vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

धरण उशाला आणि घसा मात्र कोरडा.!*

धरण उशाला आणि घसा मात्र कोरडा.!*

 

राज्य प्रतिनिधी -छत्रपती संभाजीनगरपासून अवघ्या साठ किलोमीटरवर जायकवाडीचं प्रचंड जलाशय तुडुंब भरलेला असतो. दरवर्षी धरण ८० ते ९० टक्क्यांपर्यंत भरतं. तिथून शहराला पिण्याचं पाणी दिलं जातं. पण दुर्दैव इतकं भयावह की, या शहरात दहा दिवसांनंतरही पाण्याचा एक थेंबही मिळत नाही.

धरणाच्या भरल्या पाण्याकडे बघून घसा कोरडा पडतो, आणि नागरिक फक्त आशेवर जगतात.

ही शोकांतिका नाही, तर सत्ताधाऱ्यांच्या अकार्यक्षमता आणि गलथान कारभाराची थेट कबुली आहे.

*नियोजनाचा प्रचंड अभाव*————————या परिस्थितीसाठी सर्वात मोठी जबाबदारी महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांवर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आहे. ज्या शहरात पंधरा लाखांहून अधिक लोकसंख्या आहे, तिथे पाण्याचं इतकं भेसूर दुर्लक्ष अक्षम्यच आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना दहा दिवस वाट पाहावी लागते. ज्या दिवशी पाणी येतं, त्या दिवशी संपूर्ण घरातील माणसं पाणी साठवण्यासाठी कामाला लागतात.

लाईट गेली तर? मग आणखी वीस दिवस पाण्याचा ठणठणाट.हा तर रोजच्या जीवनाचा भागच झाला आहे!या दहा दिवसांत टँकर राज खुलेआम धुडगूस घालतात. टँकर कुठून येतात, कुठे जातात, याचा कुणालाच पत्ता नसतो. महापालिका आणि प्रशासन यांच्याकडे टँकर व्यवस्थेचा कोणताही पारदर्शक अहवाल नाही.शहरात प्रतिदिन हजारो लिटर पाणी विकलं जातं, परंतु गरीब जनता टाळ्या वाजवत पाणी मागते आणि श्रीमंत लोक टँकर मागवतात.हे न्यायाचं नव्हे, निर्लज्जतेचं दर्शन आहे.*राजकारणाचा बाजार झालाय*

—————छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावर गेली अनेक वर्ष फक्त राजकारण केलं जात आहे.महापालिकेत सेना-भाजप युतीची सत्ता गेली वीस ते पंचवीस वर्षे कायम आहे.या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या कारकीर्दीत शहराच्या पाणीप्रश्नासाठी ठोस उपाययोजना केल्या का?उत्तर ठाम आहे – नाही!महापौर, आमदार, खासदार, मंत्री सगळे मिळूनही शहराला रोज पाणी देऊ शकले नाहीत.आता, सत्ता गेल्यावर हेच लोक आंदोलन करतायत!

मग नागरिकांचा प्रश्न आहे – जेव्हा सत्ता तुमच्या हातात होती, तेव्हा तुम्ही काय झोपले होते का? सत्ताधारी असो वा विरोधी, सगळ्यांनी मिळून नागरिकांच्या तहानलेल्या घशाशी खेळ खेळला आहे.कोणीही या शहराला रोज पाणी मिळावं यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला नाही.

*समांतर जलवाहिनीचा फसलेला खेळ?*

———————-शहरासाठी समांतर जलवाहिनी प्रकल्प आणण्यात आला. परंतु या प्रकल्पाच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचाराचा एवढा घाणेरडा खेळ झाला की, रस्तेखेच करण्यात वर्षानुवर्षे गेली.

