ध्यान
सूत म्हणाले, “श्रोते हो। माता पार्वतीच्या सगुण साकार स्वरूपाबद्दल काय सांगावे? ही त्रिभुवनजननी नितांत सुंदर, सडपातळ व कोमलांगी आहे. शंकराच्या वामांगी विराजमान असलेल्या या जगदंबा भगवतीच्या हातांत अनुक्रमे गदा, पाश, अंकुश व कमळ आहे. तिच्या गळ्यात कल्पतरूच्या सुमनांच्या माळा व मल्लिका, बकुळ, कमळ आदी फुलांचे मनोहर हार आहेत. तिने हत्तींच्या गंडस्थळातील मौक्तिकांची कर्णभूषणे धारण केलेली आहेत. त्यांची अद्भुत शोभा काय वर्णन करावी ? तिचा कटीभाग अतिशय बारीक आहे. तिच्या कंबरेतील कमरपट्टा बारा आदित्यांच्या एकत्रित तेजासमान देदीप्यमान आहे. तिची वेणी भुजंगासारखी आहे. ती कमलमुखी आहे. तिचे नयन आकर्ण आहेत. ती निरुपम लावण्यवती आहे. जगातील सर्व देखण्या स्त्रियांचे सौंदर्य तिच्या पादांगुष्ठावरून ओवाळून टाकावे अशी! कोट्यवधी मदनांची शोभा तिच्यासमोर लज्जित होते! या त्रिपुरसुंदरीच्या अंगसुवासाने सारे ब्रह्मांड व्यापून टाकले आहे. तिच्या पाऊलखुणा उमटतात तिथे रक्तकमळे उगवतात. जेथे तिच्या दंतपंक्तींची प्रभा झळकते, तेथील खडे दिव्यमणी होतात. अखिल ब्रह्मांडमंडपात तीच एकमात्र अलौकिक स्वरूपाची आहे. चंद्र, सूर्य व अग्नी तिच्याच तेजाने प्रकाशतात. ती ब्रह्मा, इंद्रादी देवता या बालकांना आपल्या गर्भात वात्सल्याने धारण करते. तिच्या सौंदर्यानेच त्रिभुवनाला सौंदर्य प्राप्त झाले आहे. तिची कर्णभूषणे इतकी तेजस्वी आहेत की, ती सूर्यचंद्राचे तेज एकवटून बनविली असावीत असेच वाटते. त्यांची प्रभा तिच्या कपाळावर पसरलेली आहे. तिचे अधर उगवतीच्या बालरवीसमान आरक्त आहेत. त्या महादेवीने आपल्या नाकात घातलेले मोती हे त्यांच्या प्रभेमुळे प्रवाळच वाटतात. तिच्या नेत्रांतील दिव्य अंजनाची प्रभा तिच्या गळ्यातील मोत्यांच्या माळेवर पडल्यामुळे त्या मोत्यांवर गुंजेवर असतात तसे शामल ठिपके पडलेले दिसतात. ही जगन्माता हास्य करते, तेव्हा तिच्या दातांची शुभ्र प्रभा अवघा परिसर व्यापून टाकते. तिचे दात म्हणजे ओळीने बसलेल्या धवलवर्ण हंसपंक्तीच! या दंतपंक्ती शुभ्र असल्या तरी तिच्याच अधरप्रभेने आरक्तवर्ण दिसतात. पक्क डाळिंबाचे दाणे दिसतात तशा ! तिच्या श्यामवर्ण अंगकांतीच्या तेजस्वी प्रभेमुळे तिने गळ्यात धारण केलेले मोत्यांचे हार हे इंद्रनील मण्यांचे बनविलेले आहेत असे वाटतात. गजानन व षडानन यांना अमृतपान देणाऱ्या या विश्वजननीचे उरोज कमंडलूप्रमाणे घाटदार व शोभिवंत आहेत. तिचे वस्त्र प्रलयकाळच्या विजा