रक्तदान हेच श्रेष्ठ दान-ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातपुढील आठवडाभर होणार रक्तदान शिबिराचे आयोजन
ठाणे, प्रतिनिधी:- असे म्हणतात की, एका व्यक्तीने रक्तदान केल्यानंतर त्या रक्ताचे सर्व महत्त्वाचे घटक बाजूला करून पाच लोकांचा जीव वाचविला जाऊ शकतो. म्हणूनच “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” असे मानले जाते. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना लागणाऱ्या रक्ताचा तुटवडा भासत होता. अशात दिवाळीला नातेवाईकांकडे जाऊन त्यांची विचारपूस करत त्यांना आठवणीत राहील, अशी भेट देण्यापेक्षा ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांच्या प्रेरणादायी विचारातून दिवाळी निमित्ताने वि.सा.सामान्य रुग्णालय येथे भेट देऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले.
त्या आवाहनाला प्रतिसाद देत गुरुवार, दि.6 नोव्हेंबर 2024 पासून पुढील एक आठवडा रक्तपेढी विभाग (ब्लड बँक), सिव्हील रूग्णालय, ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ, ठाणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
या प्रेरणादायी विचारांना कृतीत आणून जनजागृतीचे उत्तम उदाहरण म्हणजे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धीरज महांगडे यांनी सर्वप्रथम रक्तदान करून या शिबिराची सुरुवात केली.
याप्रसंगी निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) डॉ.मृणाली राहुड, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.राजू काळे, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.गिरीश चौधरी, अधिसेविका श्रीमती प्रतिभा बर्डे या सर्वांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आवाहन करून जनजागृती केली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी उपस्थित सर्व रुग्णालयीन अधिकारी व कर्मचार्र्यांचे आणि रक्तदात्यांचे कौतुक करून मनोबल वाढविले.तरी इच्छुक रक्तदात्यांनी, स्वयंसेवी संस्थांनी, महाविद्यालयीन तरूण-तरूणींनी स्वेच्छेने रक्तदान करण्यास पुढाकार घ्यावा आणि गरजू रुग्णांना मदत करावी व रक्तदान करून या सामाजिक व राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी केले आहे.00000