रेल्वे स्थानकांवर वर्षानुवर्षे प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या एकाही पात्र कामगाराला वंचित ठेवले जाणार नाही!खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने डीआरएम हिरेश मीना यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कामगारांना दिलासा
रेल्वे स्थानकांवर वर्षानुवर्षे प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या एकाही पात्र कामगाराला वंचित ठेवले जाणार नाही!खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने डीआरएम हिरेश मीना यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कामगारांना दिलासा
मुंबई / नवी मुंबई – नवी मुंबई व परिसरातील रेल्वे स्थानकांचे सिडकोकडून रेल्वेकडे हस्तांतरण झाल्यानंतर संबंधित स्थानकांवर वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या कामगारांच्या रोजगाराबाबत निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने रेल्वे प्रशासनासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीस विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) हिरेश मीना, नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, नवी मुंबई महानगरपालिका नगरसेवक तथा युवासेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख अनिकेत रमाकांत म्हात्रे, संबंधित कामगार तसेच आगरी सेनेच्या वतीने दिनेश गजानन म्हात्रे – नवी मुंबई प्रमुख (जिल्हाध्यक्ष) व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य, लुकेश सदानंद म्हात्रे, राहुल दुबे, समाजसेवक भावेश पाटील आणि कामगार उपस्थित होते.
यापूर्वी मे महिन्यात खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून रेल्वे अधिकारी व सिडको अधिकाऱ्यांची संयुक्त समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत नवी मुंबईच्या हद्दीतील १३ रेल्वे स्थानके तसेच रायगड हद्दीतील ३ असे एकूण १७ रेल्वे स्थानकांच्या हस्तांतरणाचा विषय चर्चेला आला होता.त्या वेळी सिडको व रेल्वे यांच्यातील संबंधित करार २००८ मध्ये संपुष्टात आल्यानंतरही सिडकोकडून रेल्वे परिसराची तात्पुरत्या स्वरूपात देखभाल सुरू असल्याचे निदर्शनास आणण्यात आले होते. त्यानंतर खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याने संबंधित रेल्वे परिसर सिडकोकडून रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पार पडली.
या रेल्वे स्थानकांच्या देखभाल व इतर कामांसाठी सिडकोच्या कंत्राटदारांमार्फत सुमारे ३२३ कामगार कार्यरत असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र स्थानकांचे रेल्वेकडे हस्तांतरण झाल्यानंतर या कामगारांमध्ये आपला रोजगार कायम राहील की नाही, याबाबत चिंता निर्माण झाली होती.
खासदार नरेश म्हस्के यांनी सुरुवातीपासूनच वर्षानुवर्षे प्रत्यक्ष काम करणाऱ्या कोणत्याही पात्र कामगारावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी भूमिका मांडली होती. त्याच अनुषंगाने आजच्या बैठकीत कामगारांच्या रोजगाराचा विषय प्राधान्याने मांडण्यात आला.बैठकीत काही कामगार गेली अनेक वर्षे, तर काहीजण जवळपास ३० वर्षांपासून या रेल्वे परिसरात प्रत्यक्ष कार्यरत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. अशा प्रत्यक्ष व अधिकृतरीत्या दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कामगारांना पुढील प्रक्रियेत वंचित ठेवले जाऊ नये, अशी स्पष्ट भूमिका खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनासमोर मांडली.
यावर DRM हिरेश मीना यांनी सकारात्मक भूमिका घेत, वर्षानुवर्षे प्रत्यक्ष काम करत असलेल्या पात्र कामगारांना वंचित ठेवले जाणार नाही, असे आश्वासन दिले. आगामी कंत्राट प्रक्रियेत आवश्यक पडताळणी करून प्रत्यक्ष कार्यरत व पात्र कामगारांचा नियमानुसार विचार करण्यात येईल, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, नमूद करण्यात आलेल्या ३२३ कामगारांच्या संख्येबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. काही ठिकाणी प्रत्यक्ष काम करणाऱ्या कामगारांपेक्षा अधिक कामगारांची नावे दाखवून संख्या वाढविण्यात आल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्यामुळे उपलब्ध नोंदी, कामाचा कालावधी, उपस्थिती तसेच प्रत्यक्ष सेवा यांची योग्य शहानिशा करून वास्तविक व दीर्घकाळ कार्यरत कामगारांवर कोणताही अन्याय होऊ नये, अशा सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी दिल्या.
तसेच, प्रत्यक्षात संबंधित रेल्वे परिसरात कामावर नसलेल्या काही कामगारांनी या प्रक्रियेचा अनुचित किंवा नियमबाह्य लाभ घेण्यासाठी स्वतःचे नाव समावेश करून घेण्याचा प्रयत्न होत असल्याची बाबही बैठकीत उपस्थित करण्यात आली. यावर DRM हिरेश मीना यांनी स्पष्ट केले की, प्रत्यक्ष कामाचा पुरावा नसलेल्या अथवा पात्रता व अधिकृत नोंदींमध्ये न बसणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा समावेश केला जाणार नाही. फक्त प्रत्यक्ष सेवा बजावणाऱ्या व पडताळणीत पात्र ठरणाऱ्या कामगारांचाच नियमानुसार विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी “खऱ्या कामगाराचा हक्क हिरावला जाऊ नये आणि त्याचवेळी प्रत्यक्ष काम न करणाऱ्या व्यक्तींना या प्रक्रियेचा गैरफायदा घेता येऊ नये. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व पडताळणीवर आधारित असावी,” अशी भूमिका मांडली.
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनामुळे उपस्थित कामगारांना दिलासा मिळाला. कामगारांच्या रोजगाराच्या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल आगरी सेनेचे नवी मुंबई प्रमुख (जिल्हाध्यक्ष) व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिनेश गजानन म्हात्रे, लुकेश सदानंद म्हात्रे, राहुल दुबे तसेच उपस्थित कामगारांनी खासदार नरेश म्हस्के यांचे आभार व्यक्त केले.या बैठकीमुळे रेल्वे स्थानकांवर अनेक वर्षांपासून प्रत्यक्ष सेवा देणाऱ्या कामगारांच्या रोजगाराबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेवर सकारात्मक तोडगा निघण्याच्या दिशेने पुढील प्रक्रिया स्पष्ट झाली असून, एकाही वास्तविक व पात्र कामगाराला वंचित राहावे लागू नये तसेच अपात्र व्यक्तींना या प्रक्रियेचा अनुचित लाभ मिळू नये, यासाठी आवश्यक पडताळणी व पाठपुरावा करण्यात येणार आहे.