vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याला केले संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याला केले संबोधित

नवी दिल्ली प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे आयोजित 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सोहळ्याला संबोधित केले. पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे नेतृत्व केले आणि योगसाधना सत्रात भाग घेतला.यावेळी पंतप्रधानांनी आपल्या संबोधनातून भारत आणि जगभरातील लोकांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या, तसेच 21 जून रोजी एकत्रितपणे योग साधना करण्यासाठी जग एकत्र येण्याचा हा अकरावा प्रसंग असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. एकजूट होणे हेच योग साधनेचे सार आहे आणि योग साधनेने ज्या रितीने जगाला एकत्र आणले आहे ते पाहणे आनंददायी असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी गेल्या दशकभरातील योग साधनेच्या प्रवासाचाही मागोवा घेतला. भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कल्पनेचा प्रस्ताव मांडलेल्या क्षणाची आठवण त्यांनी सांगितली. त्यावेळी 175 देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला, इतक्या व्यापक जागतिक एकतेचे हे एक दुर्मिळ उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले. हा पाठिंबा केवळ एका प्रस्तावासाठी नव्हता, तर मानवतेच्या मोठ्या कल्याणासाठी जगाने केलेल्या सामूहिक प्रयत्नांचे ते प्रतिनिधित्व करत होते, ही बाब त्यांनी आवर्जून नमूद केली. आता अकरा वर्षांनंतर, योग साधना जगभरातील लाखो लोकांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला असल्याचे ते म्हणाले. दिव्यांग व्यक्ती ब्रेल लिपीत ज्या रितीने योग ग्रंथ वाचतात, आणि शास्त्रज्ञ अवकाशात ज्या रितीने योग साधना करतात ते पाहून अभिमान वाटत असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील युवा वर्गाने योग ऑलिंपियाडमध्ये उत्साहाने भाग घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. सिडनी ऑपेरा हाऊसच्या पायऱ्या असोत, माउंट एव्हरेस्टचे शिखर असो, अथवा समुद्राची अथांगता असो, अगदी प्रत्येक ठिकाणी सीमांच्या पलीकडे, पार्श्वभूमीच्या पलीकडे, वय किंवा क्षमतेच्या पलीकडे,ही योग प्रत्येकासाठी आणि सर्वांसाठी आहे हा एकच संदेश असतो असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

विशाखापट्टणममधल्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. हे शहर निसर्ग आणि प्रगतीचा संगम असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी लोकांचे कौतुक केले आणि चंद्राबाबू नायडू तसेच पवन कल्याण यांचेही त्यांच्या नेतृत्वासाठी अभिनंदन केले. या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली, आंध्र प्रदेशने योगआंध्र अभियान हा एक उल्लेखनीय उपक्रम सुरू केला असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. नारा लोकेश यांच्या प्रयत्नांचेही त्यांनी विशेष कौतुक केले. योग कशा रितीने एक खरा सामाजिक उत्सव बनू शकतो आणि समाजातील प्रत्येक घटकाला त्यात कसे सामावून घेतले जाऊ शकते हे नारा लोकेश यांनी दाखवून दिले आहे असे ते म्हणाले. गेल्या दीड महिन्यांत, लोकेश यांनी योगआंध्र अभियानातून अनुकरणीय वचनबद्धता दर्शविली आहे आणि त्यांच्या प्रयत्नांसाठी ते कौतुकास पात्र आहेत असे पंतप्रधान म्हणाले.

2 कोटींहून अधिक लोक योगआंध्र अभियानात सामील झाले आहेत, यातून सार्वजनिक सहभागाची चैतन्यमय भावना दिसून येते ही बाब पंतप्रधानांनी नमूद केली. या भावनेतूनच विकसित भारताचा पाया रचला जात असल्याचे ते म्हणाले. जेव्हा नागरिक स्वतः एखाद्या अभियानाची जबाबदारी घेतात आणि त्यात सक्रियपणे सहभागी होतात, त्यावेळी कोणतेही ध्येय आवाक्याबाहेर राहत नाही, असे ते म्हणाले. विशाखापट्टणममधील संपूर्ण कार्यक्रमात लोकांच्या सदिच्छा आणि उत्साही प्रयत्न दिसून आल्याचेही त्यांनी नमूद केले.

