vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त वैचारिक अभिवादन

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त वैचारिक अभिवादन

 

     नवी मुंबई  प्रतिनिधी   पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या गुणांपैकी एक तरी गुण मी अंगिकारीन असा निश्चय करणे ही अहिल्यादेवींना खरी आदरांजली असल्याचे मत व्यक्त करीत सुप्रसिध्द लेखक, व्याख्याते डॉ.देविदास पोटे यांनी त्यांच्या जीवनचरित्राचा व अलौकिक कार्याचा विविध प्रसंग, घटना कथन करीत वेध घेतला.

          राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी साहित्यिक डॉ. देविदास पोटे बोलत होते. याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, मुख्य लेखा वित्त अधिकारी श्री. सत्यवान उबाळे तसेच इतर विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध महिला संस्था, बचतगट यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

            ज्ञानदेवांच्या पसायदानातील विश्वकल्याणाची उदात्त प्रार्थना आपल्या कामांमधून मूर्त स्वरूपात साकारण्याचे काम अहिल्यादेवींनी केले असा गौरव करीत डॉ.देविदास पोटे यांनी लोककल्याणकारी राज्याची पाळेमुळे आपल्याला छत्रपती शिवरायांप्रमाणेच अहिल्यादेवींच्या राज्यकारभारात सापडतात असे सांगत सामाजिक क्रांतीकारक, स्वधर्म चिकित्सक, कर्तव्यकठोर प्रशासक, मुत्सद्दी रणरागिणी, स्वाभिमानी, राजकारण धुरंधर, प्रजावत्सल, जलतज्ज्ञ, अभियंता, सृष्टीपालक, मानवताधर्मवादी, स्त्रीहक्कवादी, प्रबोधनकारी, कलोपासक, उद्योगस्नेही, आदर्शवादी, मातृह्रदयी अशा अहिल्यादेवींमधील अनेक गुणांचे विविध उदाहरणे – प्रसंग सांगत विवेचन केले.

            अहिल्याबाई ते अहिल्यादेवी पर्यंतचा त्यांनी केलेला प्रवास आपण जाणून घेऊन त्यापासून शिकले पाहीजे असे सांगतानाच डॉ.देविदास पोटे यांनी जगाच्या इतिहासात अहिल्यादेवी या एकमेव अशा राज्यकर्त्या होत्या ज्यांनी आपल्या राज्याबाहेरही लोकोपयोगी कामे केली अशा शब्दात त्यांची थोरवी सांगितली.

            महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाची महती सांगत त्रिशताब्दी जयंतीनिमित्त स्मरण करतानाच माणसांइतकीच निसर्गातील जीवजंतूंची काळजी घेणा-या त्यांच्या चरित्रापासून बोध आणि प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात बदल घडविला पाहीजे यादृष्टीने आजचा कार्यक्रम महत्वाचा असल्याचे सांगितले.

            नवी मुंबई महानगरपालिका महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविते त्याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन स्वत:चा विकास करून घेण्याचे आवाहन आयुक्तांनी उपस्थित महिलांना केले. बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी ठोस प्रयत्न केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

            त्याचप्रमाणे महिलांच्या आरोग्य जपणुकीसाठी कर्करोगाचे वाढते प्रमाण पाहून दर गुरूवार आणि शुक्रवारी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र पातळीवर तपासणी व लक्षणे आढळल्यास टाटा कॅन्सर रूग्णालयामध्ये तपासणीसाठी संदर्भित केले जात असल्याची व पुढे डायलिसीसची गरज भासल्यास डायलिसीस सुविधाही महानगरपालिकेमार्फत नेरूळ रूग्णालयात सुरू केल्याचे आयुक्तांनी सांगितले. अहिल्यादेवींचा आदर्श ठेवून आदर्श कार्य करण्याचा आपण प्रयत्न करूया असे ते म्हणाले.

            अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कार्य केवळ महिलांसाठीच नव्हे तर सर्व समाजासाठी प्रेरक असल्याचे सांगत प्रशासकीय सेवेत आल्यानंतर तर चरित्रे वाचलीच पाहिजेत असे मत व्यक्त केले.

            अहिल्यादेवींच्या चरित्रातील अनेक गोष्टी सांगून त्यांचे द्रष्टेपण अधोरेखित करताना त्यांनी सैन्यात महिला सैनिकांची स्वतंत्र तुकडी तयार केली, शेतक-यांसाठी झाडे लावण्याची विशेष योजना सुरू करून त्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून दिले, औद्योगिकरणाला चालना दिली, स्त्रियांची पडदा पध्दत दूर केली, सती पध्दतीला विरोध केला, दतक्कविधान सुरू केले, कवी मोरोपंत, आनंदफंदी अशा अनेक विद्वानांना कलावंताना आश्रय दिला, आजच्या काळात आपण प्रमाण कार्यपध्दती अर्थात एसओपी म्हणतो त्या तयार केल्या, हस्तलिखितांसाठी तरतूद केली – अशा अनेक लोककल्याणकारी कामांची माहिती देत अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी आपल्याला महान व्यक्ती माहिती असते पण त्याच्या महनीय कार्याची सखोल माहिती फारशी नसते त्यामुळे आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.

            नवी मुंबई महानगरपालिकेने महिला व बालकल्याणासाठी गतवर्षी 34 कोटी इतक्या रक्कमेच्या योजना, उपक्रम राबविले असून यावर्षीही 50 कोटींची तरतूद केली असल्याचे सांगत श्री.सुनिल पवार यांनी प्रत्येक गरजू महिलेला या योजनांचा लाभ घेता यावा याकरिता उपस्थित महिलांनी जास्तीत जास्त महिलांपर्यंत योजनांची माहिती पोहचविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

            यावेळी महिला सुरक्षा या विषयावर श्रावस्ती नाट्यसंस्थेच्या कलावंतांनी सादर केलेल्या पथनाट्यासही उपस्थितांनी उत्तम दाद दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या उत्तुंग कार्याची माहिती या कार्यक्रमामुळे मिळाली अशा प्रतिक्रिया यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित महिलांनी दिली

संबंधित पोस्ट

खाणीच्या दहा किलोमीटर परिसरातीलभूजल पातळीबाबत वेगळे सर्वेक्षण करणार- खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई

क्वांटम संगणन तंत्रज्ञानामुळे सायबर सुरक्षेसमोर नवे आव्हान– आयबीएमचे संशोधन संचालक अमित सिंघी

संविधान बदलण्याचे नरेटिव्ह पसरiवणारेच संविधान विरोधी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* 

vishwatmaklokswamivarta

जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम

vishwatmaklokswamivarta

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे नी  कवठेएकंदच्या रेशीम धागा निर्मिती केंद्राची पाहणी केली

रेशनिंग तांदळामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी सुरू- राज्यमंत्री योगेश कदम