कोणत्या ठेकेदाराला काम द्यायचं, कोणाचा हिस्सा किती, यावरच सत्ता आणि प्रशासन बिझी राहिलं. या भ्रष्ट कारभारामुळे समांतर जलवाहिनीचा खर्च दुपटीने वाढला.गेल्या दहा वर्षांपासून या प्रकल्पाची केविलवाणी अवस्था आहे.दरवर्षी पालकमंत्री बदलतात, नवीन आश्वासनं दिली जातात, नवीन पाट्या लावल्या जातात. लवकरच शहराला रोज पाणी मिळेल’ या गोंडस घोषणा केल्या जातात.पण प्रत्यक्षात नागरिकांच्या नळाला थेंबही नाही!

*नागरिकांची मरगळ कारणीभूत*

——————या सगळ्या फसवणुकीत सर्वात मोठं दुर्दैव म्हणजे नागरिकांची मरगळ.छत्रपती संभाजीनगरसारख्या इतिहासप्रसिद्ध शहरात आजवर पाणी प्रश्नावर भव्य आंदोलन झालं नाही.

छोट्या छोट्या गटांनी काही मोर्चे काढले, काही निवेदने दिली, पण एक प्रचंड लाट उठली नाही. सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकारी यांना हादरवणारी जनआंदोलनाची शक्ती येथे दिसून आली नाही. गट-तटांच्या राजकारणात सामान्य नागरिक अडकले आणि पाणीप्रश्नावर एकसंघ लढा दिलाच गेला नाही.

*उद्योगधंदेही फिरले माघारी.?*पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे या शहरात उद्योगधंदे येण्यासही घाबरतात.पुणे, मुंबई, नाशिकसारख्या शहरात रोज पाणी मिळतं, म्हणून तिथे उद्योग फोफावतात. संभाजीनगरला मात्र दहा दिवसांनीही पाणी मिळेल की नाही, याची शाश्वती नाही.त्यामुळे शहराचा आर्थिक विकासही खुंटला आहे.

*आता हे पुरे झालं पाहिजे*–

धरण तुडुंब भरलेलं असताना घसा कोरडा का राहावा? ही परिस्थिती म्हणजे सत्ताधाऱ्यांचा निष्काळजीपणाचा, भ्रष्टाचाराचा आणि नागरिकांच्या जीवनाशी खेळण्याचा थेट पुरावा आहे.

आता केवळ घोषणांनी भागणार नाही.शहरासाठी दररोज पाणी पुरवणं हे सत्ताधाऱ्यांचं कर्तव्य आहे, कृपादान नव्हे!समांतर जलवाहिनीचं काम तातडीने पूर्ण व्हावं.पाणी व्यवस्थापनात पारदर्शकता यावी.टँकर माफियांवर तात्काळ कारवाई व्हावी.आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, नागरिकांनी आता भाबडी आशा सोडून, एका भव्य, ठोस, एकसंघ आंदोलनासाठी सज्ज व्हावं.सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या खुर्चीवरून हलवायचं असेल, तर आंदोलनाच्या भीषण आवाजानेच हलवता येईल. आज जर आपण झोपी गेलो, तर उद्या पिण्याच्या पाण्यासाठीही रांगेत उभं राहावं लागेल! तरीही घसा कोरडाच राहील!

रतनकुमार साळवे

संपादक दैनिक “निळे प्रतीक “

छत्रपती संभाजीनगर

९९२३५०२३२०

संबंधित पोस्ट

जालना-छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर रस्त्याच्या आठ पदरी विस्तारासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन.

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सिक्कीम चे राज्यपाल ओम माथुर यांची भेट*

रामोशी, बेडर समाजाच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती

vishwatmaklokswamivarta

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन.  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वाहिली सोरेन यांना श्रद्धांजली..

vishwatmaklokswamivarta

विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत घडविण्यासाठी ‘वंदे मातरम्’चा संकल्प करूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात सामूहिक ‘वंदे मातरम्’ गीताचे गायन

vishwatmaklokswamivarta

कोकणातील प्रगतशील शेतकऱ्यांसोबत कृषिमंत्री साधणार संवाद

vishwatmaklokswamivarta