अमृत संस्थेमार्फत पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन
रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या “अमृत पर्यटन” उपक्रमांतर्गत पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योजक, व्यावसायिक व नवउद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रम (Entrepreneurship Development Programme – EDP) आयोजित करण्यात आला आहे.
अमृत पर्यटन हा महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी, स्थानिक रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी तसेच पर्यटनाशी संबंधित उद्योजकांना सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या उपक्रमाद्वारे राज्यातील पर्यटन स्थळे, पर्यटन सेवा, स्थानिक उत्पादने व पर्यटन व्यवसायांना नवीन संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. पर्यटन क्षेत्र हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक असून, या क्षेत्रात व्यवसाय विस्तार, रोजगार निर्मिती व आर्थिक प्रगतीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या संधींचा लाभ अधिकाधिक उद्योजकांना मिळावा आणि त्यांना आधुनिक व्यवसाय व्यवस्थापन कौशल्ये प्राप्त व्हावीत, या उद्देशाने या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात Tour & Travels व्यवसायिक, Tourist Guides, Cook & Caterers, होमस्टे व रिसॉर्ट संचालक, पर्यटन सेवा पुरवठादार, धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनाशी संबंधित उद्योजक तसेच पर्यटन क्षेत्रात नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणारे युवक-युवती सहभागी होऊ शकतात.
कार्यक्रमादरम्यान सहभागी उद्योजकांना व्यवसाय उभारणी व विस्तारासाठी आवश्यक मार्गदर्शन, प्रभावी व्यवसाय नियोजन, आधुनिक विपणन तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग, ग्राहक व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, ब्रँडिंग, पर्यटन क्षेत्रातील नवीन व्यावसायिक संधी तसेच शासनाच्या विविध योजना व सहाय्याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.तसेच अनुभवी तज्ज्ञ व क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांकडून प्रत्यक्ष अनुभवाधारित मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार असून, सहभागी उद्योजकांना पर्यटन व्यवसाय अधिक प्रभावीपणे विकसित करण्यासाठी आवश्यक दिशा व मार्गदर्शन मिळणार आहे.
अमृत पर्यटन अंतर्गत पर्यटन क्षेत्रात स्वयंरोजगाराला प्रोत्साहन व प्रशिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. या उपक्रमाचा लाभ पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्व उद्योजक, व्यावसायिक आणि इच्छुक युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क: अमृत रायगड जिल्हा कार्यालय, कलेक्टर ऑफिस परिसर, (भूसंपादन) उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला, हिराकोट तलावासमोर, अलिबाग (9112228759/8149552143/ 8879278740)