सेवा सहकारी संस्थांना काम वाटपासाठी 3 फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
सांगली, प्रतिनिधी: सेवा सहकारी संस्थांना कामे वाटपासाठी वाहनचालक व शिपाई प्रत्येकी एक काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली या कार्यालयाकडे प्राप्त झाले आहे. ही कामे करण्यास इच्छुक असणाऱ्या तसेच अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या सेवा सहकारी संस्थांनी इच्छापत्र व आवश्यक कागदपत्रासह दि. 3 फेब्रुवारी 2025 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.
जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडील वाहनचालक व शिपाई प्रत्येकी एक काम असून कामाचा कालावधी 11 महिन्याचा आहे, तर मासिक मानधन वाहनचालकासाठी 13 हजार रूपये व शिपाई कामासाठी 11 हजार 500 रूपये इतके आहे.
अटी व शर्ती – बेरोजगारांची स्थापन केलेली सहकारी सेवा सोसायटी यांची स्थापना ही ऑगस्ट 2000 नंतर झालेली असावी. तसेच सहकार कायदा 1960 अन्वये नोंदणीकृत असावी. बेरोजगारांची सहकारी सेवा सोसायटी त्यांना देण्यात येणारे काम करण्यासाठी पात्र असावी. सहकारी सेवा सोसायटीस 3 लाखापर्यंतची कामे मिळण्यासाठी त्यांनी यापूर्वी केलेल्या कामाचे अनुभव दाखले प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. सहकारी सेवा सोसायटी खाते सहकारी बँक/ राष्ट्रीयकृत बँकेत काढलेले असावे. सहकारी सेवा सोसायटीच्या आर्थिक उलाढालीचे नियमित वार्षिक लेखापरिक्षण केलेले असावे. सन 2023-24 च्या लेखापरिक्षण अहवालाची प्रत सोबत जोडावी. सहकारी सेवा सोसायटी/ लोकसेवा केंद्र यांनी सदस्यांना ओळखपत्रे देणे आवश्यक असून ते क्रियाशील सदस्य असणे आवश्यक आहे. जे सदस्य क्रियाशिल नसतील त्यांची नावे सदर सहकारी सेवा सोसायटीतून कमी करून त्या ठिकाणी नवीन सदस्य घेण्यात यावेत. कागदपत्रांच्या छायांकित प्रती/प्रमाणपत्र मुळ प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. ज्यांचे कार्यक्षेत्र सांगली आहे तसेच जिल्हास्तरीय कार्यक्षेत्र असलेल्या संस्थांनी अर्ज सादर करावेत. अर्जासोबत उपविधीमध्ये नमूद असलेल्या कार्यक्षेत्राच्या पानाची साक्षांकित प्रत जोडावी. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रस्ताव जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली या कार्यालयाकडे सादर करावे, असे आवाहनही श्री. करीम यांनी केले आहे.00000