vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे जिल्ह्यात ‘उमेद’ अभियानाचा सक्षमीकरणाचा प्रवास,वज्रेश्वरी महोत्सवात ‘जिल्हास्तरीय व मिनी सरस विक्री प्रदर्शन’ सुरू; नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी – जिल्हा प्रशासनाचे आवाहन

ठाणे जिल्ह्यात ‘उमेद’ अभियानाचा सक्षमीकरणाचा प्रवास,वज्रेश्वरी महोत्सवात ‘जिल्हास्तरीय व मिनी सरस विक्री प्रदर्शन’ सुरू; नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी – जिल्हा प्रशासनाचे आवाहन

ठाणे, प्रतिनिधी जिल्हा परिषद, ठाणे) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे. स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ठाणे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या संयुक्त विद्यमाने “जिल्हास्तरीय व मिनी सरस विक्री प्रदर्शन” आयोजित करण्यात आले आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे रणजित यादव यांच्या हस्ते दि. १० मार्च, २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण मैदान (मॅक्सी ग्राऊंड), कर्णिक रोड, कल्याण, जिल्हा-ठाणे येथे संपन्न झाले.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ग्रामीण भागातून सुमारे २०० महिला या प्रदर्शनात सहभागी झाल्या असून १०० स्टॉल्सवर विविध हस्तकला वस्तू, घरगुती उत्पादने व खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. महिलांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी व त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होत असून बचत गटातील महिला जागतिक दर्जाचे उत्पादन तयार करण्यासाठी पुढाकार घेत आहेत, असे त्यांनी सांगितले. महिलांच्या कल्पकतेला आणि उमेदीला मर्यादा नसून त्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडविणे हेच या उपक्रमाचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच यादव पुढे म्हणाले की, “उमेद अभियान ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी कटिबद्ध आहे. महिलांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि ‘लखपती दीदी’ योजनेद्वारे त्यांचे उत्पन्न वाढवणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ठाणे जिल्ह्यातील अधिकाधिक महिला ‘लखपती दीदी’ होण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. महिलांचे सक्षमीकरण, व्यवसाय विकास, उत्पादनांची गुणवत्ता, ब्रँडिंग, उत्पन्न वाढ आणि सक्रिय सहभाग यामुळे हे उद्दिष्ट साध्य होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनास भेट देऊन महिलांना प्रोत्साहन द्यावे.”

ठाणे जिल्ह्यात ११ हजारांहून अधिक सक्रिय महिला बचत गटांद्वारे सुमारे १ लाखांहून अधिक महिला या अभियानाशी जोडल्या गेल्या आहेत. महिला बचत गटांना संघटनात्मक बळकटी देण्यासाठी सभा, लेखा व्यवस्थापन, कम्युनिटी रिसोर्स पर्सन यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच उद्यम आधार नोंदणी, फूड लायसन्स, बँक लिंकेज, कर्ज व्यवस्थापन व परतफेड यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले जात आहे. या सर्व प्रक्रियेसाठी दशसूत्री कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

याशिवाय “वन स्टेशन – वन प्रोडक्ट” या संकल्पनेअंतर्गत बसस्थानक व रेल्वे स्थानकांवर महिला बचत गटांचे स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच मॉलमध्येही महिला बचत गटांना विक्रीची संधी देण्यात येत आहे. उमेद मार्ट, Amazon यांसारख्या माध्यमांतून डिजिटल मार्केटिंगद्वारेही महिलांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या वज्रेश्वरी महोत्सवातील सरस विक्री प्रदर्शनात सुमारे २० खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तसेच १०० हून अधिक हस्तकला, वस्त्रोद्योग, घरगुती उत्पादने, मसाले, लोणची, पापड आणि विविध पारंपरिक पदार्थांचे स्टॉल्स उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांना ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या दर्जेदार वस्तू खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

प्रास्ताविक करताना प्रकल्प संचालक अजिंक्य पवार यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या महोत्सवास भेट देऊन महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले. तसेच या प्रदर्शनामुळे महिलांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ मिळून त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) संजय बागुल, गट विकास अधिकारी पंचायत समिती कल्याण रघुनाथ गवारी, सहाय्यक प्रकल्प संचालक आरती गगे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सारिका भोसले तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील अधिकारी-कर्मचारी आणि महिला बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्यासरस विक्री प्रदर्शन’ दि. १० ते १४ मार्च २०२६ दरम्यान, यशवंतराव चव्हाण मैदान (मॅक्सी ग्राऊंड), कर्णिक रोड, कल्याण येथे दररोज सकाळी १०.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन महिला उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन प्रकल्प संचालक अजिंक्य पवार यांनी आभार प्रदर्शन करताना केले.अभियानाचे महत्त्वाचे मुद्दे
• सक्षमीकरण : ग्रामीण महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे.
• व्यवसाय विकास : बचत गटांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन व बाजारपेठ उपलब्ध करून देणे.
• गुणवत्ता व ब्रँडिंग : महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, पॅकेजिंग व ब्रँडिंग सुधारणे.
• उत्पन्न वाढ : ‘लखपती दीदी’ योजनेद्वारे महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक करण्याचे उद्दिष्ट.
• सहभाग : ग्रामीण महिलांच्या सक्रिय सहभागामुळे ‘उमेद’ अभियान अधिक प्रभावीपणे यशस्वी होण्यास मदत होत आहे.
000

संबंधित पोस्ट

सायन येथील “गुरुकृपा ” रेस्टॉरंटचा 50 वा वर्धापनदिन साजरा

नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियातील प्रचाराच्या राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण बंधनकारक      – जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -4 शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2025

परम पूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने*भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा धारावी विधानसभा* यांनी आयोजित केली भव्य मिरवणूक…

रेणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा*

बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख  नेत्या आर्यन लेडी बहन मायावती जी यांचा वाढदिवस साजरा

vishwatmaklokswamivarta