विणूनच बनविलेले असावे एवढे झगझगीत आहे. मोत्यांचे विणकाम केलेली तिची कंचुकी सतेज व शोभिवंत आहे. तिची बाहुभूषणे मौल्यवान रत्नांनंद मढविलेली असून ती वेगळ्याच तेजाने झळकतात. इंद्रनील रत्नांप्रमाणे विग्रहवर्ण असलेली ही आदिमाता आदिपुरुषाची ज्ञानकळा आहे. ती लीलेने अनंत वेष धारण करणारी, भक्तांवर कृपा करणारी, दुष्टांसाठी प्रलयंकारी रूप धारण करून त्यांचा संहार करणारी आणि ब्रह्मांडमाळांची घडामोड करणारी आहे. तिचे अद्वितीय स्वरूप पाहताना स्वत: शंकरही तटस्थ होतो. तिच्या कानात डोलणारे मोत्यांचे घोस हे आकाशात झळकणारे कृत्तिकापुंजच होत. तिच्या भाळीची लालबुंद कुंकुमरेखा सकाळसंध्याकाळच्या क्षितिजशोभेलाही कमीपणा आणील अशी आहे. प्रलयकाळी सर्व विश्वव्यवहार गिळकृत करून शंकर सगुणाचा निर्गुण झाला तरी हिचे सौभाग्य अखंडच राहते. हिने आधी दक्षकन्या होऊन आणि नंतर हिमालयाची कन्या होऊन शंकराला वरिले. तिच्या भाळी बिजवरा हे भूषण खूपच शोभून दिसते. तांबूलसेवनाने तिचे मुखसौंदर्य किती अप्रतिम दिसते याचे विलक्षण आनंददायी वर्णन कवींनी वेगवेगळ्या प्रकारे केलेले आहे. तिची वेणी प्रयागक्षेत्री संगमावर एकत्र येणाऱ्या तीन नद्यांच्या प्रवाहासारखी · तिपेडी आहे. तिच्या बाबतीत कृष्णवर्ण कुरळ्या कुंतलाची वेणी ही यमुना, त्यावर माळलेले शुभ्र फुलांचे हार ही गंगा व लाल फुलांचे हार म्हणजे सरस्वती असेही म्हणता येईल. तिच्या वेणीतील मूद, राखडी हे अलंकार म्हणजे तिच्या वेणीरूपी सरिताप्रवाहातील मत्स्य, कूर्मादी जलचरच! तिच्या केशाग्री बांधलेला गुच्छ म्हणजे सागर! तिच्या गळ्यातील मोहनमाळ ही जणू ब्रह्मांडांचे मणी ओवूनच तयार केलेली आहे. जीव आणि शिव हेच तिचे स्तन, तिने सावरून धरलेले हे दोन पक्षीच आहेत जणू! अक्षय सौभाग्याचे प्रतीक म्हणून तिने आपल्या हातात वज्रचुडे धारण केले आहेत. तिच्या दाही बोटांत दहा मुद्रिका आहेत. या दहा मुद्रिका म्हणजे तिच्या बंधूने, विष्णूने घेतलेले दशावतारच होत. तिच्या पायांतील नूपुरांचा मधुर ध्वनी ऐकून समाधिमग्न शंकर भानावर येतो. त्याच्या नेत्रांचे चकोर पक्षी तिचा मुखचंद्रमा पाहून धन्य होतात. एकनिष्ठ भक्त हेच तिच्या चरणांगुलीतील दोल्हारे, जोडवी आदी अलंकार !”
सूत म्हणाले, “श्रोते हो! मी तुम्हांला शिवपार्वतीचे सगुण साकार दिव्य स्वरूप कसे आहे, ते वर्णन करून सांगितले. उमा-महेश्वराचे व्रत करताना शिव-पार्वतीचे हेच दिव्य स्वरूप शारदा मनःचक्षूसमोर आणून त्यांचे ध्यान करीत असे.”
