
जिल्हा परिषदेत लखपती दीदी सन्मान सोहळा
बुलडाणा, प्रतिनिधी: उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा व तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातर्फे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतील जळगाव येथे सुरु असलेल्या लखपती दीदी संमेलन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हा परिषदेतील शिवाजी सभागृहात करण्यात आले.
सदर कार्यक्रमात लखपती दीदीसमवेत समुदाय संसाधन व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. तसेच लखपती दीदींना प्रमाणपत्र, राज्य अभियान कक्षातर्फे साहित्याचे वाटप सुद्धा करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी, मालमत्तावर आठ ते दहा टक्के महिलांचा अधिकार आहे. तसेच आर्थिक बाबतीत निर्णय क्षमता पुरुषांपेक्षा महिला उत्तम स्वरूपात पार पडतात. महिलांना अधिकार मिळाल्यास त्यांची प्रगती होण्यास मदत मिळणार आहे. याच संकल्पनेने लखपती दीदी बनविण्याचे काम उमेद अभियानांतर्गत करण्यात येणार आहे. महिलांच्या उद्योग उभारणीसाठी शासनाची मदत देण्यात येत आहे. महिलांनी उत्पादन केलेल्या वस्तू खरेदी करण्याची प्रक्रिया स्वतःपासूनच करावी अशी सूचना केली. तसेच विविध योजनेतील वैयक्तिक सबसीडीचे कर्ज प्रकरण समुदाय संसाधन व्यक्तींनी प्रस्ताव बँकेत सादर करावे, असे सांगितले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश इंगळे यांनी, शासनाच्या विविध योजनांचा लाभ महिलांना देऊन त्यांना लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट आहे. शासकीय योजनांचा लाभ घेऊन महिलांनी आरोग्य, शिक्षण राहणीमान उंचावणे. प्रभाग संघ स्तरावर मार्केटिंग उपलब्ध करावे, तसेच उद्योजगता विषयक मार्गदर्शन केले.
श्रीपाल सोनटक्के सर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रांत जाधव, जिल्हा व तालुका कक्षातील कर्मचारी, समुदाय संसाधन व्यक्ती उपस्थिती होते.
00000



