
-
महात्मा जोतिराव फुले
महसूल लोक अदालत अभियानांतर्गत प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्याची संधीचिखली तालुक्यात मंडळ व तहसील स्तरावर तीन टप्प्यांत लोक अदालतींचे आयोजन
बुलढाणा, द प्रतिनिधी : जिल्ह्यात दि. १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून महसूल न्यायालयातील प्रलंबित अर्धन्यायिक दावे व अपीले आपापसातील सामंजस्य व तडजोडीने कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या उद्देशाने हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे.
महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या आदेशान्वये अभियानांतर्गत चिखली तालुक्यातील मंडळ अधिकारी तसेच तहसीलदार यांच्या स्तरावर प्रलंबित विविध महसुली प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी लोक अदालतींचे आयोजन करण्यात येणार आहे. मंडळ स्तरावरील लोक अदालत २४ सप्टेंबर २०२६, ३ डिसेंबर २०२६ आणि ४ मार्च २०२७ रोजी, तर तहसील स्तरावरील लोक अदालत १ ऑक्टोबर २०२६, १० डिसेंबर २०२६ आणि ११ मार्च २०२७ रोजी सकाळी १० वाजता संबंधित कार्यालयांच्या मुख्यालयी आयोजित करण्यात येणार आहेत.
महसूल लोक अदालतीमध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ अंतर्गत फेरफार वाद व हक्क नोंद तक्रारी, विवादित फेरफार प्रकरणे, रस्त्याचे वाद, कलम १४३ अंतर्गत प्रकरणे, शेतातील पांदण रस्ते, वहिवाटीचे व बांधावरून जाणाऱ्या रस्त्यांचे वाद, पाणी वहिवाटीचे तसेच शिवरस्त्यांचे तंटे यांचा समावेश असेल. तसेच मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार व तहसीलदार यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेली विविध महसुली अपीले व पुनरीक्षण प्रकरणेही या अभियानांतर्गत निकाली काढण्यात येणार आहेत.
प्रलंबित प्रकरणांतील पक्षकारांनी शासनाने विहित केलेल्या ‘प्रपत्र-अ’ मधील नमुन्यात तडजोड अर्ज सादर करावा. या अर्जावर दोन्ही पक्षकार किंवा त्यांच्या वकिलांच्या स्वाक्षरीसह तडजोडीची सहमती दर्शविणे आवश्यक आहे. प्रपत्र-अ चा नमुना तहसील कार्यालय, चिखली येथील न्यायालयीन शाखेसह तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयांमध्ये विनामूल्य उपलब्ध आहे.
वर्षानुवर्षे न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित राहिल्यामुळे पक्षकारांचा वेळ व आर्थिक खर्च वाढतो तसेच परस्परांमध्ये कटुता निर्माण होते. महसूल लोक अदालतीच्या माध्यमातून दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने सामंजस्यपूर्ण तोडगा काढून प्रकरणे निकाली काढण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
चिखली तालुक्यातील सर्व शेतकरी, खातेदार, पक्षकार तसेच वकील बंधू-भगिनींनी आपल्या संबंधित मंडळ व तहसील स्तरावरील लोक अदालतींच्या तारखांची नोंद घेऊन प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यासाठी या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन चिखली तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
000000