अशा प्रकारे शारदेने वर्षभर व्रताचरण केले. नैधृवांनी तिच्याकडून यथाविधि उद्यापन करविले. त्या वेळी तिने अकराशे दांपत्यांची पूजा केली. त्यांना भोजन, वस्त्रालंकार व द्रव्यदक्षिणा देऊन संतुष्ट केले. सायंकाळी जप, ध्यान व कीर्तन केले. मध्यरात्रीच्या समयास शारदा नैधृवांच्या जवळ बसून उमामहेश्वराचे चिंतन करीत होती. तोच साक्षात माता भवानी तेथे प्रकट झाली. सर्वत्र विलक्षण तेज पसरले. मातेच्या कृपाप्रसादाने नैधृवांना दृष्टी आली. देवीच्या दर्शनाने नैधृव आणि शारदा यांना परमानंद झाला होता. दोघांनी तिला वंदन केले. अत्यंत प्रेमपूर्वक तिचे स्तवन केले, म्हणाले, “हे भवानी जगदंबे ! तुझा जयजयकार असो! तू जगाच्या उत्पत्तीला कारण असणारी मूळप्रकृती आहेस. तू ॐकारस्वरूप आणि स्वयंभू आहेस. तू ब्रह्मानंद देणारी आहेस, सर्वांचा आरंभ आहेस, चैतन्यरूपाने विलास करणारी माया आहेस. तू हिमालयाची कन्या आहेस. तू सौभाग्याची सरिता आहेस. हे हेरंबजननी! तू भक्तांच्या हृदयरूपी कमळात रमणारी भ्रमरी आहेस. चैतन्याची खनीच अशी तू वेदपुराणांनाही वंदनीय आहेस. तू कृपा केलीस तर जन्मांधाला दृष्टी येते, पंगू मनुष्य अव्यंग होऊन वाऱ्याच्या वेगाने धावतो, मुका बोलू लागतो, मुर्खाला शहाणपण येते, वाळूच्या खड्यांची दिव्य रत्ने होतात आणि गारगोट्यांचे चिंतामणीत रूपांतर होते. हे आई ! तुझा प्रभाव अचिंत्य आहे. तुझे लीलाकर्तृत्व अगाध आहे. तू भक्तांचे पालन करतेस. मरगळलेल्या मनाला नवा उत्साह, नवा उल्हास व नवीन स्फूर्ती देतेस. तू संसारभय नष्ट करणारी आहेस.. तू वेदांची माता असून ब्राह्मणांच्या आणि विद्वज्जनांच्या मनाकरण्याचा देणारी आहेस. ब्राह्मादिक देवश्रेष्ठी नेहमी तुझेच ध्यान करतात. हे भवानी ! तू त्रिपुरसुंदरी आहेस, त्रिभुवनाची जननी आहेस. तू त्रिविध दोषांचे आणि त्रिविध तापांचे हरण करणारी आहेस. जे परमभक्त त्रिकाळ तुझे ध्यान करतात ते जड, सूक्ष्म व कारण हे तिन्ही देह ओलांडून जातात. हे मृडानी ! तू शंकराच्या मनोरूपी सरोवरात बिहार करणारी हंसी आहेस. तू विज्ञानरूपी चाफ्याची कलिका आहेस. तू सर्वव्यापक आहेस. तूच सर्व प्रकारे कल्याण करणारी व ऐश्वर्य देणारी आहेस. तुझा जयजयकार असो !”
ते भावपूर्ण स्तवन ऐकून देवी पार्वती प्रसन्न झाली. ती शारदेला म्हणाली, “तुझ्या सेवाभक्तीने मी संतुष्ट झाले आहे, तरी वरदान मागून घे.” नैधृव ऋषींनी देवीला शारदेचे सर्व वृत्त सांगितले व म्हणाले, “माते, तू सर्वसमर्थ आहेस. मनात आणले तर काहीही करू शकतेस. म्हणून या मुलीला मी जो आशीर्वाद दिलेला आहे, तो तू पूर्ण करावा अशी माझी प्रार्थना आहे.”
तेव्हा शारदेच्या कल्याणासाठी ऋषींच्या मनात असलेला सद्भाव जाणून भगवती म्हणाली, “मुनिवर, पूर्वजन्मी ही शारदा द्रविड देशातील एका ब्राह्मणाची कन्या होती. हिचे भामिनी असे नाव होते. हिच्या नवऱ्याला दोन स्त्रिया होत्या. ही त्याची दुसरी बायको होती. ही सुस्वरूप व मृदुभाषिणी होती. हिने युक्तिप्रयुक्तीने नवऱ्याला आपल्याच आधीन करून ठेवले. त्यामुळे तो पहिल्या बायकोकडे दुर्लक्ष करू लागला. हिच्या सासरच्या घराशेजारी एक व्यभिचारी मनुष्य राहत असे. भामिनीचे सौंदर्य पाहून तो हिच्यावर आसक्त झाला होता. हिच्यावर पापदृष्टी ठेवून होता. एके दिवशी त्याने संधी साधली. आसपास कोणी नाही असे पाहून त्याने हिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पण हिने दाद लागू दिली नाही. त्याला झिडकारले, कठोर शब्दांत त्याची निंदा करून त्याला घालवून दिले. पण हिच्यासाठी तो झुरतच राहिला आणि अंती हिचा ध्यास घेऊनच मरण पावला. हिच्यामुळे सवतीला पतीचे प्रेम व सौख्य लाभले नाही म्हणून तिनेही हिला ‘तू विधवा होशील’ असा शाप दिला. हिने दिलेल्या दु:खामुळे ती मरण पावली. कालांतराने हिलाही मरण आले. ती भामिनीच शारदा म्हणून जन्मली. जारालाही पुरुषाचा जन्म मिळाला. तोच पद्मनाथ. त्याचे हिच्याशी लग्न झाले. पूर्वजन्मी परस्त्रीवर डोळा ठेवला या कुकर्मामुळे त्याचा सर्पदंशाने मुत्यू झाला. शारदेला वैधव्य आले. पूर्वजन्मी तिच्या सवतीने दिलेला शाप या जन्मी खरा ठरला ! कर्माची गती खूप गहन असते. प्रत्येकाला त्याच्या बऱ्यावाईट कृतकर्माचे फळ भोगावेच लागते. असो.
