‘नवी मुंबई महानगरपालिका चषक महाराष्ट्र राज्य ज्युनिअर व्हॉलीबॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा 2025-26 चा दिमाखदार शुभारंभ..
नवी मुंबई प्रतिनिधी कोणत्याही खेळाची आवड जीवनात व्यक्तिमत्व विकासासाठी तसेच कठीण प्रसंगात ला सामोरे जाण्याची क्षमता वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते, त्यामुळे खेळणे सोडू नका असे सांगत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी नवी दिल्ली मुंबई महानगरपालिका विविध खेळांना तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच संपूर्ण सहकार्य करेल असे प्रतिपादन केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने, ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिशन व नवी मुंबई ॲमॅच्युअर व्हॉलीबॉल असोसिएशन तसेच कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, वाशी यांच्या सहकार्याने आयोजित ‘नवी मुंबई महानगरपालिका चषक महाराष्ट्र राज्य ज्युनिअर व्हॉलीबॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा 2025-26’ च्या शुभारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या समवेत क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपायुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे, क्रीडा अधिकारी श्री रेवप्पा गुरव, महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे चेअरमन श्री.संजय नाईक व सचिव श्री. निलेश जगताप, मुंबईचे विभागीय सचिव श्री. धनंजय वनमाळी, संभाजीनगरचे विभागीय सचिव श्री.सतीश पाठक, कोल्हापूरचे विभागीय सचिव श्री.प्रितम खोत, पुण्याचे विभागीय सचिव श्री.विलास घोगरे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री.अजित पाटील, पंचप्रमुख श्री.बाबू आचरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दि.६ व ७ डिसेंबर २०२५ रोजी वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या मैदानात नवी मुंबई महानगरपालिका चषक महाराष्ट्र राज्य ज्युनिअर व्हॉलीबॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा २०२४-२५ संपन्न होत असून यामध्ये मुंबई, अमरावती, संभाजीनगर, नाशिक, पुणे, नागपूर, लातूर, कोल्हापूर असे आठ विभागांचे पुरुष व महिलांचे संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत गुणवत्तापूर्ण खेळ करणाऱ्या खेळाडूंची निवड करून महाराष्ट्र राज्याचा पुरुष व महिलांचा ज्युनियर व्हॉलीबॉल संघ तयार करण्यात येणार असून हा संघ राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत खेळणार आहे. त्यामुळे सहभागी सर्वच खेळाडूंसाठी या स्पर्धेतील कामगिरी महत्त्वाची आहे.
याप्रसंगी बोलताना क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपायुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे यांनी स्वतः खेळाडू असल्यामुळे उपायुक्त म्हणून स्पर्धांचे आयोजन करताना खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी घेते असे सांगितले. आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका विविध खेळांना पोषक वातावरण निर्माण करीत असल्याची माहिती देत त्यांनी सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव श्री.निलेश जगताप यांनी स्वच्छ, सुंदर असा नावलौकिक असणारी नवी मुंबई महानगरपालिका कोणतेही काम नियोजनबद्ध करते, त्यामुळे या स्पर्धांचे आयोजनही उत्तम रितीने केले असल्याचे मत व्यक्त केले. महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना मानपत्र देऊन विशेष सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे उपायुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे, क्रीडा अधिकारी श्री रेवप्पा गुरव व मुंबईचे विभागीय सचिव श्री.धनंजय वनमाळी यांचाही सन्मान करण्यात आला.
सेंट झेवियर्स हायस्कूल नेरूळ मधील एनएसएस युनिटच्या विद्यार्थ्यांनी संचालनाद्वारे स्पर्धेची सुरुवात केली. पुरुष गटातील शुभारंभाचा सामना मुंबई विभाग आणि अमरावती विभाग तसेच महिला गटातील शुभारंभाचा सामना मुंबई विभाग आणि कोल्हापूर विभाग यांच्यामध्ये खेळविण्यात आला. आयुक्त महोदय व इतर मान्यवरांनी खेळाडूंची ओळख करून घेत क्रीडांगणाचे पूजन करून स्पर्धेचा प्रत्यक्ष शुभारंभ केला.
नवी मुंबई शहरामध्ये विविध खेळांना पोषक वातावरण निर्मितीसाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचे सातत्यपूर्ण आयोजन केले जात आहे. तसेच खेळांसाठी ठोस पायाभूत सुविधांची उपलब्धता करून देण्यावर भर दिला जात आहे. त्या धर्तीवर आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दि ७ डिसेंबर २०२५ रोजी, सायंकाळी ७ वा. संपन्न होणार असून याप्रसंगी तसेच दिवसभर चालणाऱ्या सामन्यांप्रसंगी क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहून राज्यभरातून आलेल्या व्हॉलीबॉल खेळाडूंना प्रोत्साहित करावे असे आवाहन करण्यात येत आहे.