vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 करिता नवी मुंबई महानगरपालिका सज्ज**सर्वेक्षणाच्या टुलकीटनुसार करावयाच्या कार्यवाहीचा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतला सविस्तर आढावा*

*स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 करिता नवी मुंबई महानगरपालिका सज्ज**सर्वेक्षणाच्या टुलकीटनुसार करावयाच्या कार्यवाहीचा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतला सविस्तर आढावा*

 

नवी मुंबई प्रतिनिधी-स्वच्छ सर्वेक्षण 2025-26’ विषयी स्वच्छ भारत मिशनच्या वतीने ‘मार्गदर्शक तत्वे (Toolkit)’ जाहीर करण्यात आलेली असून त्यांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करावयाच्या कार्यवाहीचा आढावा महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत घेतला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सत्यवान उबाळे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ.राहुल गेठे आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

कृती आराखडयात नमूद बाबींच्या अनुषंगाने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये केवळ गुणांकनाकरिता नाही तर केलेल्या कामाचे आपल्याला संपूर्ण समाधान मिळेल अशाप्रकारे नियमीत स्वच्छता कामे हाती घ्यावीत व स्वच्छता निरीक्षक, पर्यवेक्षक यांच्यापासून ते उच्च अधिका-यांपर्यंत प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करुन द्यावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. याविषयी माहितीपुस्तिका तयार करुन ती प्रत्येक घटकाला उपलब्ध करुन द्यावी असेही त्यांनी सूचित केले.

या वर्षीपासून स्वच्छ भारत मिशनच्या वतीने ‘स्वच्छ शहर जोडी’ उपक्रमांतर्गत देशातील १९६ शहरांना मार्गदर्शन करण्यासाठी एकूण ७२ मार्गदर्शक शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये समाविष्ट नवी मुंबई महानगरपालिका शहरास महाराष्ट्र राज्यातील लोणार, केज, मलकापूर, जिंतूर, कन्नड – या 5 नगरपरिषदा स्वच्छ शहर जोडीमध्ये देण्यात आलेल्या आहेत. या स्वच्छ शहर जोडी असलेल्या 5 शहरांकरिता नवी मुंबई महानगरपालिकेचे 5 नोडल अधिकारी नेमण्यात यावेत आणि त्यांनी आगामी 2 महिन्यात या शहरांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना स्वच्छतेतील प्रगतीबाबत मार्गदर्शन करावे अशा सूचना आयुक्तांनी केल्या. त्यानंतर स्वत: आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व उच्चस्तरीय अधिकारी या शहरांना भेट देतील असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.

महामार्गांच्या स्वच्छतेकडे अधिक काटेकोरपणे नियमित लक्ष द्यावे व या ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीमांची व्याप्ती वाढवावी असे निर्देश देतानाच रेल्वे स्टेशन व परिसर सिडकोच्या अखत्यारित येत असल्याने येथील स्वच्छतेबाबत सिडकोकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा आणि स्वच्छता करून घ्यावी अशाही सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.

मार्केटमधील स्वच्छतेबाबत तेथील विक्रेत्यांनी खबरदारी घेण्याविषयी त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी सतत मोहीमा राबवाव्यात व त्यामध्ये सातत्य राखावे अशा सूचना देतानाच मासळी मार्केटमध्ये स्वच्छता राखण्यासाठी स्टिलच्या टेबलचा वापर करण्याबाबत कार्यवाही करावी असे सूचित करण्यात आले. प्लास्टिक पिशव्यांच्या वापर नागरिकांनी थांबवावा याकरिता नियमितपणे जनजागृती करत राहावी तसेच प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवायादेखील अधिक प्रभावीपणे राबवाव्यात असे निर्देश त्यांनी दिले.

आजचे विद्यार्थी हे उद्याचे शहराचे जबाबदार नागरिक असल्याने रस्त्यावर कचरा टाकू नये, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, ओला – सुका कचरा वर्गीकरण निर्मितीच्या ठिकाणी म्हणजे घरातूनच करावे, प्लास्टिक पिशव्या व सिंगल यूज प्लास्टिक वापरण्याचे पूर्णपणे बंद करावे, हात नियमितपणे स्वच्छ धुवावेत, ‘थ्री आर’ म्हणजे कचरा कमी करणे (Reduce) व कच-याचा पुनर्वापर करणे (Reuse) आणि कच-यापासून पुनर्निर्मिती करणे (Recycle) ही त्रिसूत्री उपयोगात आणावी, स्वच्छतागृहांचा वापर करावा व ती फ्लश करून स्वच्छ ठेवावीत अशा स्वच्छतेच्या सात सवयींबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करावी. त्यासाठी शाळांमध्ये स्वच्छतेविषयी तसेच पर्यावरणाविषयी जागृती करणारे सोप्या भाषेतील चित्रमय फलक ठिकठिकाणी लावावेत तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना व कल्पनांना उत्तेजन देणारे स्वच्छता व पर्यावरण विषयक विविध उपक्रम सातत्याने राबवावेत अशाही सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.

