vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

कर्करोग आजार तपासणी विशेष शिबिराचा 1200 हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ..

कर्करोग आजार तपासणी विशेष शिबिराचा 1200 हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ..

        आरोग्य प्रतिनिधी-  सेवा संकल्प अभियानामध्ये राष्ट्रीय असांसर्गिक आजार (NCD) नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 16 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागांतर्गत महापौर श्रीमती सुजाता पाटील, उपमहापौर श्री.दशरथ भगत आणि आरोग्य सभापती डॉ.जयाजी नाथ यांच्या मार्गदर्शनानुसार नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ३० वर्षांवरील पुरुषांसाठी विशेष मुख कर्करोग (तोंडाचा कॅन्सर) तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

          वाढत्या आधुनिक जीवनशैलीमुळे आणि तंबाखू, गुटखा यांसारख्या घातक व्यसनांमुळे पुरुषांमध्ये मुख कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आजाराचे वेळेत निदान करून रूग्णांना तात्काळ उपचार मिळवून देणे आणि त्यांना व्यसनांपासून परावृत्त करणे हा या शिबीराचा प्रमुख उद्देश होता.

          या शिबिरामध्ये आलेल्या सर्व पुरुषांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात आली. तसेच त्यांचे तंबाखू, मावा, सिगारेट यांसारख्या हानीकारक व्यसनांपासून दूर राहण्यासाठी समुपदेशन करण्यात आले. तपासणी दरम्यान मुख कर्करोगाची प्राथमिक लक्षणे किंवा संशयास्पद बाबी आढळून आल्या अशा सर्व रुग्णांना पुढील निदानासाठी आणि वैद्यकीय उपचारांसाठी सार्वजनिक रुग्णालय नेरूळ येथील ‘ओंकॉलॉजी ओपीडी’ला (Oncology OPD) संदर्भित करण्यात आले आहे.

          शिबिराच्या तारखा आधीच जाहीर केलेल्या असल्याने या मुख कर्करोग शिबिरामध्ये एकूण 1294 पुरुष नागरिकांनी उपस्थित राहत तपासणी करून घेतली. यावेळी रुग्णांच्या तोंडाची सर्वांगीण तपासणी करण्यात आली. त्यासोबतच त्यांना व्यसनमुक्तीचे समुपदेशन करण्यात आले. या तपासणीमध्ये एकूण 58 संशयास्पद केसेस आढळल्या असून त्यांना पुढील चाचणीसाठी संदर्भित करण्यात आले आहे.

          मुख कर्करोग हा पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात वेळेत ओळखता आला, तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे पुरुषांनी कोणतीही लाज, भीती किंवा संकोच न बाळगता तोंडात न भरणारी जखम, लाल-पांढरे डाग, तोंड उघडण्यास त्रास होणे किंवा इतर कोणत्याही बदलांविषयी मोकळेपणाने डॉक्टरांशी बोलावे असे आवाहन करतानाच महापौर श्रीम.सुजाता पाटील व आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी आपले आरोग्य हीच कुटुंबाची ताकद आहे हे लक्षात घेऊन कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे आणि जवळच्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये नियमित तपासणी करून घ्यावी असे सूचित केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेणचा अनोखा पुढाकारआश्रमशाळेतील ‘पिंक रूम’ ठरतेय आदिवासी कन्यांच्या सुरक्षिततेची आणि आत्मसन्मानाची हक्काची जागा..!

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद१ हजार १०३ नागरिकांनी घेतला लाभ

सफाई अपनाओ, बिमारी भगाओ अभियानात विद्यार्थी सहभागातून कचरा वर्गीकरण व जलसंचयन संदेश प्रसारण*

राज्यात ५ हजार ४९७ रुग्णांची नोंद; प्रत्येक जिल्ह्यात डे-केअर सेंटर कार्यान्वित

नमुंमपा आरोग्य विभागामार्फत टीबी मुक्त भारत 100 दिवसांची विशेष माहिम

अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया अभियान’ जोमाने ; राज्य नोडल अधिकारी डॉ. कानगुले यांच्याकडून क्षेत्रीय पाहणी व मार्गदर्शन

vishwatmaklokswamivarta