
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकाला भेट देत 6 हजारहून अधिक नागरिकांनी केले वैचारिक अभिवादन.चैत्यभूमी येथेही ज्ञानस्मारकाची माहिती देणारा स्टॉलचैत्यभूमीवरील अभिवादन कार्यक्रमाची ज्ञानस्मारकात थेट प्रक्षेपण व्यवस्था…
नवी मुंबई प्रतिनिधी ऐरोली येथे नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकाची प्रशंसा देशापरदेशातील अनेक मान्यवरांनी व नागरिकांनी मुक्तकंठाने केलेली आहे. 5 डिसेंबर 2021 रोजी महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येला येथील सुविधांचे लोकार्पण झाल्यापासून 4 वर्षात 4.5 लाखाहून अधिक नागरिकांनी तेथील रजिस्टरमध्ये नोंद करून भेट देत या ज्ञानस्मारकाचे वेगळेपण अधोरेखित केले आहे व ही संख्या सातत्याने वाढत आहे.
आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त पहाटेपासूनच नागरिकांनी स्मारकाला भेट देण्यास सुरूवात केली असून सायं. 5 वा. पर्यंत 6 हजाराहून अधिक नागरिकांनी येथे भेट देत बाबासाहेबांच्या प्रेरणादायी स्मृतींना विनम्र अभिवादन केले. महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक यांनी ज्ञानस्मारकाला भेट देऊन विनम्र अभिवादन केले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्राच्या विविध भागांतून तसेच देशाच्या विविध राज्यांतून व परदेशातूनही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर जनसागर ओसंडून वाहत असतो. या नागरिकांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली, नवी मुंबई येथील ज्ञानस्मारक म्हणून नावाजल्या जाणा-या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची माहिती मिळावी व चैत्यभूमीवर येणा-या नागरिकांनी ऐरोली येथील ज्ञानस्मारकाला आवर्जून भेट द्यावी याकरिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे यांच्या नियंत्रणाखाली चैत्यभूमीवर ज्ञानस्मारकाची माहिती प्रसारित करणारा स्टॉल प्रदर्शित करण्यात आला आहे.
काल रात्रीपासूनच या स्टॉलला भेट देण्यास नागरिकांनी सुरुवात केली असून आज सायं. 5 वाजेपर्यंत 20 हजाराहून अधिक नागरिकांनी ज्ञानस्मारकाची माहिती जाणून घेतली. यामधील अनेक नागरिकांनी बाबासाहेबांना वैचारिक अभिवादन करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्ञानस्मारकाला आवर्जून भेट दिली. स्मारकातील विविध सुविधा दालनांना भेट दिल्यानंतर या स्मारकाचे ज्ञानस्मारक हे नाव अत्यंत योग्य असल्याचे अभिप्राय बहुसंख्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात आले. स्मारकाला भेट देणा-या नागरिकांसाठी महानगरपालिकेच्या वतीने त्याठिकाणी अल्पोपहार व चहापान व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ज्ञानस्मारकाच्या बाहेरील प्रवेशव्दाराजवळ मोठ्या एलईडी स्क्रीनवर चैत्यभूमीवरील अभिवादन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जात आहे.
या ज्ञानस्मारकामधील बाबासाहेबांचे जीवनचरित्र दूर्मीळ छायाचित्रांतून साकारणारे विशेष छायाचित्र दालन पाहताना नागरिक भारावून गेले. येथील ऑडिओ व्हिज्युअल सुविधांनी परिपूर्ण ई-लायब्ररीसह 5 हजाराहून अधिक पुस्तकांनी समृध्द ग्रंथालयातून माहिती व ज्ञानाचा खजिनाच उपलब्ध असल्याची प्रतिक्रिया मिळाल्या. प्रामुख्याने युवा व कुमार पिढी पुस्तक हातात घेऊन वाचत बसल्याचे चित्र बघायला मिळाले. त्यासोबतच बालसाहित्याच्या कक्षातही पुस्तके बघण्यासाठी लहान मुलांची गर्दी दिसून आली. त्यांच्यासोबत पालकही पुस्तकांमध्ये रमल्याचे दिसून आले. ग्रंथालयातील संविधान कक्षात असलेल्या संविधानाच्या मूळ प्रतीचेही अवलोकन नागरिक उत्सुकतेने करीत होते.
स्मारकात असलेल्या आभासी चलचित्र प्रणालीव्दारे (होलोग्राफिक प्रेझेन्टेशन) बाबासाहेबांचे प्रत्यक्ष भाषण ऐकता येते ही अमूल्य संधी उपलब्ध होत असल्याबद्दलही नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. स्मारकाच्या वरील मजल्यावर असणा-या भव्यतम ध्यान केंद्रातील आनापान ध्यान शिबीराचा लाभही अनेकांनी घेतला.
याठिकाणी मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार या विषयावरील पदव्यत्तुर पदविका (पीजी डिप्लोमा) अभ्यासक्रम सुरू असून त्यामध्ये प्रवेश घेण्याबद्दल सकारात्मकता दर्शवित अनेक नागरिकांनी त्याची माहिती घेतली.
स्मारकात ‘विचारवेध’ या व्याख्यानशृंखलेचा अभिनव उपक्रम सातत्यपूर्ण राबविला जात असून यामध्ये नागरिकांचा मोठ्या संख्येने उत्साही सहभाग लाभत आहे. काल महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येलाही अर्थतज्ज्ञ डॉ.अजित रानडे यांचे ‘आर्थिक लोकशाही आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावरील माहितीपूर्ण व्याख्यान आयुक्त डॉ.कैलास शिंदे व श्रोत्यांच्या मोठ्या संख्येने उत्साही उपस्थितीत संपन्न झाले. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जागर’ या व्याख्यानमालेलाही नागरिकांची नेहमीच उदंड पसंती लाभलेली आहे.
ऐरोली मुलुंड पूलानजिक असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा 50 मीटर उंचीचा पेनच्या नीबच्या आकाराच्या भव्यतम डोम लांबूनच नजरेस पडतो आणि स्मारकाबद्दल मनात उत्सुकता निर्माण होते. बाबासाहेबांच्या ज्ञान संपन्नतेचे प्रतिक असणा-या ज्ञानस्मारकाला भेट दिल्यानंतर जणू काही बाबासाहेबांच्या जीवन समृध्द करणा-या विचारांचीच भेट होते ही भावना निर्माण होत असल्याने याठिकाणी नेहमीच वर्दळ असते. त्यात आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागरिकांनी ज्ञानस्मारकाला पहाटेपासूनच मोठ्या संख्येने भेट देण्यास सुरूवात करून बाबासाहेबांच्या प्रेरणादायी स्मृतींना वैचारिक अभिवादन केले.
Ooo



