vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज -उत्तम दिघे

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज -उत्तम दिघे

 

बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक २३ एप्रिल २०२६ रोजी होणार असून या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निवडणूक प्रक्रियेसाठी सर्वंकष तयारी पूर्ण केली असून मतदान सुरळीत, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली आहे.

 

पोटनिवडणुकीसाठी मतदान यंत्रे (ईव्हीएम), व्हीव्हीपॅट, प्रशिक्षित निवडणूक कर्मचारी तसेच पोलिस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सोय, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा तसेच विविध तपासणी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करून निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.

 

बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ८४ हजार ५७९ मतदार असून, त्यामध्ये १ लाख ९३ हजार ८७१ पुरुष, १ लाख ९० हजार ६८४ महिला आणि २४ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. या मतदारांसाठी ४७८ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याकरिता ४७८ ईव्हीएम, ९५६ बॅलेट युनिट्स आणि ४७८ व्हीव्हीपॅट यंत्रे मतदान केंद्रांवर पाठवण्यात येणार आहेत. याशिवाय ६० ईव्हीएम व व्हीव्हीपॅट आणि १२० बॅलेट युनिट्स राखीव आहेत.

 

निवडणूक कामकाजासाठी १६५ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी ६० वाहने, ईव्हीएम मशीन व साहित्य वाहतुकीसाठी ६० बंदिस्त मिनी टेम्पो आणि कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी ४५ बसेसचा समावेश आहे. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वैद्यकीय संच, तसेच मंडप आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. माध्यम प्रतिनिधींना मतदारसंघात वृत्ताकंन प्रवेशिका देण्यात आल्या आहेत. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे पालन सुनिश्चित करण्यासाठी ८ तपासणी नाके (चेकपोस्ट) उभारण्यात आले असून, त्यासाठी १६ स्थिर पथके आणि ८ फ्लाइंग स्क्वॉड कार्यरत आहेत. यासाठी एकूण ९६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोटनिवडणुकीची मतमोजणी ४ मे २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम, एमआयडीसी, बारामती येथे होणार आहे. प्रत्येक नागरिकाने आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती टाळावी आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच निवडणुकीत सर्व पात्र मतदारांनी उर्त्स्फूतपणे सहभागी हाेउन मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

*स्व.शब्बीर अंसारी यांना धार्मिक पातळीवर विरोध असतांनाही मुस्लिम ओबीसींना न्याय मिळवून दिला*सर्वपक्षीय शोकसभेत भावपूर्ण श्रद्धांजली*

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

२० जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यापार परिषद मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचा २८ वा वर्धापन दिन…

सारा नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी आत्महत्या घटनेची चौकशी सुरू- गृहराज्यमंत्री योगेश कदम

ज्ञानेश्वरीतील विश्वात्मक विचार जगाला मार्गदर्शक-मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त सुवर्ण कलशाचे पूजन

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी…

vishwatmaklokswamivarta