सांगली, प्रतिनिधी: जिल्ह्यात झालेला पाऊस, धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे अधिक प्रमाण व कोयना व वारणा धरणातील विसर्ग लक्षात घेता कृष्णा व कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सद्यस्थितीत धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणांतून होत असलेल्या विसर्गामुळे आयर्विन पूलाच्या ठिकाणची कृष्णा नदीचे पाणी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील सर्व प्रमुख यंत्रणा अलर्ट मोडवर असून, सांघिक आपत्ती व्यवस्थापनासाठी दक्ष आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वेळोवेळी आढावा घेऊन तातडीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका व पोलीस प्रशासनासह सर्व संबंधित यंत्रणा सतर्क असून परस्पर समन्वय राखून आहेत.
नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, नागरिकांनीही सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे. तसेच अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्यात यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोयना धरणातून 95 हजार 300 क्युसेक, वारणा धरणातून 39663 क्युसेक तर अलमट्टी धरणातून 2 लाख 50 हजार क्युसेक विसर्ग सुरू होता. जिल्ह्यातील 7 राज्यमार्ग, 15 प्रमुख जिल्हा मार्ग, 8 ग्रामीण मार्ग आणि 1 इतर जिल्हा मार्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे. कृष्णा व वारणा नदीपात्राशेजारील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक व तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पुराच्या पाण्याच्या ठिकाणी मनाई आदेश देण्यात आले आहेत. स्थलांतरीत नागरिकांसाठी निवारा केंद्रात निवास, भोजन यासह आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रशासनाच्या सतत संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधीही त्यांच्या क्षेत्रातील शासकीय यंत्रणा व नागरिकांच्या संपर्कात असून, प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांशी संवाद साधत आहेत. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज शिराळा तहसील कार्यालयात बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, काही ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे दिलेल्या सूचनानुसार जिल्हा परिषदेतील प्रमुख अधिकारी यांनीही मिरज, वाळवा, शिराळा, पलूस आदि तालुक्यातील बाधित व संभाव्य बाधित होणाऱ्या ठिकाणी भेट देवून पाहणी केली. महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी दि. 19 रोजी रात्री संभाव्य बाधित ठिकाणी भेट देऊन नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याचे आवाहन केले. तसेच, दि. 20 ऑगस्ट रोजी महापालिका वॉर रूममधून परिस्थितीचा आढावा घेतला.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनीही सांगलीचा सरकारी घाट, आयर्विन पूल, सूर्यवंशी प्लॉट, कर्नाळ रोड आणि शिवशंभौ चोक तसेच शिरगाव, ताकारी, सागाव, शिराळा, इस्लामपूर, बहे, भिलवडी येथेही भेट देऊन पाहणी केली. त्या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त नेमण्याच्या सूचना दिल्या असून, योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आला आहे. जिल्ह्यात लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन झाल्यास तसेच, हुल्लडबाजांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. नदीपूलावर बघ्यांची गर्दी होणार नाही, यासाठी योग्य तो बंदोबस्त नेमला आहे. पुराच्या पाण्यात कोणी अडकल्यास जीवरक्षक दलाच्या मदतीने व्यक्तिचा जीव वाचवण्याचे त्यांनी सूचित केले आहे. मालमत्ता व जीवितहानी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. कर्नाळ रोड दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला असून योग्य तो पोलीस बंदोबस्त केला आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार आवश्यकतेनुसार नागरिकांचे तात्पुरत्या स्वरुपामध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. स्थलांतरीत कुटुंबांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे – शिराळा – सोनवडे, चरण, आरळा, काळुंद्रे, स्थलांतरीत कुटुंबांची संख्या – 21, बाधित लोकसंख्या – 88, तालुका वाळवा – जुने खेड, स्थलांतरीत कुटुंबांची संख्या – 17, बाधित लोकसंख्या –56, गौडवाडी स्थलांतरीत कुटुंबांची संख्या – 2, बाधित लोकसंख्या – 8, तालुका पलूस – माळवाडी, स्थलांतरीत कुटुंबांची संख्या – 3, बाधित लोकसंख्या –13, निवाऱ्यातील लोकसंख्या-13, निवाऱ्यातील जनावरांची संख्या -2, निवाऱ्याचे ठिकाण जि.प.शाळा माळवाडी, मिरज ग्रामीण भागात निवाऱ्यातील जनावरांची संख्या – 72,
महानगरपालिका क्षेत्रात 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सूर्यवंशी प्लॉट, आरवाडे पार्क, कर्नाळ रोड पटवर्धन कॉलनी, जामवाडी, शिवशंभो चौक, दत्तनगर आदि बाधित परिसरातील 91 कुटुंबातील 471 नागरिकांचे नातेवाईकांकडे व 22 कुटुंबातील 93 नागरिकांचे महापालिका निवारा केंद्रात स्थलांतर करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रातील 5 मंगलकार्यालये/सांस्कृतिक भवन यांचे अधिग्रहण करण्यात आले आहे.