
‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान : महसूल समाधान शिबिर’शिबिराद्वारे 58 हजार 990 नागरिकांना दिलासाविविध दाखले, प्रमाणपत्रांचे वितरण, योजनांचा लाभ..
अकोला, प्रतिनिधी: जिल्हा प्रशासनाकडून मार्च ते मे या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न स्थानिक पातळीवरच निकाली काढण्यासाठी आणि शासकीय सेवांची पोहोच गतिमान करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत महसूल समाधान शिबिरे ठिकठिकाणी घेण्यात आली. त्यात जिल्ह्यातील 58 हजार 990 नागरिकांना दाखले, प्रमाणपत्रे, प्रलंबित तक्रारींचे निराकरण, विविध सेवांचा लाभ याद्वारे दिलासा मिळालामहसूल मंत्री चंद्रशेखऱ बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात राज्यभर अभियान हाती घेण्यात आले. अकोला जिल्ह्यात विविध मान्यवर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शिबिरे झाली. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनात महसूल आणि विविध विभागांच्या वतीने ‘प्रशासन जनतेच्या दारी’ या धोरणानुसार या शिबिराचे आयोजन करण्यात आले. एका छताखाली हजारो नागरिकांना विविध महत्त्वाच्या दाखल्यांचे व प्रमाणपत्रांचे मोठ्या प्रमाणावर जागेवरच वितरण करून दिलासा देण्यात आला.
नागरिकांना विविध दाखल्यांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागू नयेत, हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. या मोहिमेला नागरिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, शेकडो प्रलंबित प्रकरणांचा निपटारा अत्यंत पारदर्शक पद्धतीने करण्यात आला.
अभियानांतर्गत नागरिकांना 14 हजार 21 डिजीटल सातबारे आणि 10 हजार 524 आठ अ उतारे उपलब्ध करून देण्यात आले. एकूण 3 हजार 294 फेरफार निकाली काढण्यात आले. सातबारामधील दुरुस्ती संदर्भात 1 हजार 213 अर्ज स्वीकृत झाले. एकूण 20 हजार 199 पात्र लाभार्थ्यांना जात, उत्पन्न, अधिवास व नॉन-क्रिमिलेअर आदी प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात आली. एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत 8 हजार 925 अर्ज निकाली काढले. भूसंपादन प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून 7 गाव दप्तर अद्ययावत करण्यात आले.
जिवंत 7/12 मोहिमेअंतर्गत 699 अभिलेख अद्ययावत करण्यात आले. एकूण 17 प्रकरणांत भोगवटदार वर्ग 2 जमीन वर्ग 1 करण्यात आली. तुकडेबंदी कायद्यानुसार व्यवहार नियमित करून 9 प्रकरणांत अद्यावत सातबारा वाटप करण्यात आले. तसेच, 18 पाणंद रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश निर्गमित झाले. सर्वांसाठी घरे योजनेत 68 पट्टे वाटप झाले.
अभियानात दाखले व प्रमाणपत्रांचे थेट वाटप: पात्र लाभार्थ्यांना जात, उत्पन्न, अधिवास व नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे तत्काळ वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत अर्ज मंजूर करून लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. सातबारा व आठ-अ मधील त्रुटींचे निराकरण, फेरफार नोंदींची नोंद व नवीन शिधापत्रिका वितरण अशी विविध कामे पूर्ण करण्यात आली.
“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराच्या माध्यमातून प्रशासनाने थेट जनतेपर्यंत पोहोचून सेवेचा लाभ दिला. तंत्रज्ञानाचा वापर आणि महसूल कर्मचाऱ्यांची तत्परता यामुळे हजारो नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचला आहे. जनतेच्या समस्या वेळेत सोडवणे हीच प्राथमिकता असून, यापुढेही गतिमान व पारदर्शक कार्यवाही करण्यात येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी व्यक्त केला.
या शिबिराच्या यशस्वितेसाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, महसूल सहाय्यक, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक तसेच विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वय ठेवून उत्कृष्ट कामगिरी बजावली.
००००



