vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पावसाच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेची यंत्रणा सतर्क – नवी मुंबईतील परिस्थिती सुस्थितीत

पावसाच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेची यंत्रणा सतर्क – नवी मुंबईतील परिस्थिती सुस्थितीत

        नवी मुंबई प्रतिनिधी  भारतीय हवामान खात्यामार्फत (IMD) प्राप्त सूचनेनुसार ठाणे जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ जारी केलेला आहे. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आलेली असून या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी मुख्यालयासह सर्व विभागांमधील आपत्ती निवारण कक्ष यांना रात्रीच सतर्क राहण्याचे तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी बचाव व मदत कार्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सतर्कतेने आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

          अतिवृष्टीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून न जाता व अफवांवर विश्वास न ठेवता शासन व प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन नागरिकांना करतानाच नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे, जुन्या किंवा धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी तसेच गरज असल्यासच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले होते.

          नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 27 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 ते 28 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 पर्यंत सरासरी 78.20 मिमी. आणि आज 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8.30 ते सायं. 5.30 पर्यंत दिवसभरात सरासरी 65.56 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. (बेलापूर – 80.40 मिमी, नेरूळ – 80.20 मिमी, वाशी – 41.60 मिमी, कोपरखैरणे – 64.00 मिमी, ऐरोली – 63.40 मिमी, दिघा – 63.80 मिमी अशाप्रकारे सरासरी पर्जन्यवृष्टी – 65.56 मिमी).

           भारतीय हवामान खात्याकडून ठाणे जिल्ह्याकरिता आलेल्या रेड अलर्टच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी संपूर्ण महापालिका यंत्रणेस दक्ष राहण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार अतिरिक्त आयुक्तांसह सर्व विभागांचे संपर्क अधिकारी, दोन्ही परिमंडळांचे उपायुक्त तसेच आठही विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी व कार्यकारी अभियंता आणि विभागातील आपत्कालीन कक्षातील कर्मचारी तसेच स्वच्छता निरीक्षक आपापल्या कार्यक्षेत्रात मदत कार्यासाठी सज्ज झाले. अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांनी या अनुषंगाने पाणी साचण्याची संभाव्य शक्यता असणा-या सखल भागातील ठिकाणांना भेट देऊन तेथील यंत्रणेचा आढावा घेऊन मौलिक सूचना केल्या व त्याच्या अंमलबजावणीबाबत सातत्याने आढावा घेतला.

          महानगरपालिकेच्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षास तसेच विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्षास प्राप्त झालेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी झाडे अथवा झाडांच्या फांद्या पडल्या आहेत अशा वाशी येथील सेक्टर 17, सेक्टर 9 व सेक्टर 5, बेलापूर सेक्टर 25 अशा 4 ठिकाणी अग्निशमन दल तसेच आपत्कालीन मदत पथकाने जाऊन रहदारीला होत असलेला अडथळा दूर केला. कोपरखैरणे सेक्टर 19 येथे रांजण देवी मंदिराच्या बाजूला असलेल्या शंकर म्हात्रे अपार्टमेंटमध्ये पाचव्या मजल्यावर सुरक्षा रक्षकाच्या रूममध्ये आग लागल्याची वर्दी मिळाल्यानंतर तेथे पोहचून आवश्यक मदतकार्य करण्यात आले. त्याचप्रमाणे आग्रोळी गाव येथे सुनिल रेस्टॉरंटच्या बाजूला इमारतीची संरक्षक कुंपण भिंतीचा काही भाग पडला होता, त्याठिकाणीही नमुंमपा अग्निशमन दलाने त्वरित मदतकार्य केले. कुठेही कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.

           ठाणे जिल्ह्यामध्ये 28 सप्टेंबर रोजी ‘रेड अलर्ट’ असून गडगडाटासह जोरदार ते अतिजोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तसेच 29 सप्टेंबर ‘ऑरेंज अलर्ट’ आणि 30 सप्टेंबर रोजी ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

          महानगरपालिकेच्या सर्व यंत्रणा आठही विभाग कार्यालय क्षेत्रात दक्षतेने कार्यरत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा पावसाळी कालावधीतील मदत कार्यासाठी सज्ज आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी आपल्या नजिकच्या महापालिका विभाग कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षाशी अथवा मुख्यालयातील मध्यवर्ती आपत्कालीन नियंत्रण केंद्राशी 022 – 27567060 /27567061 अथवा टोल फ्री क्रमांक 1800222309 / 1800222310 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांची ब्रिटिशकालीन बंकर, ऐतिहासिक वास्तूंना भेट

vishwatmaklokswamivarta

जिल्हा माहिती कार्यालय निर्मित कॉफी टेबलबुक ऑनलाईन उपलब्ध

महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मानवीय दृष्टीकोनाने अचूक कर्तव्य पार पाडावे- पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार- महसूल विभाग शासनाचा कणा व चेहरा असल्याची भावना – महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाच दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ..

डॉ.चिंतामणराव देशमुख नाट्यगृह तरुण पिढीला प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्रकल्पपूर्वीसाठी संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने गती द्यावी   – जिल्हाधिकारी अशोक काकडे

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिध्दीकरिता-जलवाहिनी बदलण्याच्या प्रस्तावास पर्यावरण मंत्रालयाची मंजूरी प्राप्त

vishwatmaklokswamivarta