राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून नमुंमपा मुख्यालयात सामुहिक मतदान शपथ ग्रहण
नवी मुंबई प्रतिनिधी भारत निवडणूक आयोग यांचेमार्फत प्राप्त निर्देशानुसार 25 जानेवारी रोजीच्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नमुंमपा मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे राष्ट्रीय मतदार दिवसाची सामुहिक शपथ महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्यासमवेत सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी ग्रहण केली. मुख्यालयाप्रमाणेच इतरही महापालिका कार्यालयांमध्ये तेथील कार्यालय प्रमुखांनी अधिकारी, कर्मचारी यांच्यासमवेत मतदान शपथ ग्रहण केली.
जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असणारा भारत देश 100 कोटी मतदार नोंदणीकडे वाटचाल करत असून यावर्षीच्या 15 व्या राष्ट्रीय मतदार दिवसाची ‘Nothing Like Voting, I Vote for Sure’ ही संकल्पना घोषित करण्यात आली असून देशातील प्रत्येक मतदाराने आजच्या दिवसाचे औचित्य साधून मतदान प्रक्रियेत उत्साहाने सहभागी होण्याची शपथ घ्यावी असे आवाहन आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी यावेळी केले.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटरच्या एलईडी स्क्रीनवर मतदार जनजागृतीविषयक चित्रफितींचे प्रसारण करण्यात आले. ठिकठिकाणी बॅनर्स, होर्डींग, स्टँडी प्रदर्शित करण्यात आले. त्याचप्रमाणे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्यासमवेत मोठ्या संख्येने उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी सामुहिकरित्या मतदार प्रतिज्ञा ग्रहण केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार, निवडणूक विभागाचे उपआयुक्त श्री.भागवत डोईफोडे, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, महापालिका सचिव श्रीम.चित्रा बाविस्कर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, भांडार विभागाचे उपआयुक्त श्री.शंकर खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखून व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू’ – अशा आशयाची प्रतिज्ञा उपस्थितांनी ग्रहण केली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त पथनाटय, प्रभातफेरी अशा जनजागृतीपर विविध उपक्रमांचे आयोजन नमुंमपा निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाचे उपआयुक्त श्री.भागवत डोईफोडे यांनी दिली आहे.