पूर्वजन्मातील भामिनीचा जो पती होता त्यालाही आता ब्राह्मणाचा जन्म मिळालेला आहे. तो येथून तिनशेसाठ योजने दूर द्रविड देशात आहे. आजही त्याला भामिनीचे स्मरण आहे. हिचे स्वरूप आठवून तो तळमळत असतो. तो रोज हिच्या स्वप्नात येईल. हिला प्रेमाने अंगसंग देईल. त्यामुळे हिला गर्भधारणा होईल. ही एका पुत्रास जन्म देईल. त्याचे नाव ‘शारदानंदन’ ठेवावे. तो सर्वत्र प्रख्यात होईल. स्वप्नामध्ये एकमेकांचा सहवास लाभल्यामुळे शारदेला आणि त्या ब्राह्मणाला सुख लाभेल.” बोलणे पूर्ण होताच भवानी अंतर्धान पावली.
भगवतीच्या आशीर्वादाने शारदेला पुढे स्वप्नात तसाच अनुभव येऊ लागला. द्रविड देशातील तिचा पती तिला स्वप्नामध्ये भोगदान देऊ लागला. या संबंधातून शारदेला दिवस गेले. ही गोष्ट समाजाला कशी पचणार? ते तिची निंदा करू लागले. शारदेचे सासू-सासरे, दीर, आप्त, सोयरे देवरथाच्या घरी येऊन थडकले. ते सर्व जण शारदेला दूषणे देऊ लागले. शारदेने आणि तिच्या घरच्यांनी त्या सर्वांना वस्तुस्थिती सांगून समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण व्यर्थ! तिला देवीचे दर्शन झाले, स्वप्नात ब्राह्मणाचा सहवास लाभून गर्भधारणा झाली, या कथांवर त्यांचा विश्वास बसेना. लोक तिच्यावर व्यभिचाराचा आरोप करू लागले. तिचे नाक व कान कापून तिची गाढवावरून धिंड काढण्याची भाषा करू लागले. तोच आकाशवाणी झाली- “शारदेला दोष देऊ नका. ती म्हणते तेच सत्य आहे.” पण संतापलेल्या लोकांना ती आकाशावाणीही कपटाचा खेळ वाटला.
त्यात एक पुण्यवान आणि विवेकी वृद्ध मनुष्य होता. शारदेची बाजू घेऊन तो लोकांना म्हणाला, “बाबांनो! थांबा ! आततायीपणा करू नका. ईश्वरी मायेचे कर्तृत्व अचिंत्य आणि अगाध आहे. कोणालाही तिचा थांग लागत नाही. ती कोणतेही अघटित लीलया घडवू शकते. तिने खांबाशिवाय आकाश तोलून धरले आहे. सूर्य, चंद्र, ग्रहनक्षत्रे यांना कोणाचा आधार आहे ? सर्व देहांमध्ये एकच परमेश्वर व्याप्त आहे, मग तो शोधूनही का सापडत नाही ? पंचमहाभूतांचे परस्पर वैर सर्वश्रुत आहे. मग तीच शरीरामध्ये परस्परांशी एकरूप होऊन एकीने कसे कार्य करतात ? गर्भातील बाळ कसे मोठे होते? त्याच्यात चेतना कोठून येते? त्याला हातपाय अवयव कसे प्राप्त होतात ? तेथे त्याचे रक्षण कोण करतो ? काळ्या खोडातून व फांद्यांतून हिरवी पाने कशी प्रकट होतात? त्यांची फुले व फळे विविधरंगी, विविध आकाराची, विविध गुणधर्मांची कशी ? विचार करून बुद्धी कुंठीत होते! हेच तर ईश्वरी सत्तेचे अगाद सामर्थ्य आहे! तो जगन्नाथ काय करू शकत नाही, ते विचारा ! पूर्वी यूपकेतू राजाचे वीर्य जलात पडले होते. ते जल एका वेश्येने प्राशन केल्यामुळे तिला गर्भधारणा होऊन तिने एका उत्तम आणि गुणवान पुत्राला जन्म दिला. विभांडकाचा विर्यांश जलात पडला, तो प्राशन केल्यामुळे हरिणी गर्भवती झाली. तिच्या उदरातून ऋष्यशृंग ऋषीचा जन्म झाला. दशरथाच्या पुत्रकामेष्टी यज्ञात कोणी चमत्कार केला ? सौराष्ट्राच्या राजाने एका हरिणीला प्रेमाने स्पर्श केला. त्या स्पर्शाने गर्भधारणा होऊन ती एक दिव्य मानवपुत्र प्रसवली. उपरिचर वसूच्या वीर्यापासून गर्भ राहून नत्सीच्या उदरी सत्यवतीचा जन्म झाला. तिचा बंधूही तसाच जन्मला. तो पुढे राजपुत्र झाला. महिषीच्या गर्भातून महिषासुर दैत्याचा जन्म झाला.
