मराठा मावळा संघटनेची जालना येथे बैठक-शासन दरबारी मागण्यांसाठी तीव्र आंदोलनाचा संस्थापक अध्यक्ष माणिकराव शिंदे यांचा इशारा
जालना (प्रतिनिधी) : मराठा मावळा संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक जालना शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आज रविवार रोजी पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिकराव शिंदे होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना माणिकराव शिंदे यांनी सांगितले की, मराठा मावळा संघटनेच्या माध्यमातून शेतकरी, युवक व सर्वसामान्य घटकांचे प्रश्न शासन दरबारी ठामपणे मांडले जातील. जर शासनाने मागण्या तातडीने पूर्ण केल्या नाहीत, तर संघटनेमार्फत राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल. शिंदे यांनी पुढे बोलताना संघटनेचे ध्येयधोरण स्पष्ट केले. त्यांनी मागणी केली की, मुंबई येथील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक तातडीने उभारण्यात यावे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ करावी. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत वस्तीगृह उभारले जावेत. प्रत्येक तालुका व जिल्ह्यातील कमिटींनी गोरगरिबांच्या मुलांसाठी वस्तीगृहांची उभारणी करावी. या मागण्याचे निवेदन शासन दरबारी देऊन या मागण्या मान्य करण्यासाठी शासनाला विनंती करण्यात येणार आहे जर या मागण्या पूर्ण न झाल्यास व्यापक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
बैठकीदरम्यान जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील जाहीर करण्यात आल्या. त्यात जिल्हाध्यक्ष : सतीश घारे, जिल्हा उपाध्यक्ष : रमेश तुपे, शहर जिल्हाध्यक्ष : योगेश वाय., शहर उपजिल्हाध्यक्ष : तानाजी गायके (भोकरदन तालुका अध्यक्ष), संपर्कप्रमुख गंगाधर गायके आदींची निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये महाराष्ट्र संघटक भरत कदम, छत्रपती संभाजीनगर शहर प्रमुख संजय गायके, रामदास हांडके, छत्रपती संभाजीनगर महिला जिल्हाध्यक्षा सुनिता, संघटक शोभाताई जाधव, कार्याध्यक्षा पूजाताई तुपे यांचा समावेश होता.मराठा मावळा संघटनेची ही बैठक अत्यंत उत्साहपूर्ण व जाहीरनाम्यासारखी ठरली. संघटनेच्या मागण्या लवकर मान्य झाल्या नाहीत तर येत्या काळात महाराष्ट्रभर जनआंदोलन उभारले जाणार असल्याचे स्पष्ट संकेत या बैठकीतून देण्यात आले.