
पाण्याविषयक तक्रारी 1800222309 टोल फ्री क्रमांकावर नोंदविण्याचे महापौर श्रीम.सुजाता पाटील यांचे आवाहन
नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबईच्या महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी दि. 30 मे रोजी मोरबे धरण प्रकल्पाला भेट देत तेथील जलस्त्रोतातील पाणी स्वत: पिऊन पुढे भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र व आग्रोळी येथील जलकुंभ आणि पम्पिंग स्टेशन व स्काडा प्रणालीची प्रसारमाध्यम प्रतिनिधींसमवेत पाहणी केली. महानगरपालिकेमार्फत मोरबे धरण प्रकल्पापासून येणा-या पाण्यावर सुयोग्य जलशुध्दीकरण प्रक्रिया केली जात असून मूळ जलस्त्रोतापासून ते प्रत्यक्ष जलकुंभापर्यंत प्रत्येक टप्प्यावर पाण्याच्या चाचण्या घेऊन नियमितपणे दररोज तपासणी केली जात आहे. नागरिकांना स्वच्छ आणि शुध्द पाणी मिळावे ही महानगरपालिकेची यामागील भूमिका असून त्यादृष्टीने संपूर्ण प्रयत्न केले जात आहेत.
तथापि नुकताच मुख्य जलवाहिनी व इतर सर्व जलवाहिन्यांवर 2 दिवसांचा शटडाऊन घेतल्यानंतर काहीसे गढुळ पाणी येत असल्याच्या तक्रारी विविध स्तरांतून प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने महानगरपालिकेमार्फत तत्परतेने विविध ठिकाणी जाऊन तब्बल 650 हून अधिक पाणी नमुने घेऊन त्यांची शुध्दता तपासणी करण्यात आली. तथापि या तपासणीत हे पाणी स्वच्छ आणि पिण्यायोग्य असल्याचे आढळले. तशाही दररोज ठिकठिकाणी नियमित तपासण्या करण्यात येत असतात.
मात्र अद्यापही विविध माध्यमांव्दारे पाण्याविषयी काही प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने *पाण्याविषयी प्राप्त तक्रारींच्या तात्काळ निवारणासाठी व पाण्याचे नमुने घेऊन आणि तपासून नागरिकांना आश्वस्त करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत 1800222309 हा विनामूल्य टोल फ्री क्रमांक महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी जाहीर केला असून त्यावर पाण्याविषयक तक्रारी नोंदविण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
अशा प्राप्त तक्रारींच्या पत्त्यावर जाऊन महानगरपालिकेच्या कर्मचा-यांनी पाणी नमुने घ्यावेत व त्याची गुणवत्ता प्रत्यक्ष तपासावी आणि नागरिकांना त्याची माहिती देऊन आश्वस्त करावे असे निर्देश महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी दिलेले आहेत.
याशिवाय महापौर महोदया उद्या सोमवार, दि. 1 जून 2026 रोजी अति.शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यासह स्वत: विविध ठिकाणांना भेट देऊन पाणी नमुन्यांची तपासणी पाहणार आहेत.