कित्येक तपस्वी ऋषी एवढे करुणावंत असतात की, स्त्रियांना त्यांच्या संकल्पानेच गर्भ राहतो ! रोहिणीच्या पोटी बलरामाचा जन्म कसा झाला? यादवकुळातील सांबाच्या पोटी मुसळ कोणी जन्माला घातले? कुंतीच्या पोटी पांडवांचा जन्म कसा झाला ? या सर्व गोष्टी तुम्ही खऱ्या मानता ना ! मग शारदेच्या सत्यवचनांवर तुम्ही का विश्वास ठेवत नाही ?”
तो वृद्ध तळमळून सांगत होता. काही जाणते लोक त्याच्याशी सहमत होते. पण दुर्जनांचे काय ? ते तर ऐकायलाच तयार नव्हते. शारदेची निंदा करून तिला अपमानित करीत होते. तोच पुन्हा आकाशवाणी झाली – “मूखनो ! ऐका. आता जो शारदेची निंदा करेल, तिला पापिणी वा व्यभिचारीणी म्हणेल त्याची जीभ चिरली जाऊन तीत किडे पडतील.” तेव्हा सज्जनांनी शारदेची बाजू घेऊन “हे खरे आहे ! शारदा निष्पाप आहे. जे कोणी तिला त्रास देतील त्यांना त्यांच्या दुष्कर्माची फळे भोगावीच लागतील.” असे स्पष्टपणे सांगितले. पण दुर्जनांनी ऐकले नाही. ते म्हणाले, “तुम्ही आपल्या डोळ्यांवर झापडे ओढून घेतली आहे. ही कसली आकाशवाणी। शारदेचे पाप झाकण्यासाठी हिच्या घरच्यांनीच हे सर्व कपटनाट्य रचले आहे.” ते असे म्हणताच किडे पडू उपस्थितांना आकाशवाणीची तत्काळ प्रचिती आली. त्या निंदकांच्या जिव्हा चिरल्या जाऊन त्यातून लागले.
लोकांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. शारदेला वंदन करून ते म्हणाले, “माते! तू जानकी आणि रेणुकेसारखी साध्वी आहेस. पवित्र आहेस.” लोकनिंदा थांबली. नवमास पूर्ण होताच शारदेने एका पुत्राला जन्म दिला. लोक त्याला ‘शारदानंदन’ म्हणू लागले. वद्य पक्षातील चंद्राप्रमाणे तो दिसामासाने वाढू लागला. आठव्या वर्षी उपनयन झाल्यावर तो वेदाध्ययन करू लागला. त्याने चार वेद व सहा शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला, पुराणे मुखोद्गत केली. त्याला विद्वानांमध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली. सर्वत्र कीर्ती झाली. राजे व महाराजे त्याच्या विद्वत्तेची प्रशंसा करू लागले. त्याला सर्वत्र मानसन्मान मिळू लागला. मातेप्रमाणे तोही परम शिवभक्त होता. त्याने आपल्या निर्मळ प्रेमभक्तीने शंकराला प्रसन्न करून घेतले.
