
13 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या वर्षातील तिसऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 55 हजार 981 प्रकरणे निकाली काढण्यात यशठाणे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर..
ठाणे, प्रतिनिधी:- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, ठाणे तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्रीनिवास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे अंतर्गत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालये व संलग्न न्यायालयांमध्ये शनिवार, दि.13 सप्टेंबर 2025 रोजी “राष्ट्रीय लोकअदालत” चे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश न्यायमूर्ती श्रीमती मंजुषा देशपांडे व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. दीप प्रज्वलनानंतर मान्यवरांनी उपस्थितांना राष्ट्रीय लोकअदालतीसंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले व त्यानंतर उद्घाटन समारंभाची सांगता करण्यात येवुन लोकअदालतीच्या कामकाजास प्रारंभ करण्यात आला.
मागील काही राष्ट्रीय लोकअदालतीचा आलेख पाहिला असता नागरीकांना राष्ट्रीय लोकअदालतीचे महत्व पटल्याचे प्रकर्षाने दिसून येते. प्रसारमाध्यमे तसेच समाजातील प्रत्येक स्तरामध्ये करण्यात आलेल्या कायदेशीर जनजागृती शिबीरामुळे सामान्य जनतेस लोकअदालत व त्यातून होणारा न्यायनिर्णयाचे महत्त्व प्रकर्षाने जाणवत असल्याने दिवसेंदिवस लोकअदालत तसेच मध्यस्थी प्रक्रिया याकडे नागरीकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येते व त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हा न्यायालय व अनिधस्त तालुका न्यायालयांची मिळून एकूण 111 पॅनल्सद्वारे लोकअदालतमध्ये एकूण 40 हजार 244 प्रलंबित प्रकरणे व 15 हजार 737 दावा दाखल पुर्व प्रकरणे अशी एकूण 55 हजार 981 प्रकरणे आपापसात तडजोडीने निकाली काढण्यात यश मिळाले.या लोकअदालतीस ठाणे जिल्ह्यातील सर्व सन्माननीय न्यायिक अधिकारी, महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे सदस्य श्री. गजानन चव्हाण, ठाणे वकील संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कदम, वकील संघटनेचे पदाधिकारी, सरकारी अभियोक्ता, पोलीस उपआयुक्त, वाहतुक तसेच पोलीस प्रशासन, महानगरपालिका, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी वित्तीय संस्था, इन्शुरन्स कंपनी, न्यायालयीन कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी, संगणक कक्षातील कर्मचारी यांच्या परिश्रमाने व उत्स्फुर्त प्रतिसादाने मोठ्या प्रमाणात प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यश संपादन करण्यात आले, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रविंद्र पाजणकर यांनी दिली“राष्ट्रीय लोकअदालत” यशोगाथा.मयतांचे वारस व जखमींना दिलासा:-ठाणे जिल्हयात मोटार अपघात दावा नुकसान भरपाई प्रकरणात एकूण 378 प्रकरणांत तडजोड होवुन पिडीतांना रक्कम रू.37,22,55,342/- रूपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. या प्रकरणांपैकी मोटार अपघात दावा न्यायाधीकरणाच्या सदस्य तथा ठाणे मुख्यालयातील न्यायाधीश श्रीमती आर. व्ही. मोहिते यांच्या पॅनलकडे एकूण 154 प्रकरणांमध्ये तडजोड होवुन रू.15 कोटी 70 लाख 86 हजार 225 एवढी नुकसान भरपाई पिडीतांना मंजुर करण्यात आली. तसेच मोटार अपघात दावा प्रकरणासंबंधीचे दुसरे पॅनल बरील पॅनल प्रमुख मा. न्यायाधीश श्री. जी.जी. भन्साली, जिल्हा न्यायाधीश-6, ठाणे यांच्या पॅनलकडे एकूण 142 प्रकरणांमध्ये तडजोड होवुन रू. 142 कोटी 26 लाख 26 हजार 617 एवढी नुकसान भरपाई पिडीतांना मंजुर करण्यात आलीतसेच मोटार: अपघात दावा न्यायाधीकरणाच्या सदस्य तथा ठाणे मुख्यालयातील न्यायाधीश श्रीमती आर. व्ही. मोहिते यांचे पॅनल क.1 मध्ये एका प्रकरणात मोटार अपघातातात मृत्यु पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनीकडून उच्चतम रक्कम नुकसान भरपाई म्हणुन 1 कोटी 5 लाखांचा धनादेश देण्यात आला. या दाव्यामधील मृत्यु पावलेली व्यक्ती व्ही-एन्शुअर टेक्नॉलॉजीज प्रा लि. या कंपनीमध्ये डेप्युटी मॅनेजर या पदावर कार्यरत होते. मोटारसायकलवरून जात असताना सैन्ट्रो कारने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला होता. या दाव्यामध्ये इन्शुरन्स कंपनीतर्फे अॅड. अरविंद तिवारी यांनी व पक्षकारांतर्फे अॅड. समीर देशपांडे यांनी काम पाहिले.वैवाहिक वाद प्रकरणात पुनर्मिलन करण्यात यश :-कौटुंबिक न्यायालय, बेलापूर, कौटुंबिक न्यायालय, ठाणे, पालघर न्यायालय येथील एकूण 13 वैवाहिक प्रकरणात पुन्हा नव्याने संसार जुळले त्यापैकी कौटुंबिक न्यायालय, बेलापूर येथील न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या न्यायालयातील 7 जोडप्यांनी घटस्फोटासाठी टाकलेले अर्ज एकत्र मागे घेत पुढील आयुष्य एकत्रितपणे नांदण्याचा व नव्याने संसार सुरू करण्याचा निर्णय घेतला तसेच कौटुंबिक न्यायालय, ठाणे येथे 5 प्रकरणात व पालघर येथे 1 प्रकरणात पुन्हा नव्याने संसार जुळले.
000



