vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

7 हजारहून अधिक नागरिकांच्या एकत्रित सहभागातून सायन पनवेल महामार्ग व ठाणे बेलापूर मार्गावर सखोल महास्वच्छता मोहीम यशस्वी..जोरदार पावसाची पर्वा न करता नवी मुंबईकरांनी जपली स्वच्छतेविषयी बांधिलकी

7 हजारहून अधिक नागरिकांच्या एकत्रित सहभागातून सायन पनवेल महामार्ग व ठाणे बेलापूर मार्गावर सखोल महास्वच्छता मोहीम यशस्वी..जोरदार पावसाची पर्वा न करता नवी मुंबईकरांनी जपली स्वच्छतेविषयी बांधिलकी

नवी मुंबई प्रतिनिधी-डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या 5 हजारहून अधिक श्रीसदस्यांच्या समर्पित सेवाभावी कार्यवृत्तीचे प्रकट दर्शन     केंद्र सरकारमार्फत स्वच्छ भारत मिशनच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियान राबविण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या कालावधीत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक दिवशी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कोणताही उपक्रम नागरिकांच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही हे लक्षात घेत प्रत्येक उपक्रमात लोकसहभागावर विशेष भर दिला जात आहे.   असाच स्वच्छता विषयक मोठा उपक्रम आज रविवारी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सायन पनवेल महामार्ग आणि ठाणे बेलापूर मार्ग या शहरातील दोन महत्वाच्या मुख्य मार्गांवर सखोल महास्वच्छता मोहीमेच्या स्वरूपात राबविण्यात आला. मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस पडत असूनही सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेल्या या सखोल महास्वच्छता मोहीमेत 7 हजाराहून अधिक स्वच्छताप्रेमी नागरिक, महापालिका अधिकारी, कर्मचारी, स्वच्छताकर्मी यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होत शहर स्वच्छतेविषयीची आपली बांधिलकी दाखवून दिली.  विशेष म्हणजे या सखोल महास्वच्छता मोहीमेत डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, अलिबाग यांचे 5 हजारहून अधिक श्रीसदस्य हे पद्मश्री, महाराष्ट्रभूषण डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या महामार्ग सखोल स्वच्छता महामोहीमेत सक्रिय सहभागी झाले होते.

          अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्यासह उरणफाटा येथे स्वच्छता कार्यात सहभागी होण्यासाठी उपस्थित असलेले घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ.अजय गडदे, बेलापूर विभागाचे सहा.आयुक्त डॉ.अमोल पालवे तसेचमोठ्या संख्येने उपस्त्थि श्रीसदस्य व नागरिकांनी स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली व मोहीमेस सकाळी 7 वा. सुरूवात झाली.

          याप्रसंगी कचरा वर्गीकरणाचे महत्व सांगत तसेच एकल वापराच्या प्लास्टिकला दैनंदिन जीवनातून हद्दपार करण्याची गरज विशद करीत अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी आपले शहर स्वच्छ राहण्यासाठी आपण स्वच्छतेला प्राधान्य देण्यासोबतच जो अस्वच्छता करीत असेल तर त्याला त्यापासून परावृत्त करण्याचीही गरज असल्याचे मत व्यक्त केले. इतका पाऊस असूनही भर पावसात समर्पित भावनेने इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या श्रीसदस्यांच्या सेवाभावी वृत्तीचे व हाती घेतलेले काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याच्या ध्यासाचे त्यांनी कौतुक केले.

          नवी मुंबई हे दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे शहर असून सायन पनवेल महामार्ग हा अत्यंत महत्वाचा व वर्दळीचा रस्ता शहरातून जातो. या महामार्गाचे सर्वाधिकार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असले तरी या रस्त्यावरील स्वच्छतेचा दृश्य परिणाम नवी मुंबईच्या स्वच्छ शहर नावलौकिकावर होतो हे लक्षात घेत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार सायन पनवेल महामार्गाच्या स्वच्छतेकडे महानगरपालिकेच्या वतीने बारकाईने लक्ष दिले जाते. स्वछता ही सेवा आजच्या सखोल महास्वच्छता अभियानातही त्यादृष्टीने सायन पनवेल महामार्ग स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात आले. स्वच्छता असावी व नवी मुंबईचा स्वच्छ शहर नावलौकिक कायम रहावा यादृष्टीने महानगरपालिका नेहमीच सतर्क असते.

          सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेल्या या सखोल स्वच्छता महामोहीमेचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले होते. डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्रीसदस्य यांना महामार्गावरील क्षेत्र वाटप करून देण्यात आले होते. वाशी, तुर्भे व सानपाडा, जुईनगर, नेरूळ, बेलापूर या विभाग कार्यालयांच्या हद्दीत येणा-या सायन पनवेल महामार्गाच्या स्वच्छता मोहीमेत तसेच तुर्भे ते दिघा या ठाणे बेलापूर मार्गाच्या स्वच्छता मोहीमेत ठराविक अंतराचे क्षेत्र श्रीसदस्यांच्या गटांना स्वच्छतेसाठी वाटप करून देण्यात आले होते. त्यामुळे अत्यंत नियोजनबध्दरित्या शिस्तीत ही मोहीम राबविण्यात आली. श्रीसदस्यांसोबत त्या त्या विभागांच्या हद्दीतील नागरिक, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व सदस्य, एनएसएसचे विद्यार्थी हे महापालिका अधिकारी-कर्मचारी, स्वच्छतामित्र यांच्यासह उत्स्फुर्तपणे आपापल्या विभागात सहभागी झाले.

          सर्व ठिकाणी स्वच्छता शपथ घेऊन मोहीमेस प्रारंभ करण्यात आला. महामार्गाची स्वच्छता करताना रस्त्यांच्या व पदपथांच्या कडेला पावसामुळे वाढलेले गवत काढून टाकण्यात आले तसेच आपोआप वाढलेली रानटी झाडांची रोपेही काढून टाकण्यात आली. त्याप्रमाणे वॉटर एन्ट्रीजमध्ये जमा होऊन घट्ट झालेली माती साफ करून रस्त्यावरील पाण्याच्या प्रवाहाचे मोठ्या गटारात जाणारे मार्ग मोकळे करून देण्यात आले. याशिवाय प्लास्टिक बॉटल्स व काचेच्या तुटलेल्या बॉटल्स, प्लास्टिक पिशव्या, चॉकलेट व खाद्यपदार्थांचे रॅपर्स, विविध खाद्य साहित्यावरील वेष्टने, कागदाचे व कापडाचे तुकडे असा विविध प्रकारचा कचरा संकलित करण्यात आला. या मोहीमेमध्ये प्रामुख्याने महामार्गावर असलेल्या बस स्टॉपच्या आसपास नागरिकांकडून तसेच प्रवाश्याकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो असे निदर्शनास आले, या जागांकडे नियमित लक्ष देण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी दिले.

          मोठ्या प्रमाणात पडणा-या भर पावसाची पर्वा न करता शहरातील मुख्य मार्ग दुतर्फा स्वच्छ करण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने लोक छत्र्या घेऊन, रेनकोट घालून रस्त्यावर उतरल्याने नवी मुंबईत स्वच्छतेची मोठी चळवळ उभी राहिल्याचे चित्र अनुभवयाला मिळाले. या मार्गांवरून प्रवास करणारे प्रवासीही वाहनांमधून सुरू असलेल्या स्वच्छता मोहीमेकडे कुतुहलाने बघत होते.

          ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेतील प्रत्येक कार्यक्रमाला मिळणारा नागरिकांचा मोठ्या प्रमाणावरील उत्साही प्रतिसाद नवी मुंबईकरांची एकता आणि स्वच्छतेविषयीची बांधिलकी दर्शविणारा असून आज भर पावसातही डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्रीसदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने स्वच्छता कार्यात सहभागी झाल्याने स्वच्छ शहराच्या मानांकनाबाबत नवी मुंबईकर नागरिकांच्या मनात असलेले प्रेम आणि जिद्द प्रत्यक्षात बघायला मिळाली. अशाच प्रकारे 2 ऑक्टोबर रोजी ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहीमेच्या सांगता दिनीही नागरिकांनी मोठ्या संख्येने स्वच्छता उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील धबधबे आणि सर्व पर्यटन स्थळे 5 ऑगस्टपर्यंत बंद राहणार..जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश 

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे आवाहन…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यावरील मच्छिमार तसेच अन्य अवागमन करण्याऱ्याबोटींवर नियंत्रण ठेवण्याकरीता प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी#विधानसभा निवडणूक२०२४ 

vishwatmaklokswamivarta

सर्वस्पर्शी सरकार : दोन वर्ष महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची’या प्रदर्शनाला मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट

स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ अभियानांतर्गत 34 हजाराहून अधिक नागरिकांची तपासणी**नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थिनींकरीता आरोग्यविषयक विशेष मार्गदर्शन सत्रे*

vishwatmaklokswamivarta

सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात राज्यभरातील प्राध्यापकांचा आंदोलनाचा इशारा

vishwatmaklokswamivarta