
विधानसभानिवडणूक२०२४- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार.. आचारसंहिता लागू
राज्य प्रतिनिधी;आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि झारखंड राज्यातील निवडणुकांची घोषणा केली आहे महाराष्ट्र विधानसभा राज्यात विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार असून एकाच टप्प्यात मतदान होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त कुमार यांनी दिली.
निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने महाराष्ट्रासह झारखंडमध्ये विधानसभेची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यावेळी निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू यांच्यासह निवडणूक अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत असून झारखंड विधानसभेची मुदत देखील ५ जानेवारी २०२५ रोजी संपत आहे. याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यासह झारखंड विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात २० नोव्हेंबरला मतदान होईल. २३ नोव्हेंबर या कालावधीत मतमोजणी आणि त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. त्यामुळे आता राजकीय पक्षांचे दौरे, मेळावे, सभांना अधिकच वेग येईल.
यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक कार्यक्रमाची माहिती देताना, काही दिवसांपूर्वीच आम्ही महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांना भेट दिली होती. आम्ही तेथील सर्व व्यवस्थेचा अभ्यास केला होता. महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे असून २८८ जागांवर मतदान होणार आहे. यातील २३४ जागा या सर्वधाराण उमेदवारांसाठी असून एसटी प्रवर्गासाठी २५ तर २९ जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. तर १ लाख १८६ पोलिंग बुथ असतील. तर राज्यात एकूण ९.६३ कोटी मतदार असल्याचेही मुख्य निवडणूक आयुक्त कुमार यांनी माहिती दिली.
उमेदवारी अर्जाची मुदत
निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे २० नोव्हेंबरला मतदान होईल. तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. यामुळे आता उमेदवारांना २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावा लागेल. तर अर्जाची छाननी ३० ऑक्टोबरपर्यंत होणार असून ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज उमेदवारांना मागे घेता येणार आहे
.दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. जागा वाटपासह उमेदवारांची चाचपणी देखील केली जात आहे. दरम्यान राज्यपाल नियुक्त ७ आमदारांचा शपथविधी देखील आज उरकण्यात आल्याने आजपासूनच राज्यात आचारसंहिता लागू शकते, अशी चर्चा रंगली होती. यानंतर आता आयोगाने याबाबत पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला.



