
राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात जनजागृती मोहिम सुरू जागतिक लोकसंख्या दिन तीन टप्प्यात साजरा
ठाणे प्रतिनिधी – जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत आरोग्य विभाग मार्फत विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम हा एक महत्वाचा कार्यक्रम असून हा कार्यक्रम लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राबवला जातो. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम राबवण्यात येत आहे.
वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविके मार्फत लाभार्थीचे संतती नियमनाबाबत उपलब्ध पद्धतीबाबत समुपदेशन केले जाते, यावर्षी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त तीन टप्प्यात उपक्रम करत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.
टप्पा पहिला
पूर्व तयारी टप्पा – १ जून ते २० जून दरम्यान कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे महत्त्व पटवून देण्याकरिता आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात आली.
टप्पा दुसरा
दाम्पत्य संपर्क पंधरवडा –दि. २७ जून २०२४ ते १० जुलै २०२४ या कालावधीत दाम्पत्य संपर्क पंधरवडा राबवण्यात आला असून या कालावधीत सर्व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका मार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रातील योग्य जोडप्यांना भेट देवून त्यांना विविध कुटुंब नियोजन पद्धती व साधनांची माहिती देण्यात आली. तसेच त्यांना योग्य त्या पद्धतीचा अवलंब करण्यासाठी समुपदेशन करण्यात आले.
टप्पा तिसरा
लोकसंख्या स्थिरता पंधरवडा – दिनांक ११ जुलै २०२४ ते २४ जुलै २०२४ या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय ठिकाणी शस्त्रक्रिया व तांबी बसविण्याची शिबिरे आयोजित केली असून आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकेंच्या माध्यमातून पात्र जोडप्यांना निरोध व गर्भनिरोधक गोळ्या या संतती प्रतिबंधक साधनांचे वाटप करण्यात येतील. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कुटुंब नियोजन कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गुणगौरव समारंभ देखील आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.
ठाणे जिल्हा ग्रामीण मधील जननक्षम जोडप्यांची माहिती
एप्रिल २०२४ मधील कुटुंब कल्याण सर्वेनुसार ठाणे ग्रामीण जिल्ह्याची लोकसंख्या ही १४७९९९५ असून १५ ते ४९ वयोगटातील एकूण जननक्षम जोडपी २०६५८७ असून त्यापैकी १२५४९२ एवढी जोडपी कुटुंब नियोजन पद्धतीने संरक्षित झालेली आहेत. ठाणे जिल्हा ग्रामीण अंतर्गत पुरुष ७५५१०० संख्या, स्त्री ७२४८९५ संख्या इतकी असून एकूण लोकसंख्या १४७९९९५ आहे.
कुटुंब कल्याण कार्यक्रमात अंतरा कार्यक्रमाचा समावेश
देशामध्ये कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत चार राज्यात अंतरा कार्यक्रमाअंतर्गत इंजेक्शन एमपीए चा समावेश करण्यात आला आहे, या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा समावेश आहे. इंजेक्शन एमपीए हे महिलांनी घ्यावयाचे इंजेक्शन असून एकदा इंजेक्शन घेतल्यावर ३ महीने गर्भधारणा होत नाही.
कुटुंब कल्याण कार्यक्रमामध्ये पीपीआययुसीडीचा समावेश
पीपीआययुसीडी म्हणजे प्रसूती पश्चात तांबी. ही तांबी प्रसूती पश्चात ४८ तासात प्रशिक्षित डॉक्टर/ परिचारिका यांच्याकडून बसविली जाते. ही तांबी बसविल्यानंतर १० वर्षांपर्यंत पाळणा लांबविता येतो. प्रसूतीनंतर लगेच ही तांबी बसविली जात असल्याने वेगळे हॉस्पिटलायझेशन करावे लागत नाही. जंतुसंसर्गाचा धोका राहत नाही.
(सोबत – फोटो)