शाळांमध्ये सॅनेटरी पॅड वेंडींग मशीन लावण्यात आलेल्या आहेत. त्या कार्यान्वित असतील याकडे बारकाईने लक्ष द्यावे असे निर्देश देण्यात आले. महाविदयालयीन युवकांनाही स्वच्छता उपक्रमात मोठया प्रमाणात सहभागी करुन घ्यावे असे सूचित करतानाच यांना केलेल्या कामाचे प्रशस्तिपत्र द्यावे असे आयुक्तांनी सूचित केले.

सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची स्वच्छता हा अत्यंत महत्वाचा विषय असून त्यावरील निरीक्षण व नियंत्रण यांची जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत क्षेत्रीय स्तरावर स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांनी नियमित लक्ष ठेवून पार पाडावी अशा सूचना आयुक्तांनी केल्या.

स्वच्छताकर्मी हा अत्यंत महत्वाचा घटक असून त्यांना उपलब्ध करुन दिलेल्या हजेरी शेड सुव्यवस्थित असल्याची खात्री करणे तसेच त्याठिकाणी प्रथमोपचार व्यवस्था, महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था अशा आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध असण्याबाबत कार्यवाही करावी . त्यांना काम करतांना वापरायची सुरक्षा साधने मिळाली आहेत काय व त्यांच्याकडून त्याचा वापर केला जात आहे काय, वापर होत नसेल तर न वापरण्यामागची कारणे जाणून घ्यावीत व त्यामध्ये सुधारणा करावी असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

स्वच्छतेविषयी अधिक व्यापक जनजागृती करण्यासोबतच निर्मितीच्या ठिकाणी कचरा वर्गीकरण केला जाणे अत्यंत महत्वाचे असून विभाग कार्यालयामार्फत सोसायट्यांमध्ये स्वच्छतेबाबत नागरिकांशी सुसंवादात्मक उपक्रम ठेवावेत, त्यामध्ये स्थानिक नगरसेवकांना सहभागी करुन घ्यावे. गावठाण व झोपडपट्टी भागातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.

रस्ते, रस्त्यांच्या बाजूच्या जागा, उड्डाणपूल, उड्डाणपूलाखालील जागा, दुभाजक, बॅकलेन, मैदाने या ठिकाणांच्या स्वच्छतेसाठी राबविण्यात येत असलेल्या मोहीमांमध्ये सातत्य राखावे असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. सध्या मैदानांच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले जात असून त्यामध्ये नियमितता राखावी व मैदानांच्या कडेला कचरापेट्या ठेवण्यात याव्यात असे निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले.

नागरिकांचे अभिप्राय, सूचना व तक्रारी यांची दखल घेऊन त्याची तत्परतेने अंमलबजावणी करावी व ‘सिटीझन फिडबॅक’ विषयी व्यापक कार्यवाही करावी अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या.

बांधकाम व पाडकाम कचरा महानगरपालिकेच्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पस्थळी जाईल याबाबत अधिक जनजागृती करावी व डेब्रीज भरारी पथके सक्षम करण्यासाठी डेब्रीजवर निरीक्षण व तपासणी करण्याची कार्यवाही राबविण्याकरिता मोटर सायकल उपलब्ध करून द्याव्यात असेही आयुक्तांनी सूचित केले.

नवी मुंबई शहर मागील वर्षीपासून देशातील सर्वाधिक स्वच्छ शहरांच्या ‘सुपर स्वच्छ लीग’ या विशेष कॅटेगरीमध्ये मानांकित असून यावर्षीच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण 2025-26’ मध्ये संपूर्ण क्षमतेने सहभागी होत आहे. याकरिता स्वच्छ भारत मिशन मार्फत जाहीर झालेल्या टुलकीट नुसार सर्व लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सहयोगाने सुपर स्वच्छ लीग मधील आपले मानांकन कायम राखण्यासाठी महानगरपालिका सज्ज असून त्यानुसार स्वच्छताविषयक प्रत्येक बाबीत करावयाच्या अपेक्षित कार्यवाहीचा महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सविस्तर आढावा घेतला.

000000

संबंधित पोस्ट

केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव बनले विद्यार्थ्यांचे सारथीपहिल्या दिवशी शाळकरी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत..

मौजे सिरसवाडी येथील असंख्य युवकांचा भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश…

बौद्ध समाज सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना अनुदान…

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनःमुख्य शासकीय सोहळा सिद्धार्थ उद्यान येथेबुधवारी (दि.१७);मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण…

vishwatmaklokswamivarta

महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रेरणा लेख- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडून विद्यार्थ्यांनी काय शिकावे ?

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सुनियोजित व्यवस्थेत 15277 श्रीगणेशमूर्तींसह 1959 गौरींचे भावपूर्ण विसर्जन,कृत्रिम विसर्जन तलावांना उत्तम प्रतिसाद – शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करणा-या नागरिकांचा प्रशस्तिपत्राने सन्मान..

vishwatmaklokswamivarta