vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जेव्हा मुख्यमंत्री एका लहान विद्यार्थिनीचे ‘इंटरव्ह्यूअर’ बनतात…* 

जेव्हा मुख्यमंत्री एका लहान विद्यार्थिनीचे ‘इंटरव्ह्यूअर’ बनतात…*

   राज्य प्रतिनिधी-   रायगड जिल्हा परिषदेच्या ‘पीएमश्री शाळा वहाळ’ मधील तो वर्ग एरवीसारखाच होता, पण आजच्या दिवशी तिथे एक वेगळीच ऊर्जा आणि कमालीचा उत्साह ओसंडून वाहत होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर अनेक मान्यवर समोर उपस्थित होते. याच गर्दीत इयत्ता चौथीमध्ये शिकणारी एक लहान, पण कमालीची चुणचुणीत मुलगी उभी होती—तिचे नाव “यशश्री मिठू घुले”. तिच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता, उलट डोळ्यांत एक वेगळीच चमक होती. आपली शिक्षिका साधना पाटील यांनी दिलेल्या मार्गदर्शनावर आणि स्वतःच्या आत्मविश्वासावर विसंबून, यशश्री थेट मुख्यमंत्र्यांच्या समोर उभी राहिली आणि तिने अत्यंत आत्मविश्वासाने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करत त्यांच्या मुलाखतीला सुरुवात केली.

    एका छोट्याशा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीने मुख्यमंत्र्यांना थेट प्रश्न विचारायला सुरुवात करावी, हा अनुभव तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकासाठी थक्क करणारा होता. यशश्रीने हातातील फाईल उघडून पहिलाच प्रश्न अगदी थेट विचारला, “सर, आपले नाव काय?” बालसुलभ पण अत्यंत स्पष्ट आवाजात विचारलेल्या या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर एक छानसे हसू उमटले. त्यांनीही तितक्याच आपुलकीने उत्तर दिले, “माझे नाव देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस.” त्यानंतर यशश्रीने मुख्यमंत्र्यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाविषयी विचारण्यास सुरुवात केली. तिने विचारले, “सर, आपल्या या प्रवासाची सुरुवात कशी झाली?” मुख्यमंत्र्यांनी तिच्या डोळ्यात पाहत अगदी सोप्या शब्दांत भूतकाळात डोकावत सांगितले की, त्यांच्या या प्रवासाची सुरुवात एका सामान्य ‘विद्यार्थी चळवळीतून’ झाली होती. विद्यार्थी परिषदेत काम करताना, विद्यार्थ्यांचे छोटे-मोठे प्रश्न सोडवता सोडवता ते हळूहळू इथपर्यंत कसे पोहोचले, हे त्यांनी अत्यंत रंजकतेने तिला सांगितले.

     संवाद पुढे सरकत असताना यशश्रीने आणखी एक प्रगल्भ प्रश्न विचारला, “सर, तुमच्या या सामाजिक कामात कोणती मोठी आव्हाने आली आणि तुम्ही त्यावर कशी मात केली?” यावर मुख्यमंत्र्यांनी तिला अगदी एखाद्या मित्राप्रमाणे समजावून सांगितले. ते म्हणाले, “जेव्हा आपण समाजात काहीतरी चांगले बदल घडवू इच्छितो, तेव्हा तिथल्या जुन्या व्यवस्थेला बदलावे लागते. व्यवस्था बदलताना अनेक अडचणी आणि आव्हाने येतात. पण अशा वेळी आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महान आदर्श आहेत. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना स्वतःच्या माणसांशी आणि मुघलांशीही लढा दिला, तर बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून मानवी हक्क आणि समतेची शिकवण दिली. त्यामुळे कितीही संघर्ष करावा लागला, तरी आपण प्रामाणिकपणे चांगले काम करत राहिलो की त्यात नक्कीच यशस्वी होतो.” मुख्यमंत्र्यांचे हे विचार ऐकताना तिथे उपस्थित असलेले शिक्षण विभागाचे अधिकारी आणि पालकांचे चेहरे अभिमानाने भरून आले होते.

     मुलाखतीचा शेवट तर अधिकच रंजक आणि मजेशीर ठरला. यशश्रीने विचारले, “सर, आपल्या संपूर्ण कारकिर्दीतील असा कोणता अनुभव आहे, जो आजपर्यंत तुमच्या लक्षात आहे आणि तुम्हाला प्रेरणा देतो?” यावर मुख्यमंत्र्यांनी हसतमुख चेहऱ्याने आणि अत्यंत हजरजबाबीपणे उत्तर दिले, “माझ्या आयुष्यात अनेक मोठे अनुभव आहेत, पण आजच्या घडीला तुझी ही घेतलेली मुलाखत माझ्या नेहमी लक्षात राहील आणि मला प्रेरणा देत राहील!”

मुख्यमंत्र्यांच्या या उत्तराने संपूर्ण वर्गात एकच हशा पिकला आणि सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. शेवटी यशश्रीने मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मौल्यवान वेळेबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले आणि मुख्यमंत्र्यांनीही तिच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. अन् तेही वहाळ शाळेच्या या चिमुरड्या ‘यशश्री’चे फॅन झाले..!

    एका शिक्षिकेने घेतलेले परिश्रम आणि जिल्हा परिषद शाळेतील मुलीची ही प्रगल्भ पातळी पाहून, तिथली ‘डिजिटल लॅब’ आणि ‘प्रवेशोत्सव’ खऱ्या अर्थाने सार्थ ठरल्याची जाणीव प्रत्येकाला झाली.

 

मनोज सुमन शिवाजी सानप ,जिल्हा माहिती अधिकारी ठाणे/रायगड-अलिबाग

00000000

संबंधित पोस्ट

मा उच्च न्यायालयाचा निकाल लागे पर्यंत आर आर डुकरेनां सेवा निवृत्ती चा लाभ देऊ नका-प्रशांत डोंगरदिवे मा. उच्च न्यायाल्याने दिले 31 जुलै ला हजर राहण्याचे आदेश

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे मृत विद्यार्थ्यांच्या परिवारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची मदत… वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झालेल्या दोन एमबीबीएस शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिवारांना आर्थिक दिलासा आ. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्र्याकडे केली होती मदतीची मागणी

मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीतील २६५ रहिवाशांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यात ११३ गावांमध्ये शिबिरे*; *१६ ते ३० जूनदरम्यान लाभार्थ्यांना विविध सेवा*_जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सर्वच क्षेत्रातील असंघटित कामगारांना-केंद्र व राज्याच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आराखडा तयार करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान;मूल्यसाखळी भागीदार होण्यासाठी इच्छुक संस्थांकडून अर्ज मागविले..