सौर ऊर्जा प्रकल्पाला मिळालेली मंजुरी हे आपल्या पाठपुराव्याचे यश – कैलास गोरंटया ल—-आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचा विद्यमान आमदारांचा प्रयत्न
—————————————-
जालना (प्रतिनीधी) जालना येथे शंभर कोटी रुपये खर्चाच्या सौर ऊर्जा प्रकल्पास मिळालेली मंजुरी ही आपण आमदार असतांना केलेल्या पाठपुराव्याचे यश आहे असा दावा करत विद्यमान आमदारांनी आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचा प्रयत्न करू नये असा टोला मा.आ.कैलास गोरंटयाल यांनी लगावला आहे.
जालना शहरातील बिकट असलेला पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करत जायकवाडी – जालना ही महत्त्वाकांक्षी पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली. या योजनेद्वारे जालना शहरातील जनतेला दररोज पाणी पुरवठा करण्याचे आपले स्वप्न असून त्या दृष्टीने आपण प्रयत्न देखील सुरू केले होते.दररोज पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन जनतेला दिले होते. मात्र, वीज बिलावर होणारा खर्च आणि जालना शहर महानगर पालिकेची आर्थिक अवस्था लक्षात घेऊन त्यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्याच्या दृष्टीने जालना विधानसभा मतदार संघातील घानेवाडी येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा जलाशय परिसरात असलेल्या जालना मनपाच्या मालकीच्या जागेत सुमारे १०० कोटी रुपये खर्चाचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आपण आमदार असतांना राज्य सरकारकडे सादर करून या प्रकल्पास मंजुरी मिळावी यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.राज्य सरकारने आपण सादर केलेल्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली दिली आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर त्याद्वारे जालना शहर महानगर पालिकेला दररोज १५ मेगावॅट हक्काची वीज उपलब्ध होणार असून जालना शहर महानगर पालिकेला वीज बीलावर कराव्या लागत असलेल्या कोटयावधी रुपयांच्या खर्चाची बचत होईल असा विश्वास मा.आ.कैलास गोरंटयाल यांनी व्यक्त केला आहे.
—वर्षाकाठी किमान ५० कोटींची होणार बचत–जालना शहरातील जनतेला पाणी पुरवठा करण्यासाठी जालना शहर महानगर पालिकेला सध्या महिन्याला वीज बिलावर सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च करावा लागत आहे. दररोज पाणी पुरवठा केल्यास महिन्याला किमान ५ कोटी इतका खर्च अपेक्षित असून ही बाब लक्षात घेऊनच सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आपल्या कार्यकाळात तयार करण्यात आल्याचे सांगून मा.आ.कैलास गोरंटयाल म्हणाले की, सदरचा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर जालना मनपाची वीज बिलावर वर्षाकाठी खर्च होणार असलेल्या ५० ते ५५ कोटी रुपयांची बचत होणार असून सदरची रक्कम शहरातील विविध विकास कामांवर खर्च करून शहराचा कायापालट करण्यास मदत होईल ही दूरदृष्टी समोर ठेवूनच सौर ऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता असे गोरंटयाल यांनी स्पष्ट केले.