जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रदर्शनाचे उद्घाटन… जिल्हा प्रशासनाद्वारे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची विविध माध्यमांद्वारे प्रचार-प्रसिद्धी मोहीम सुरु
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रदर्शनाचे उद्घाटन…
जिल्हा प्रशासनाद्वारे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची विविध माध्यमांद्वारे प्रचार-प्रसिद्धी मोहीम सुरु
ठाणे, प्रतिनिधी:- जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण ठाणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे व जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांच्या पुढाकारातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रचार-प्रसिद्धी विविध माध्यमांद्वारे सुरु करण्यात आली आहे.
यानुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्याकरिता आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात माहिती फलकांद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली असून या प्रदर्शनाला जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) हरिश्चंद्र पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप, जिल्हाधिकारी महोदयांचे स्वीय सहाय्यक गिरीष काळे, निवृत्त उपअभियंता मोहन पवार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रणवीरसिंह राजपूत, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या विविध कामांपैकी प्रामुख्याने करावयाचे काम म्हणजे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविणे. यामध्ये ठाणे जिल्हा माहिती कार्यालय निश्चितपणे अग्रेसर आहे. आज या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणारे स्टॅन्डीजचे प्रदर्शन भरविले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसिद्धीचे काम आणखी वेगाने व प्रभावीपणे होणार आहे. समाजातील प्रत्येक वर्गासाठी, जसे की शेतकरी, महिला, कामगार, विद्यार्थी व मुलींसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा एकत्रितपणे गोषवारा तयार करून एका विशिष्ट दिवशी त्या सर्व योजनांची प्रसिद्धी करणे हे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.
या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जनतेपर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या योजना पोहोचविण्यामध्ये निश्चितपणे यश मिळेल. या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचतील व प्रभावी अंमलबजावणी करता येऊ शकेल, असे सांगून ते पुढे म्हणाले की, जनतेच्या सहभागाशिवाय आणि सहकार्याशिवाय कोणतीही योजना यशस्वी होऊ शकत नाही. योजनेमध्ये किंवा त्याच्या अंमलबजावणीमध्ये जनतेचा सकारात्मक प्रतिसाद आम्हाला अपेक्षित आहे आणि तो निश्चितपणे मिळेल याची मला खात्री आहे.
प्रदर्शन, डिजिटल वॉलद्वारे प्रसिद्धी, क्यू आर कोड, शासकीय योजना चित्रफिती व सोशल मिडीया प्रसिद्धी, व्हिडिओ क्रिएटिव्ह, जिल्ह्यातील तलावांवरील चित्रफिती, मोबाईल स्टॅन्डद्वारे प्रसिद्धी, मोबाईल व्हॅन, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांची सोशल मिडियाद्वारे प्रसिद्धी अशा विविध माध्यमांद्वारे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रचार-प्रसिद्धी करण्यात येत असून जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.