
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठीशेतकऱ्यांनी 21 सप्टेंबर पासून मोहिमेत सहभागी व्हावेत- विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने
ठाणे,(जिमाका) :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना(पी एम किसान) अंतर्गत 18 व्या हप्त्याचे वितरण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होत आहे. त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हफ्ता वितरित होणार आहे.
महाराष्ट्र राज्यात सध्या ६,२१,४०२ स्वयंनोंदणीकृत लाभार्थी अर्ज तालुका तसेच जिल्हास्तरावरील मान्यतेवाचून लाभासाठी प्रलंबित आहेत. दि.21 ते 25 सप्टेंबर 2024 दरम्यान कृषी विभागामार्फत मोहीम राबविण्यात येणार असून त्यामध्ये योजनेच्या पात्रता निकषांच्या आधारे- 1) स्वयंनोंदणीकृत लाभार्थी अर्ज प्रलंबित ( Self Registration approval pending) असलेल्यापैकी पूर्ण असल्यास स्वीकृती करणे (Accept) किंवा अपूर्ण अर्ज नाकारणे (Reject) ची कार्यवाही करण्यात येणार आहे. 2) अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा पात्र करणे प्रलंबित ( Revocation pending) असल्यास पात्र करण्यात येणार आहे. त्यासाठी सक्षम कागदपत्र पुराव्या आधारे (Based on evidence ) निर्णय घेण्यात येणार आहेत. त्याच बरोबर 3) पीजी पोर्टलवरील, आपले सरकार पोर्टलवरील व इतर सर्व योजनेच्या निगडित तक्रारी जिल्हा / तालुकास्तरावरून निकाली काढण्यात येणार आहेत. तशा सक्त सूचना आयुक्त कृषी यांनी दिलेल्या आहेत.
मोहिमेचे आयोजन कृषी विभाग-तालुकास्तरीय नोडल अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी (TNO) मार्फत युद्धपातळीवर सुरू असून प्रलंबित लाभार्थ्यांच्या याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मोहिमेबाबत प्रत्येक गावामध्ये नोटीस लावून, दवंडी देवून तसेच प्रसारमाध्यमे, व्हाट्सअप ग्रुपवर प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे. पी एम किसान योजनेत स्वयंनोंदणी अर्ज करून व पात्र असताना सुदधा अपात्र केलेल्या लाभार्थ्यांनी 18 व्या हप्त्याच्या लाभासाठी आजच कृषी विभागाच्या कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.
00000000000



