vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहयोगाने नवी मुंबईतील गावठाण क्षेत्रात विशेष स्वच्छता मोहीम**श्रीसदस्यांसह नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांना सेवाभावी आदरांजली*

*डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहयोगाने नवी मुंबईतील गावठाण क्षेत्रात विशेष स्वच्छता मोहीम**श्रीसदस्यांसह नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांना सेवाभावी आदरांजली*

 

       नवी मुंबई प्रतिनिधी   स्वच्छतेमध्ये देशातील सर्वात स्वच्छ शहरांच्या ‘सुपर स्वच्छ लीग’ या विशेष कॅटेगरीत समाविष्ट असणा-या नवी मुंबई शहराला लाभलेली स्वच्छतेमधील राष्ट्रीय, राज्य स्तरावरील मानांकने यामध्ये येथील स्वच्छताप्रेमी नागरिकांच्या सक्रिय सहभागाचा अत्यंत महत्वाचा वाटा आहे. यामध्ये विशेषत्वाने डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवंदडा, अलिबाग यांच्यामार्फत सातत्यपूर्ण राबविल्या जाणा-या स्वच्छता मोहीमा प्रत्यक्ष स्वच्छतेप्रमाणेच आंतरिक सेवाभावालाही चालना देतात.

          अशाच प्रकारची महास्वच्छता मोहीम आज नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व गावांमध्ये तसेच महानगरपालिकेच्या पाचही रूग्णालय परिसरात महाराष्ट्रभूषण डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून उत्साहाने राबविण्यात आली.

          यामध्ये प्रतिष्ठानच्या 2710 श्रीसदस्यांच्या समवेत महापौर सौ.सुजाता सुरज पाटील, उपमहापौर श्री.दशरथ भगत, अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, नगरसेवक श्री.निशांत भगत, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे आणि महापालिकेचे स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी, स्वच्छताकर्मी असे 3500 हून अधिक नागरिकांनी उत्साही सहभाग घेतला.

          या मोहीमेमध्ये 26 गावांतील गावठाण क्षेत्र तसेच 5 महापालिका रूग्णालयांचा परिसर स्वच्छ करण्यात आला. या अंतर्गत 10885 कि.ग्रॅ. कचरा साफ करण्यात येऊन उचलून नेण्यात आला. साधारणत: 118.45 कि.मी. चा परिसर अभियानामध्ये स्वच्छ करण्यात आला.

          कुकशेत गाव याठिकाणच्या स्वच्छता मोहीमेत नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला. यावेळी बोलताना त्यांनी वंदनीय डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त श्रीसदस्यांनी राबविलेला हा महास्वच्छता उपक्रम म्हणजे परमार्थ आणि सेवाभाव यांचा संगम असल्याचे सांगितले. आपल्या गुरूंप्रती असलेला आदरभाव समाजाला लाभदायी असे उपक्रम राबवून व्यक्त करण्याच्या श्रीसदस्यांच्या कृतीचे सर्वांनी अनुकरण करावे असे त्या म्हणाल्या.

          वाशीगाव येथील महास्वच्छता अभियानात सक्रिय सहभागी झालेल्या उपमहापौर श्री.दशरथ भगत यांनी अंतर्बाह्य स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करीत नानासाहेबांनी आपल्या विचारांतून माणसांची मने स्वच्छ केली आणि अशी मने स्वच्छ झालेली माणसे एकत्र येऊन शहर स्वच्छतेचा वसा जपत आहेत ही फार मोठी गोष्ट असल्याचे सांगितले. आपण श्रीसदस्य आहोत हे भाग्य असल्याचे सांगत त्यांनी नानासाहेबांप्रती असलेली भक्ती आज सामाजिक शक्तीच्या रूपाने एकवटलेली असल्याचे ते म्हणाले.

          अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी कोणताही उपक्रम लोकसहभागाशिवाय यशस्वी होणे शक्य नाही व त्यातही दैनंदिन महत्वाचा असा स्वच्छतेसारखा विषय तर लोकसहभागाखेरीज अपूर्ण आहे असे सांगत नवी मुंबई महानगरपालिकेला नेहमीच डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांचे उत्स्फुर्त सहकार्य मिळत असते त्याबद्दल आभार मानले.

   महाराष्ट्रभूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्याप्रती असलेला आदरभाव व्यक्त करण्यासाठी श्रीसदस्यांच्या वतीने संपूर्ण राज्यभरात राबविलेला हा महास्वच्छता अभियान उपक्रम सर्वांच्या एकत्रित सहयोगाने यशस्वीरित्य संपन्न झाला.

 

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत मुंबई विभागातील 800 ज्येष्ठ नागरिक अयोध्येला जाणार

विधानपरिषद सभापती राम शिंदे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा…

अवयवदान मोठं पुण्याईच काम आहे… – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

ठाकरे गटाचे ‘हे’ नेते अडचणीत, अनिल परब यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल

महसूल सप्ताह नियोजनपूर्वक व समन्वयाने सर्वदूर यशस्वी   –जिल्हाधिकारी किशन जावळे

मुंबईतील धारावी ते माहीममध्ये एकही नवा रुग्ण नाही….

vishwatmaklokswamivarta