या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या एक पृथ्वी, एक आरोग्य यासाठी योग या संकल्पनेचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. या संकल्पनेतून, पृथ्वीवरील प्रत्येक घटकाचे आरोग्य परस्परांशी जोडलेले आहे या एका गहन सत्याची प्रचिती येते असे ते म्हणाले. मानवी कल्याण, आपले अन्न पिकवणाऱ्या मातीच्या आरोग्यावर, आपल्या पाणी पुरवणाऱ्या नद्यांवर, आपल्या परिसंस्थेत राहात असलेल्या प्राण्यांवर आणि आपल्याला पोषण देणाऱ्या वनस्पतींवर अवलंबून असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. योग साधना आपल्याला या परस्पर संबंधांची जाणीव करून देते आणि जगाशी एकरूप होण्याच्या प्रवासात आपल्याला मार्गदर्शन करत राहते असे ते म्हणाले. या जगात केवळ आपल्या एकट्याचे अस्तित्व नाही, तर आपण निसर्गाचे अविभाज्य भाग आहोत याची शिकवण योग आपल्याला देते ही बाब त्यांनी अधोरेखित केली. सुरुवातीला आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याची आणि कल्याणाची काळजी घ्यायला शिकतो, पण हळूहळू, ही काळजी आपल्या पर्यावरणापर्यंत, समाजापर्यंत आणि ग्रहापर्यंत विस्तारत जाते असे त्यांनी सांगितले. योग साधना म्हणजे एक मोठी वैयक्तिक शिस्त आहे, मात्र त्याच वेळी ही एक अशी सामूहिक व्यवस्था आहे, ज्याअंतर्गत व्यक्ती ‘मी’ पासून ते ‘आपण’ या भावनेपर्यंतची वाटचाल करतो असे पंतप्रधानांनी सांगितले.

“‘मी’ ते ‘आपण’ ही भावना भारताचा आत्मा आहे,” ही बाब त्यांनी अधोरेखित केली. जेव्हा एखादी व्यक्ती केवळ स्वतःचा स्वार्थ टाळत, त्यापलिकडे मोठ्या प्रमाणात समाजाबद्दल विचार करू लागते, त्यावेळेसच संपूर्ण मानवतेचे कल्याण शक्य होते असे ते म्हणाले. भारतीय संस्कृती आपल्याला सर्वे भवन्तु सुखिनः, अर्थात सर्वांचे कल्याण हेच आपले पवित्र कर्तव्य आहे या मूल्याची शिकवण देते, आणि मी पासून ते आपण या भावनेपर्यंतचा हा प्रवास सेवा, समर्पण आणि सहअस्तित्वाचा पाया रचतो असे त्यांनी सांगितले. याच विचारांतून सामाजिक सलोखाही वाढतो असे त्यांनी सांगितले.

यावेळी पंतप्रधानांनी जगाच्या विविध भागांमध्ये वाढलेल्या तणाव, अशांतता आणि अस्थिरतेबद्दल चिंता व्यक्त केली. अशा काळात, योग साधना शांततेचा मार्ग देत असून, योग हे श्वास घेण्यासाठी, संतुलन साधण्यासाठी, पुन्हा पूर्णत्वापर्यंत पोहचण्याच्या दृष्टीने मानवतेसाठी गरजेचे असलेले विरामाचे बटण झाले असल्याचे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी जागतिक समुदायालाही विशेष आवाहन केले. हा योग दिन, जिथे आत्मिक शांतता जागतिक धोरण असेल अशा प्रकारच्या Yoga for Humanity 2.0 सुरुवात ठरो अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

योग केवळ वैयक्तिक साधना राहू नये तर जागतिक भागीदारीचे माध्यम बनला पाहिजे यावर त्यांनी भर दिला. त्यांनी प्रत्येक राष्ट्र आणि प्रत्येक समाजाला त्यांच्या जीवनशैलीत आणि सार्वजनिक धोरणात योगचा समावेश करण्याचे आवाहन केले. शांततापूर्ण, संतुलित आणि शाश्वत जग निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची कल्पना मोदी यांनी स्पष्ट केली. “योगाने जगाला संघर्षाकडून सहकार्याकडे आणि तणावाकडून उपायांकडे मार्गदर्शित केले पाहिजे”, असेही ते म्हणाले.

 

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौरा; नाशिक येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे होणार उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

आयकर विवरण सुधारणा करण्यास ३१ मार्चपर्यंत मुदत

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 काय करावे व काय करु नये मार्गदर्शक सूचना जारी…

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी -बीड जिल्ह्याचे चे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी पैठणमध्ये आक्रोश मोर्चा चे आयोजन

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत411 कोटी 17 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी

vishwatmaklokswamivarta

जिवायो निधी खर्चाचे नियोजन करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta