मत्स्यव्यवसायिक श्री. शिवाजी कृ. पाटील यांची विशेष अतिथी म्हणून निवड…
रायगड प्रतिनिधी:- प्रजासत्ताक दिन समारोह निमित्त महाराष्ट्र राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मच्छिमारांना विशेष अतिथी म्हणुन निवड करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून नावे कळविण्यात आली होती. त्यानुषंगाने केंद्र शासनाने रायगड जिल्ह्यातील श्री. शिवाजी कृष्णा पाटील, घर नं.२५८, ऐ कालेश्री, ता.पेण, जि.रायगड, पि.नं.४०२१०७ यांना सपत्नीक विशेष अतिथी म्हणून नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत कळविलेले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी येण्याजाण्याचा, वास्तव्याचा खर्च शासनातर्फे करण्यात येणार आहे.
विशेष अतिथी म्हणून निवड झालेल्या श्री. शिवाजी कृष्णा पाटील यांचा कार्यवृत्तांत खालीलप्रमाणे आहे.
श्री. शिवाजी कृष्णा पाटील, रा. काळेश्री, ता.पेण, जि. रायगड हे लहान मच्छिमार आहेत. ते गत ३० ते ३५ वर्षांपासून करंजा, धरमतर खाडीत bagnet व gillnet वापरून मासेमारी करतात. ते दर्यावर्दी मच्छिमार सह संस्था, घोडाबंदर, पेण या संस्थेचे अध्यक्ष आहेत. धरमतर खाडीतील पाणी प्रदूषण, मोठ्या आकाराची कंटेनर जहाजे यांच्यामुळे खाडीत मासेमारी करण्यासाठी येणाऱ्या समस्या, अडचणी याबाबत ते जागरूक असतात व त्यासाठी ते कृतीशील असतात. यामुळे यासाठी ते या भागात सुपरिचित आहेत. तसेच ते extensive पद्धतीने जिताडा माश्याचे संवर्धन देखील करतात. त्यांनी उत्पादनाची १ टन/हे/वर्ष अशी पातळी गाठलेली आहे. त्यांचे जीवन मत्स्यमय झाले आहे.
श्री. पाटील हे दर्यावर्दी मच्छिमार सहकारी संस्था, पेण या संस्थेचे अध्यक्ष असून संस्थेची सभासद संख्या ही २८९ इतकी आहे. त्यातील १२२ सभासद है नौकाधारक आहेत. संस्थेच्या महिला सभासदांचा मुख्य व्यवसाय हा मत्स्य खरेदी व विक्री हा आहे. श्री. पाटील हे महिन्यातील दिवस डोल जाळी वापरुन मासेमारी करतात व ७ ते ८ दिवस गिलनेट जाळी वापरून मासेमारी करतात आणि त्यांचे अदमासे सरासरी मासिक उत्पन्न हे रु. १५,०००-१६,००० हजार इतके बऱ्याचदा होते.
श्री. पाटील यांचेकडे मत्स्यसंवर्धन तलाव असुन त्यांचे क्षेत्रफळ ६,००० स्क्वेअर मीटर आहे. ते जिताडा, खेकडे, पंग्याशिअस या जातीच्या माश्यांचे संवर्धन त्यात करतात. सदरच्या संवर्धनासाठी त्यांचा वार्षिक खर्च रु.१,४०,०००/- इतका होतो व त्यातून त्यांना रु.२,७५,०००/- इतके निव्वळ वार्षिक उत्पन्न होते.
एकंदरीत श्री. पाटील हे छोटे व लहान मच्छिमार असले तरी मत्स्यव्यावसायिक म्हणुन ते अग्रेसर व प्रगतीशील आणि प्रयोगशील व्यक्तीमत्व आहे.
तरी Capture व Culture मत्स्यव्यवसायात हरहुन्नरी असलेल्या श्री. शिवाजी कृ. पाटील यांची सपत्नीक (श्रीमती मंजुळा शिवाजी पाटील) विशेष अतिथी म्हणून नवी दिल्ली येथे उपस्थित राहण्यासाठी त्यांची निवड झाली आहे.असे सं.वा.पाटील,सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे.