
महिलांची सुरक्षितता व संरक्षणासाठी राज्य महिला आयोग कटिबद्ध – रुपाली चाकणकर- जनसुनावणीत 55 तक्रारींचा निपटारा
सांगली, प्रतिनिधी : ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या प्रत्येक तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न असून, सर्व यंत्रणांतून तक्रारदाराला मदत करण्यात येत आहे. यातून तक्रारदाराला न्याय देऊन महिलांची सुरक्षितता व संरक्षणासाठी राज्य महिला आयोग कटिबद्ध असल्याची ग्वाही आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आज येथे दिली.
‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत आयोजित जनसुनावणीचच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या जनसुनावणीस आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या जनसुनावणीत 55 तक्रारींचा निपटारा करण्यात आला.
शासनाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी कडक तरतुदी केल्या आहेत. त्यांची माहिती घेऊन महिलांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात तक्रार दाखल करावी, असे आवाहन करून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यावेळी म्हणाल्या, महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा, यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जनसुनावणीला पोलिस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदि उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. या माध्यमातून आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचा प्रयत्न आयोग करत आहे, असे सांगून त्यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीची माहिती व महिला सबलीकरणाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन केले.हुंडा, बालविवाह, विधवा आदि प्रथा व प्रकार बंद करून स्रीला सन्मानाची वागणूक मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करून अध्यक्ष रूपाली चाकणकर म्हणाल्या, महिलांनीही आत्मविश्वासाने आयुष्य जगावे. सुपरवुमन होण्याला प्राधान्य देण्याऐवजी महिला म्हणून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. महिलाविषयक कायदे, नियम, शासकीय योजनांची माहिती घ्यावी. अडचणीत असलेल्या महिलांनी 155209 किंवा 112 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हा यंत्रणांचे केले विशेष कौतुक राज्य महिला आयोगाच्या सांगलीमध्ये जुलै 2023 मध्ये झालेल्या जनसुनावणीत आयोगाकडे दाखल झालेल्या तक्रारींच्या तुलनेत आजच्या जनसुनावणीत प्राप्त तक्रारींची संख्या कमी आहे. केसेस कमी असणारा हा पहिला जिल्हा असून, जिल्हा प्रशासनांतर्गत संबंधित सर्व यंत्रणांनी केलेल्या चांगल्या कामाची ही पोचपावती असल्याचे सांगून त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. तसेच, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद यांनी महिलांच्या आरोग्यावर भर दिल्याबद्दल, पोलीस दलाच्या महिलांच्या सुरक्षिततेबद्दलच्या उपक्रमांबद्दल आणि महानगरपालिकेच्या सुसज्ज रूग्णालयाचा आवर्जून उल्लेख करून विशेष कौतुक केले. महिलांचे प्रश्न सोडवण्यात जिल्हा प्रशासनाचे सदैव प्राधान्य असल्याचे सांगत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा जिल्ह्यातील 25 लाखहून अधिक महिला विषयक लाभ दिल्याचे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी आपल्या सादरीकरणातून महिलांसाठी जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या लक्ष्मीमुक्ती, घरेलु कामगार आरोग्य शिबिर, अस्वच्छ महिला स्वच्छतागृह दाखवा, एक हजार रूपये बक्षीस मिळवा, दिव्यांग प्रमाणपत्र, नवरात्रोत्सवात नारीबलम् मालिकेंतर्गत महिलाविषयक योजनांना प्रसिद्धी आदि विविध उपक्रम राबवल्याची माहिती दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने ॲनिमियामुक्तीसाठी राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका, आशा सेविका गावाच्या आरोग्याचा रथ 75 टक्के ओढतात. त्यांच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती व महिलांचे आरोग्य यावर भर देत असल्याचे सांगितले.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी महिलांच्या संरक्षणासाठी पोलीस दलाकडून राबवण्यात येत असलेल्या दामिनी पथक, पोलीस काका, पोलीस दीदी उपक्रम यासह अन्य उपक्रमांची माहिती दिलमहिला आयोगाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या महिलांसाठी असणाऱ्या योजना महिलांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगून आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी महिलांचा शासनावरील विश्वास अबाधित ठेवण्याचा आणि तो वाढत राहील, यासाठी प्रयत्नरत असल्याचे सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच, यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
जनसुनावणीत 55 तक्रारींचा निपटारा,या जनसुनावणीत सांगली जिल्ह्यातील महिलांकडून 55 तक्रारी दाखल झाल्या. यामध्ये वैवाहिक/कौटुंबिक 29 प्रकरणे, सामाजिक 9 प्रकरणे, मालमत्तासंदर्भात 7 प्रकरणे, कामाच्या ठिकाणी छळ 4 प्रकरणे व इतर 6 अशा एकूण 55 तक्रारींचा समावेश आहे. तीन पॅनलच्या माध्यमातून या तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली. या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली.
00000



