vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

उन्हाळ्यातील वाढत्या तापमानात आरोग्याची काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन

उन्हाळ्यातील वाढत्या तापमानात आरोग्याची काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन

आरोग्य प्रतिनिधी-सध्या वातावरणातील बदलांमुळे तापमान सतत वाढत असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार मार्च महिन्यापासूनच राज्याच्या अनेक भागांत कडक ऊन जाणवू लागले आहे. साधारण एप्रिल आणि मे महिन्यांत सन बर्न, हिट क्रॅम्प्स (स्नायूंना गोळे येणे), हिट एक्झॉर्शन (प्रचंड थकवा) आणि हिट स्ट्रोक (उष्माघात) यांसारख्या उष्णताविकारांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

उन्हात कष्टाची कामे करणारे मजूर, वृद्ध, लहान मुले, गरोदर महिला, स्थूल व्यक्ती, पुरेशी झोप न झालेले लोक तसेच मधुमेह, हृदयविकार आणि व्यसन असणाऱ्या व्यक्तींना उष्माघाताचा अधिक धोका असतो. याशिवाय घट्ट कपडे घालणारे नागरिक आणि कारखान्यात बॉयलरजवळ काम करणाऱ्या कामगारांनीही उष्णतेच्या लाटेत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासाची लक्षणे सौम्य किंवा गंभीर स्वरूपाची असू शकतात. सौम्य त्रासात थकवा, ताप, शरीरावर पुरळ उमटणे, चक्कर येणे आणि हाता-पायांना गोळे येणे अशी लक्षणे दिसतात. मात्र, गंभीर स्थितीत त्वचा गरम व कोरडी पडणे, तीव्र डोकेदुखी, रक्तदाब वाढणे, नाडीचे ठोके वेगात पडणे, मानसिक अस्वस्थता आणि बेशुद्धावस्था येऊन मृत्यू ओढवण्याची भीती असते.

उष्णतेच्या लाटेमध्ये काय करावे,प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिकांनी पुरेसे पाणी प्यावे, प्रवासात पाणी सोबत ठेवावे आणि हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे सैल सुती कपडे वापरावेत. उन्हात बाहेर पडताना चष्मा, छत्री, टोपी व पादत्राणांचा वापर करावा आणि ओआरएस, लिंबू सरबत यांसारख्या पेयांचे सेवन करावे.

काय करू नये,कडक उन्हात कष्टाची कामे करणे, दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे, मद्यपान, चहा-कॉफी व शीतपेयांचे अतिसेवन करणे टाळावे. तसेच लहान मुलांना बंद वाहनात ठेवू नये आणि चरबीयुक्त व शिळे अन्न खाणे टाळावे

उष्माघाताचा त्रास झाल्यास रुग्णाला त्वरित वातानुकूलित किंवा हवेशीर खोलीत हलवून त्याचे शारीरिक तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याने अंघोळ घालावी किंवा कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. प्रकृती बिघडल्यास तत्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

उष्माघात नियंत्रणासाठी विविध उपाययोजना कार्यान्वित,हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार तापमानाचा पारा वाढत असून आगामी काळात उष्मतेची लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सज्ज केली आहे. तापमानातील वाढ लक्षात घेता, १ मार्चपासूनच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि शासकीय दवाखान्यांमध्ये स्वतंत्र ‘उष्माघात कक्ष’ स्थापन करण्यात आले असून, या कक्षांमध्ये रुग्णांसाठी आरक्षित खाटा, मुबलक औषधसाठा, पंखे, कुलर आणि पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

उष्मतेच्या लाटेमुळे होणारे सन बर्न, हिट क्रॅम्प्स आणि उष्माघातासारखे विकार रोखण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत जनजागृती करण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून रुग्णवाहिका देखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. उष्माघाताची कोणतीही लक्षणे जाणवल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत आणि प्रशासनाने दिलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून स्वतःचे संरक्षण करावे, असे आवाहन आरोग्य विभागाद्वारे करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मोफत ह्रदय शस्ञक्रियेसाठी 29 बालके मुंबईला रवाना..

राज्यातील जनतेचे आरोग्य सदृढ राहावे आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा विनासायास उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासन #सार्वजनिकआरोग्य क्षेत्रात अनेक उपक्रमसार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि #युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन..

vishwatmaklokswamivarta

मानसिक आरोग्य फिटनेस, मन, शरीर आणि आत्म्याचे शारीरिक आरोग्य फिटनेस प्रदान करणे हे योगाचे उद्दिष्ट आहे – प्रा. मोहन नेहरे.

डॉक्टर व कर्मचारी यांना निवास सुविधा देण्यासाठी कालबद्ध आराखडा- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियानांतर्गतजिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते गरजूंना चष्मे वाटप- अभियानात 11 हजार रूग्णांची नेत्र तपासणी- 1205 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया

जिल्हाधिकाऱ्यांची नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रांला सरप्राईज भेट:कामकाजाची केली पाहणी, रुग्णांना तातडीच्या आरोग्य सेवा देण्याच्या केल्या सूचना..