
गाळपेर जमिनीवर चारा उत्पादनासाठी लाभार्थी निवडीसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत अर्जमागणी
सांगली, प्रतिनिधी : गाळपेर जमिनीवर चारा उत्पादन घेऊन चारा टंचाई निवारणासाठी लाभार्थी निवडीकरिता पशुसंवर्धन खात्यामार्फत दिनांक 10 फेब्रुवारीपर्यंत पात्र व इच्छुक लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अटी, शर्ती व अर्जाचा नमुना तसेच इतर सर्व आवश्यक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना, पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये चालू वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने पशुधनास आवश्यक असणारा चारा कमी पडू शकतो. यासाठी जिल्ह्यातील जलसंपदा विभाग आणि मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील मोठे प्रकल्प/ मध्यम प्रकल्प/ लघु प्रकल्पांच्या जलाशयातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे बुडीत क्षेत्रातील जमिनी मोकळ्या/उघड्या होणार आहेत. या जमिनीतील ओलावा आणि अत्यावश्यक परिस्थितीत जलाशयातील पाण्याद्वारे उपलब्ध होणारी सिंचनव्यवस्था यामुळे अशा जमिनीवर (गाळपेर जमीन) मोठ्या प्रमाणात चारा पिकांची पेरणी करुन चाऱ्याचे उत्पादन घेणे शक्य असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
000