एकदा शिवरात्रीची पर्वणी साधण्यासाठी शारदा आपल्या पुत्रासमवेत गोकर्ण क्षेत्री गेली होती. तेथे द्रविड देशातील तो ब्राह्मणही आला होता. हाच शारदेचा पूर्वजन्मीचा पती होता. हाच शारदेला स्वप्नात रोज भेटत असे. एकमेकांना पाहून दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले. अंतरीची खूण पटली! आनंद झाला! शारदेला देवीने पूर्वी सांगितलेले वचन आठवले. ती म्हणाली होती- “मुली, गोकर्ण क्षेत्री तुझी व तुझ्या पतीची गाठभेट होईल तेव्हा उमा-महेशव्रताचे अर्धे पुण्य तू त्याला दे. त्याचा पुत्र त्याच्या स्वाधीन कर. त्याच्या सान्निध्यात चार महिने राहून त्याची सेवा कर. व्रतस्थ राहा. समागम करू नकोस. म्हणजे तू शिवलोकी जाशील.” त्याप्रमाणे शिवरात्रीची यात्रा झाल्यावर शारदेने पतीला वंदन केले. उमा-महेश्वराच्या व्रताचे अर्धे पुण्य त्याला संकल्पपूर्वक प्रदान केले. पुत्राला त्याच्याकडे सोपवून त्याचा प्रतिपाळ करण्यास सांगितले. मग तीही त्याच्याबरोबर द्रविड देशात गेली. व्रतस्थ राहिली. तिचा पुत्र ‘शारदानंदन’ त्या दोघांची शिवपार्वती समजूनच सेवा करीत असे. महापंडित, सेवाभावी, कीर्तिवान आणि मातृपितृभक्त असा पुत्र लाभणे म्हणजे भूलोकीचे सर्वांत मोठे भाग्य ! शिव आणि भवानी ह्यांच्या कृपाप्रसादाने शारदेला हे महद्भाभ्य प्राप्त झाले होते.
जो आपल्या आईवडिलांची सेवा करीत नाही; त्याचे ज्ञान, त्याची तपश्चर्या, त्याची विद्या, त्याचे मोठेपण, त्याचे भाग्य या सर्व गोष्टी व्यर्थच होत. जो पत्नीच्या सग्यासोयऱ्यांना आपल्या घरी मानापानाने ठेवतो, त्यांना हवे नको ते पाहतो पण आपल्या जन्मदात्यांना विचारीत नाही, त्यांना दुःख देतो, कष्ट देतो, अन्नपाणीही देत नाही, त्यांना अपमानित करून बाहेर घालवितो, त्यांना जिव्हारी लागेल असे बोलतो; तो नराधमच! तो षट्शास्त्री असला तरी चांडाळाहूनी अपवित्र होय. त्याचे तोंडही पाहू नये. त्याचा स्पर्श म्हणजे विटाळ ! त्याचा चुकून स्पर्श झाला तरी सचैल स्नान करावे. अशा कृतघ्न आणि महादोषी मनुष्याला यम भयंकर नरकयातना देतो. असो.
• शारदेचा पतीही महातपस्वी आणि योगी होता. काही वर्षांनी तो निधन पावला. त्या वेळी शारदेनेही सहगमन केले. त्या दोघांना शिवलोकी स्थान मिळाले.” श्रीधर कवी म्हणतो, “श्रोते हो! शिवलीलामृत हे एक सुरस आणि दिव्य रसायन आहे. भवरोगाने ग्रस्त झालेल्या कोणीही याचे सेवन करावे. त्याला आरोग्यासह शिवपदही प्राप्त होईल. ज्यांची पूर्वपुण्याई थोर आहे त्यांनाच याची गोडी कळते पण ज्यांचे मरणच जवळ आले आहे त्यांना हे आवडत नाही. भाविक जन हो! श्रीगुरू ब्रह्मानंदाचा कृपाप्रसाद लाभलेला हा श्रीधर तुम्हांला हात जोडून एवढीच विनंती करितो की, शिवचरित्र हे साक्षात अमृत आहे. तुम्ही देवांनी हे आदराने सेवन करा. पुढील अध्यायातील कथा खूपच सुरस आहे. तिच्या श्रवण-पठणाने श्रोता आणि वक्ता पावन होईल. स्वतः शिवपार्वती त्यांचे रक्षण करतील.
स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तरखंडात असलेल्या शिवलीलामृत या महान ग्रंथाचा हा दहावा अध्याय अतिशय गोड आहे. सज्जनांनी तो नित्य श्रवण-पठण करावा.”
|| अध्याय दहावा समाप्त ।। ।। श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥



